आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका लग्नाची राजकीय गोष्ट (अग्रलेख)

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन माणसे एकत्र आली की राजकारण जन्म घेते. राजकारण राजसत्तेसाठी असते, व्यापार-व्यवहारात असते, तसेच ते नातेसंबंधातही असते. संपत्ती सार्वजनिक असो वा खासगी, मूर्त असो वा अमूर्त, त्यावरचे अनिर्बंध वर्चस्व ही राजकारणामागची मूळ प्रेरणा असते. मालकी हक्काची भावना ही तशी नैसर्गिकच, पण तिला अतिरेकी धार आली की राजकारण बेताल होत जाते. आताचा काळ हा असा बेताल राजकारणाचा. 

 

जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी राजकीय डावपेच खेळण्याचा. अशा प्रसंगी गुजरातेतल्या सुरतमधील एका वऱ्हाडी कुटुंबाने लग्नपत्रिकेत आहेर म्हणून मोदींना २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतांची भेट देण्याचे भावनिक आवाहन केले आहे. हे आवाहन व्यक्तिगत पातळीवर विद्यमान सत्तेला अनुकूल-प्रभावी राजकीय हस्तक्षेपाची एक छटा दाखवणारे आहे. योगायोगाने राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनीही पक्ष बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनो, एक वेळ लग्न करू नका, फुलटाइम काम करा, पक्ष कार्यालयाची स्थापना करण्यासाठी वेळप्रसंगी जमिनी विका, असे आवाहन केले. देशातले राजकारण कोणत्या स्तरावर,किती खोलवर रुजले व खेळले जात आहे याचा हा मासला आहे. 

 

'अवर गिफ्ट इज युवर व्होट फॉर मोदी इन 2019 लोकसभा इलेक्शन' असा मजकूर छापलेली लग्नपत्रिका संबंधितांनी वाटल्याची घटना सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. किंबहुना ती व्हायरल व्हावी, सत्ताधाऱ्यांना अनुकूल जनमानस बनावे हा हेतू इथे पुरेसा स्पष्ट आहे. या घटनेने लग्नपरंपरेची रूढीकेंद्री प्रक्रिया जाणते-अजाणतेपणी सत्तानुकूल होत असल्याचे उघड झाले आहे. परंतु आपल्याकडे लग्न ही प्रक्रियासुद्धा राजकीय आहे याकडेही ही घटना अनाहुतपणे लक्ष वेधते. विशेषत: ठरवून, मानपान आणि देवघेव करून, परस्परांची कुंडली तपासून, वधू-वराच्या इतिहास-भूगोलाचा छडा लावून दोन कुटुंबात सोयरिक जुळणे, नंतर सरबराईचा क्रम ठरवणे, अमुकांना आमंत्रण वा भेटवस्तू देणे, अमुकांना न देणे, इथवर सूक्ष्म- ढोबळ स्वरूपात राजकारण खेळले जाते, हे आपल्या परंपरेतले 'ओपन सिक्रेट' आहे. ते यानिमित्ताने चर्चेला आले इतकेच. अर्थात, ही काही मोदी-शहांची रणनीती नाही. ही त्यांच्या समर्थकांची उत्स्फूर्त क्रिया-प्रतिक्रिया आहे. नव्हे, सत्ताधारी नेत्यांची लोकप्रियता इतकी अफाट की, मतदारच स्वयंस्फूर्तीने राजकीय संदेशाचा प्रसार करत असल्याचे दिसून येते. परंतु त्याने गेल्या-चार-साडेचार वर्षांत घरापासून लष्करापर्यंत, सर्वोच्च न्यायालयापासून साहित्य-सिनेमा-संमेलनांपर्यंत सत्ताधाऱ्यांच्या राजकारणाने केलेल्या सर्वव्यापी शिरकावाकडेही दुर्लक्ष होण्यासारखे नाही. 

 

काल-परवापर्यंत काही संस्था राजकीय आखाड्यापासून कटाक्षाने स्वत:ला दूर ठेवत होत्या किंवा सत्ताधारी मंडळी एका मर्यादेपलीकडे या संस्थांना आखाड्यात उतरवत नव्हती. पण तोही शिष्टाचार आता गुंडाळून ठेवलेला दिसतो. म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या निर्णयाच्या समर्थनार्थ लष्करप्रमुख माध्यमांपुढ्यात येत आहेत, 'दगडफेक्या' काश्मिरी युवकास जीपला बांधून गाव फिरवणारा लष्कराचा जाँबाज' अधिकारीसुद्धा माध्यमांपुढे छाती फुगवून आपल्या कृत्याचे समर्थन करताना दिसला आहे. पाकिस्तानला कधी चार युक्तीच्या, तर कधी खडे बोल सुनावण्यासाठी लष्करप्रमुखांनी राफेल कराराचे समर्थन करण्यासाठी हवाईदल प्रमुखांनी मीडियासमोर येणे ही तर आता नित्याची बाब बनली आहे. सीबीआय-आरबीआय अधिकारी, सर्वोच्च न्यायालयांचे न्यायमूर्ती यांनाही या-ना त्या कारणांनी सत्ताधाऱ्यांच्या राजकारणाला अनुमोदन वा विरोध दर्शवण्यासाठी माध्यमांपुढ्यात येणे भाग पडले आहे. राजसत्ता व मोफत इंटरनेट डेटा देणारी बाजार व्यवस्था यांच्या नियोजनबद्ध योजनेला फळ येऊन स्मार्टफोन हे राजकारणाचा अकल्पित प्रभाव वाढवणारे सगळ्यात प्रभावी आणि विघातक हत्यार बनले यालाही आता काळ लोटला आहे. दोन भाऊ, दोन बहिणी, नवरा-बायको, सासू-सासरे हे सारेच सत्ताधारी आणि विरोधकांनी चालवलेल्या स्मार्ट राजकारणाचे प्यादे बनल्यासारखे झाले आहेत. नातेसंबंधांत दुरावा, दुष्टावा निर्माण करण्याइतपत मतविभाजन आजच्या सत्ताकारण्यांनी घडवून आणले आहे. वस्तुत: जोवर सभ्यता, संयम आणि परस्परांमधील सामंजस्य टिकून आहे, राजकारणाची प्रक्रिया निषिद्ध, बदनाम समजण्याचे काही कारण नाही. उद्या कुणा मरणासन्न माणसाने मृत्युपत्रात अमुक एका पार्टीला, पक्षाला वा नेत्याला मतदान करा, असा भावुक संदेश लिहून सत्ताधारी वा विरोधकांना अनुकूल राजकारण साधले तरीही कुणाची हरकत असण्याचे कारण नाही. परंतु घरापासून लग्नघरापर्यंत दिसणाऱ्या या राजकारणाची छटा विकृत स्वरूप धारण करेल आणि समाजातील सर्जन, संवेदनशीलता लोप पावण्याची शक्यताही यात दडली आहे. आवाहनातून आग्रह आणि आग्रहातून आक्रमक-आक्रस्ताळी उन्माद अशी ही साखळी आहे. एका लग्नाच्या राजकीय गोष्टीतला हाच मोठा धोकाही आहे.