आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रा. फखरुद्दीन बेन्नूर यांच्याशी पहिला संबंध आला तो या १९८२च्या जातीय दंगल रोखण्याच्या निमित्ताने. त्यावेळी त्यांचे जे धाडसी व्यक्तिमत्त्व दिसले, त्याच्याने मी प्रभावित झालो. निधड्या छातीने कठीण प्रसंगाला सामोरे जाणारा एक धडाडीचा माणूस त्यांच्यात दिसला. त्यावेळी ते तरुणही होते. वैचारिक बांधिलकी मानणारा आणि त्या विचारांसाठी कुठल्याही प्रकारचे संकट निर्भयपणे झेलू पाहणारा हा माणूस दिसला. तो चार भिंतीच्या सुरक्षिततेमधला विचारवंत नव्हता, प्रसंगी मैदानात दोन हात करण्याची त्यांची तयारी होती, अगदी जीवावर उदार होऊन. म्हणून मी त्यांना कायम एक कृतिशील विचारवंत असे संबोधत आलो आहे.
प्रा. बेन्नूर हिंदू-मुस्लिम ऐक्याचे कट्टर समर्थक. सामाजिक सौहार्दाचे पुरस्कर्ते. जातीय दंगलींच्या समस्येची उकल आणि ते रोखण्याचे उपाय याचा त्यांचा पक्का अभ्यास. देशभरातील दंगलग्रस्त भागांना भेटी देणे, दंगलग्रस्तांना मदत करणे, तेथील परिस्थिती समजावून घेणे याच्यासह ते दंगलींच्या चौकशी आयोगांचे अहवाल अभ्यासतही. त्यातून दंगलीचे शास्त्र आणि ते रोखण्यावरील उपाये याचे जाणकार बनले. ते राज्य यंत्रणेच्या मानवाधिकाराच्या उल्लंघनावर तुटून पडत. इराकवरील अमेरिकेच्या हल्ल्यावर त्यांनी लेखांमधून, भाषणांमधून कडाडून टीका केली. या पुरोगामी विचारांतून ते आरंभीच्या काळात हमीद दलवाई यांच्या मुस्लिम सत्यशोधक समाजाशी जोडले गेले. ते स्वतः जिज्ञासू होते, अभ्यासू. स्वतःच्या धडावर स्वतःचेच डोके असणारे. इस्लाम आणि मुस्लिम समाजाचा गाढा अभ्यास असलेल्या प्रा. डॉ. मोईन शाकीर आणि डॉ. असगरअली इंजिनियर यांच्याशी परिचय झाल्यानंतर प्रा. बेन्नुरांची मते बदलली. इस्लाम आणि मुस्लिम समाज वेगवेगळे आहेत. दोष इस्लाममध्ये नसून तो मानणाऱ्या समाजात असल्याचेही ते म्हणत.
प्रा. बेन्नूर अतिशय रॅशनलिस्ट. अतिशय विवेकवादी. नेहमीच 'स्वतःच्या धडावर स्वतःचेच डोके' असल्यामुळे बेन्नुरांनी कधीही कोणतीही वैचारिक गुलामगिरी पत्करली नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी हा त्यांच्या श्रद्धेचा विषय असला तरीही ते गांधीवादी झाले नाहीत. मार्क्सवादाविषयी आपुलकी निर्माण झाली तरीही ते मार्क्सवादी झाले नाहीत. समाजवादी, आंबेडकरवादी यांच्याशीही त्यांचा खूप घनिष्ठ संबंध आला. मात्र, तरीही रंगूनही रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा, गुंतूनही गुंत्यांत पाय माझा मोकळा अशी त्यांची स्थिती कायम आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात त्यांच्या तोडीचा दुसरा मराठी मुसलमान विचारवंत आहे, असे मला तरी वाटत नाही. पुस्तकी किडा अशा शब्दांत कौतुक करावे, असे त्यांचे अफाट वाचन होते. प्रा. बेन्नूर आमच्यासाठी स्वातंत्र्यलढ्यातील घटनांचे चालतेबोलते ज्ञानकोश. जगाच्या वसाहतवादी इतिहासात नोंद झालेल्या १९३०च्या सोलापूर मार्शल लॉच्या काळातील प्रत्येक बारीकसारीक तपशील त्यांना तोंडपाठ. मी त्यांचा विद्यार्थी नाही आणि ते माझे शिक्षक नाहीत. पण, वैयक्तिक पातळीवर ते माझे आदरणीय मित्र आणि सर आहेत. ते अतिशय रसिक. साहित्य आणि संगीताची त्यांना प्रचंड आवड. हिंदी सिनेमा, गझला यांच्या असंख्य कॅसेट त्यांच्या संग्रहात होत्या. ते रोमॅन्टिसिजम आणि प्रेम याचे बळी! ते उत्तम मित्र. विशेषतः एखाद्याच्या गरजेच्या वेळी याची नेहमीच प्रचिती येते. अविवाहित राहून जन्मभर समाजाची सेवा करण्याचे अतिशय दुर्मिळ उदाहरण म्हणजे प्रा. बेन्नूर. ते मजबुरीने अविवाहित राहिले नाहीत. ही बाब त्यांनी जाणीवपूर्वक निवडलेली होती. त्यांच्यातील तणावाचे त्यांनी विवेकी व्यवस्थापन केले. जीवनविषयक तत्वज्ञानाच्या चिंतनाकडे त्यांनी ही ऊर्जा वळवली. ते रुढ अर्थाने जरी धार्मिक नसले तरी ते पूर्णपणे आध्यात्मिक आहेत, यात शंका नाही.
निधर्मवादी राज्यव्यवस्थेवर निष्ठा
निधर्मवादी राज्यव्यवस्थेच्या संकल्पनेवर त्यांची निष्ठा. ती कधीही तसूभर ढळली नाही. ते अतिशय खंदे सेक्युलरवादी. प्रामुख्याने प्रशासन आणि पोलिस प्रशासन पक्षपाती होणार नाही, याची खबरदारी घेण्याची गरज ते आग्रहाने मांडत आले. सर्व शोषितांविषयी विशेषतः स्त्रियांविषयी त्यांच्या मनात करुणा. समाजात स्त्रिया असाह्य आणि परावलंबी असल्याने कोणीही त्याच्या या स्थितीचा गैरफायदा घेत त्यांची पिळवणूक करतो, अशी त्यांची मांडणी. स्त्री शिक्षण, स्त्रियांचे स्वातंत्र्य आणि स्वावलंबन, त्यांचा सन्मानाने जगण्याचा हक्क याविषयी ते सदैव जागरूक होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.