आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतमालाला भाव आणि बळीराजाच्या पत्नीला ७/१२ वर स्थान मिळवून देणारा द्रष्टा हरपला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यातील शेतकऱ्यांच्या पत्नीला त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीतील वाटा मिळवून देण्याचे संपूर्ण श्रेय शरद जोशी यांना आहे. पतीच्या निधनानंतरही त्या शेतकरी महिलेला सन्मानाने जगता यावे याकरिता शरद जोशी यांनी ‘लक्ष्मीमुक्ती’ कार्यक्रम ही मोठी चळवळ उभारली होती. शेतकऱ्यांनी आपल्या पत्नीच्या नावे जमिनीची मालकी करून देण्याची ही चळवळ तेव्हा सुरू झाली. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे १९८६ मध्ये शेतकरी संघटनेची जाहीर सभा झाली. त्यातच पत्नीच्या नावावर शेतकऱ्यांनी जमिनी करून द्याव्यात, असा ठराव पारित करण्यात आला. दारूबंदीचा ठरावही याच बैठकीत झाला. पुढे राज्यात दोन लाख शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी पत्नीच्या नावे केल्या होत्या. रोज हजारो शेतकरी पत्नीच्या नावाने शेती करून द्यायचे. तहसील कार्यालयात रोज हजारो अर्ज येत. या चळवळीला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. या चळवळीची दखल तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी घेतली होती. लक्ष्मीमुक्ती या नावाने शासकीय अधिनियमच त्यांनी काढला. पत्नीच्या नावे जमीन करून देणाऱ्या शेतकऱ्यांनी या परिपत्रकाच्या आधारे तहसीलमध्ये अर्ज करण्याचे आवाहनही नाईक यांनी केले होते. आमच्या आंदोलनाचा परिपाक म्हणजे आज राज्यातील महिलेला तिच्या सासरच्या संपत्तीत वाटा मिळाला आहे. पुढे जळगाव जिल्ह्यात रावेर येथे एक कार्यक्रम घेऊन या सर्व शेतकऱ्यांचा जाहीर सत्कार शरद जोशी यांनी केला होता.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सत्तारूढ सरकारशी सातत्याने लढा देणारे लढवय्ये नेते शरद जोशी पस्तीस वर्षांपूर्वी १९८१ मध्ये वर्ध्याला आले होते. वर्ध्याला त्यांनी कार्यकर्त्यांकरिता शिबिर घेतले होते. सर्व जण आमच्या घरी जेवायला आले होते. त्या वेळी शरद जोशी यांच्याशी माझी पहिली भेट झाली. वर्ध्यातील आमचे घर साधारणत: चांगले आणि उत्तम स्थितीत होते. म्हणून कार्यकर्त्यांचा सतत आग्रह होता की वर्ध्याला शरद जोशी आले की त्यांची राहण्याची व्यवस्था आमच्या घरी करावी. आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा ते वर्ध्याला यायचे, त्यांचा मुक्काम आमच्याकडे असायचा. माझ्या सासुबाई इंदिराताई काशीकर यांच्याशी ते तासन््तास गप्पा मारायचे. आंदोलनात घडलेल्या घटनांवर विश्लेषण करायचे. चळवळीतील त्यांचे विचार सांगायचे. अशा नित्यक्रमात शरद जोशी माझ्या सासुबाईंचे थोरले सुपुत्र केव्हा झाले कळलेच नाही. सासुबाईंसोबत होणाऱ्या त्यांच्या गप्पा आम्ही आतल्या खोलीतून लपून ऐकायचो. एकदा त्यांनी आम्हा महिलांना गप्पा ऐकताना रंगेहाथ पकडले आणि म्हणाले, वहिनी लपूनछपून काय बोलणे ऐकता? अशा समोर या. हिंमत करा. ही सर्व चळवळ तुम्हालाच पुढे न्यायची आहे. गावातील अशा असंख्य महिलांना समोर येऊन बोलण्याचे धाडस या नेत्याने दिले. तेथूनच राज्यात शेतकरी महिला आघाडीच्या स्थापनेचा विचार सुरू झाला. तत्पूर्वी, एकदा शरद जोशी पंजाबला गेले होते. तेथे काही महिलांनी त्यांना म्हटले होते, "साहब आप किसानों के लिये काम करते हो. लेकिन हम गांव की महिलाओं की तरफ किसी का ध्यान नहीं.गोमाता बिमार होती है तो इंजेक्शन लगता है. घरकी महिला बिमार हुई तो दवा के लिए भी कोई नही पुछता.' तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, शेतकऱ्यांची परिस्थिती एवढी वाईट आहे की दुभती गाय त्यांना महत्त्वाची वाटते. कष्टकरी महिला महत्त्वाची वाटत नाही. घरातील महिला काय, काढा घेतला तरी दुरुस्त होते. शरद जोशी यांचे जेवण नेहमी कार्यकर्त्यांच्या घरी असायचे. चुलीवरची भाकर जेव्हा एखादी महिला वाढायची तेव्हा चुलीवर तिला लागणारे चटके त्यांनी बघितले. संसाराचा गाडा हाकताना त्या मातेला बसणारे चटके त्यांनी बघितले. त्यातूनच शेतकरी महिलांना बोलते करण्यासाठी त्यांनी महिलांच्या बैठका घेतल्या, शिबिरांचे आयोजन केले, तिथे महिलांना भजन म्हणायला लावले. जात्यावरची गाणी म्हणायला लावली. असे करत करत गावोगाव शेतकरी महिलांना बोलते केले. महिलांनी शंभर टक्के ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या निवडणुका लढवाव्या आणि महिलांचा संपत्तीवर अधिकार असावा हा विचार मांडला. किंबहुना त्यावर तत्काळ अंमल करून महिलांना राजकारणात पुढे केले. यवतमाळच्या मेटीखेडा येथे महिलांचे वर्चस्व असलेली पूर्णपणे महिलांची ग्रामपंचायत त्यांच्या पुढाकारातून अस्तित्वात आली. समाजपरिवर्तनातून त्यांनी अनेक नवे विचार राबवले. दहा-दहा कि.मी. पायपीट करून त्यांच्या आंदोलनात महिला सहभागी व्हायच्या. वर्ध्यातील सेवाग्राम येथे महिलांच्या उपस्थितीत राज्यातील महिलांचे पहिले रेल रोको आंदोलन त्यांनी यशस्वी केले. १९८६ मध्ये शेतकरी महिला आघाडीची स्थापना केली. मंगलाताई अहिर या पहिल्या अध्यक्षा होत्या. आणि तेथूनच खऱ्या अर्थाने महिलांना राजकारणात संधी मिळाली. असा हा आम्हा शेतकऱ्यांचा सूर्य आज हरपला. शेतकरीच नव्हे, तर शेतकरी महिलांच्या चुलीपर्यंतचा विचार सांगणारा द्रष्टा नेता पुन्हा शेतकऱ्यांना मिळणार नाही. असा नेता आता पुन्हा होणे नाही. त्यांचा आचार, विचार, वागणूक या सर्वांचेच आम्ही अनुकरण केले.

- शब्दांकन : संजय पाखोडे