आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगार थांबला… (मुलाखत : वसंतराव आपटे)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेतकऱ्यांचे, शेतीचे प्रश्न काय आहेत, हे समजावे म्हणून शरद जोशी यांनी आंबेठाणला २० एकर कोरडवाहू शेती घेतली. त्या शेताला त्यांनी ‘अंगारमळा’ असे नाव दिले होते. हे नामकरण करण्यामागे विचार काय होता? याची माहिती नाही; पण शरद जोशी यांनी युनोतील सुखा-समाधानाची नोकरी सोडून भारतातील शेतकऱ्यांसाठी आयुष्य झोकून देत ज्या पद्धतीने संघर्ष केला ते पाहता शेताप्रमाणेच त्यांचे आयुष्यदेखील एक ‘अंगारमळा’च होता. घरावर विस्तव ठेवला. कुटुंबाची वाताहत झाली. अशा स्थितीत एखादा नेता कोसळला असता पण या झुंझार योद्ध्याने शेतकऱ्यांसाठी आपले सर्वस्व पणाला लावले. असा नेता पुन्हा होणे नाही.

हिंदुस्थानातील शेतकऱ्याच्या विदारक स्थितीचं वर्णन करणारं त्यांचं वाक्य प्रसिद्ध आहे. ते म्हणायचे, ‘शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जात वाढतो आणि कर्जातच मरतो.’ शेतकऱ्याची ही स्थिती ही संपवायची असेल, तर सर्वप्रथम शेतकऱ्याला शहाणे केले पाहिजे, असे त्यांना वाटायचे. “अरे बाबा, तू जी शेती करतो ती तोट्यात आहे. तू शेतात कर्ज पेरतोस आणि त्यातून कर्जच उगवतो. तुझ्या नशिबी लागलेले आयुष्यभराचे हे भोग बदलायचे असेल तर तू पिकवतोस त्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे.” हे देशाला पटवण्यासाठी ते आयुष्यभर लढत राहिले. आज दिल्लीपासून गल्लीपर्यंतचा हिंदुस्थानातील प्रत्येक नेता खर्चावर आधारित भाव मिळण्याची भाषा पोपटासारखी करतो. त्यामागे जोशी आणि शेतकरी संघटनेचा २०-२५ वर्षांचा संघर्ष कारण आहे.

काळ्या मातीत राबणाऱ्या आडाणी शेतकऱ्याला शरद जोशींनी मुक्त अर्थव्यवस्था, गॅटकरार, डंकेल प्रस्ताव, उणे सबसिडी, कर्जमुक्ती, लक्ष्मीमुक्ती, दारूबंदी अशा अनेक कळीच्या प्रश्नांवर शहाणे केले आणि केवळ शेतकऱ्यालाच नाही साऱ्या देशालाच या मुद्यांची ओळख करून दिली. डंकेल प्रस्ताव, गॅटकरार यावर हिंदुस्थान सरकारच्या प्रतिनिधीने सह्या करायच्या की नाही करायच्या यावर देशभरात वाद-विवाद चालू होता. सर्व पक्षातील नेते म्हणायचे की, या करारावर सह्या करून भारताला गुलामीत टाकू नका. देशातील सारे नेते एका बाजूला आणि एकटे शरद जोशी एका बाजूला अशी स्थिती होती. ते म्हणायचे, ‘तुम्ही सही करणार आहात की नाहीत, हे तुम्हाला विचारतंय कोण?, सही नाही केली तरी जगाचे काही बिघडणार नाही. कोणी कितीही विरोध केला नाही तरी आज ना उद्या तुम्हाला सही करावीच लागेल.’ आणि तसेच झाले. शेती अर्थव्यवस्थेला धरून अनेक नवीन आर्थिक कल्पना त्यांनी देशासमोर मांडल्या. अगदी प्रत्येक वेळेला त्यांना विरोध झाला; पण नंतर साऱ्या देशाला ते सत्य मानावेच लागले.

कर्जमुक्तीची मागणी करताना शेती तोट्यात का आहे? याची मांडणी ते करायचे जगातले सर्व विकसित देश किफायतशीर शेतीसाठी शेतकऱ्यांना सबसिडी देतात. पण, भारत सरकार मात्र स्वातंत्र्य मिळाल्यापासून शेतकऱ्यांना उणे सबसिडी देत आला आहे, हा सिद्धांत फक्त शरद जोशींना मांडला आणि शेवटी केंद्र शासनाने लोकसभेत ते मान्यही केले गेले. पण त्यात आजवर दुरुस्ती काही झालेली नाही.

लक्ष्मीमुक्ती आणि दारूबंदीची चळवळ हा त्यांच्या संघर्षातला महत्त्वाचा मूलभूत मुद्दा आहे. शेतकऱ्याची बायको घरात आणि शेतात कबाडकष्ट करते; परंतु संपत्तीतला वाटा तिला अजिबात मिळत नाही. त्यातच एकदा का दारू तिच्या घरात शिरली की त्या घराची, संसाराची राखरांगोळी होते. या भूमिकेतून शरद जोशींनी चांदोड येथे महिला शेतकऱ्यांचे अधिवेशन घेतले होते. २ लाख महिला त्यासाठी आल्या होत्या. देशातल्या कोणत्याही नेत्याला महिलांची एवढी गर्दी आंदोलनासाठी जमवणे आजवर जमलेले नाही. शरद जोशींचे हे महत्त्व शरद पवार यांनीदेखील मान्य केले. चांदोडच्या आंदोलनाने आम्हाला प्रेरणा दिली, असेही त्यांनी जोशींना एक पुरस्कार देताना म्हटले. चांदोडच्या अधिवेशनानंतर हजारो शेतकऱ्यांनी आपल्या लक्ष्मीचे नाव शेतीच्या सात-बाऱ्यावर आणले. आजही तो मुद्दा देशात सर्वत्र चर्चिला जातो. शेतकरी संघटनेच्या लक्ष्मीमुक्ती चळवळीचे ते एक यश आहे.
मूलभूत शेती प्रश्नांची परिणामकारकता
शरद जोशी आणि शेतकरी संघटना चळवळीच्या माध्यमातून मांडत असलेले प्रश्न किती मूलभूत आणि एकूणच राजकारणावर, सहकारावर कसे परिणाम करणारे आहेत, हे शरद पवार चांगलेच ओळखून होते. पक्ष कार्यकर्त्यांच्या एका मेळाव्यात ते म्हणाले होते, ‘शेतकरी संघटनेला रोखण्याचे काम तुम्ही सर्वांनी वेळीच केले पाहिजे, अन्यथा शेतकऱ्यांची ही चळवळ तुम्हाला बुडातून उखडून काढल्याशिवाय राहणार नाही.’ शरद पवारांचे हे वाक्य शरद जोशी मांडत असलेल्या मूलभूत शेती प्रश्नांची परिणामकारकता आणि शेतकरी संघटनेच्या चळवळीची ताकद स्पष्ट करणारे होते.
शब्दांकन : संजीव पिंपरकर, सोलापूर
बातम्या आणखी आहेत...