आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मशोधाची आनंदयात्रा (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘प्रवासाला सोबती हवा म्हणून तुम्ही एखाद्याची वाट पाहत असाल तर तुमचे उर्वरित आयुष्य नेहमीच वाट पाहण्यात जाईल,’ असे एक जीवनभाष्य आहे. प्रवास मग तो कोणताही असो, अगदी पळण्याचा असो, सायकलिंग करण्याचा असो, छोट्या नावेतून देशभ्रमंती, जगभ्रमंती करण्याचा असो वा चित्रकला, संगीत, एखाद्या कलेची निर्मिती असो. एकट्याने प्रवास केल्याशिवाय जीवनतत्त्व सापडत नाही. अनेकांचा गैरसमज असतो की एकांतवास म्हणजे एकाकीपण असते. वास्तविक हे दोन शब्द म्हणजे, वेगवेगळे टोकाचे जीवनानुभव आहेत. एकाकीपणात वेदना छळत असते, ती शारीरिक वा मानसिक असू शकते. एकांतवासात मात्र मनाला उभारी देणारा अनुभव असतो. ती चैतन्यमय, ऊर्जादायी असते, एक प्रकारचे आत्मभान, स्व-ओळखीचा तो प्रामाणिक प्रयत्न असतो. सध्या इंग्लंडमध्ये शिक्षण घेत असलेली, परंतु मूळ पुण्याची वेदांगी कुलकर्णी केवळ २० वर्षांची. पण या मुलीने गेल्या आठवड्यात सायकलवरून तब्बल २९ हजार किमी अंतर १५४ दिवसांत पार केले आणि सर्वात कमी वेळेत जगप्रदक्षिणा करणारी आशियातील पहिली सायकलपटू, तर जगातील तिसरी महिला सायकलपटू होण्याचा मान पटकावला. वेदांगीच्या वयात मुली शिकत असतात, त्यांना करिअरचे वेध लागलेले असतात. जग समजून घेण्याचे त्यांचे वय असते, पण ते समजून देणारा त्यांचा आसपासचा अवकाश मर्यादित असतो. वेदांगीने या मर्यादा मोडण्याचा निग्रह मनाशी केला आणि २०१६मध्येच म्हणजे वयाच्या १८ व्या वर्षी तिने मनाली ते द्रास हे अंतर सायकलवरून एकट्याने पार केले. या पहिल्याच अनुभवाने वेदांगीचा आत्मविश्वास बळावला व २०१८ या वर्षी काही तरी ‘स्पेशल’ करायचे या निर्धाराने तिने जगभ्रमंतीचा निर्णय घेतला. तयारीसाठी तिने दोन वर्षे घेतली. या काळात तिने आपल्या शारीरिक क्षमता विकसित केल्या. स्वत: ती इंग्लंडमध्ये क्रीडा व्यवस्थापनाचा अभ्यास करत असल्याने सायकलिंग जगाचे समृद्ध अनुभव तिने माहिती करून घेतले. महत्त्वाचे म्हणजे ७८ दिवसांत जगप्रवास करणाऱ्या मार्क बिऊमाँट यांची भेट घेण्यासाठी तिने ७०० किमीचा प्रवास केला व त्यांच्याकडून तिने हवामान व रस्त्यांची माहिती घेतली. मग वेदांगीची सुरू झाली जगभ्रमंती. ऑस्ट्रेलियातील पर्थ येथून सुरुवात झालेला हा प्रवास पुढे न्यूझीलंड, कॅनडा, आइसलँड, स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, डेन्मार्क, स्वीडन, फिनलंड, रशिया असे देश करत संपुष्टात आला व वेदांगीचे स्वप्न साकार झाले.  

 

वेदांगीने सायकलवरून किती दिवसांत किती देश पादाक्रांत केले हे कौतुकास्पद आहे, पण या तरुणीची एवढ्या लहान वयात एकट्याने प्रवास करण्याची जिद्द व जगाशी संवाद साधण्याचा ध्यासही अचंिबत करणारा आहे. अशा प्रकारची मानसिक स्थिती येण्यासाठी स्वत:ला समजून घ्यावे लागते. स्वत:चा स्वत:शी विस्कळीत झालेला संवाद रुळांवर आणण्यासाठी एकांतवासाला जवळ करावे लागते. वेदांगीने एकांतवासाला जवळ केले, त्यामुळे तिला तिच्या जगण्याचा उद्देश सापडला. तिची सायकलवरून सफर करण्याची इच्छा अत्यंत साधी व स्पष्ट होती. हे जग कोणाला सोबत न घेता एकट्याने फिरायचे आणि एकट्यानेच या जगातल्या निसर्गाशी, विविधतेशी, बहुसांस्कृितकतेशी संवाद साधायचा! आजच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाई बहुसंस्कृतीशी जोडली आहे, पण हा अनुभव तसा भासमयच. त्याच्यात एक प्रकारची कृत्रिमता आहे, लपवाछपवी आहे. त्यावर तंत्रज्ञानाचे कमालीचे नियंत्रण आहे. तंत्रज्ञानच आपल्या भावभावनांना नियंत्रित करतं. असं सगळं असताना माणसं प्रत्यक्ष भेटल्याशिवाय, बोलल्याशिवाय कळतील का? वेदांगीला हे लवकर लक्षात आले. जगभरच राजकीय-सामाजिक अस्थिरतेचे नवे आवर्तन अनुभवास येत असताना, मुख्य म्हणजे, माणसाला माणसापासून तोडणारी विद्वेषी विचारधारा वेगाने पसरत असताना, वेदांगीने नवनवी माणसं, त्यांची संस्कृती पाहायला घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि सोबत मित्र-सहकारी-सखी म्हणून केवळ सायकल घेतली. हे सगळं माणूस म्हणून समृद्ध करणारं आहे. वेदांगीच्या आईवडिलांना जेव्हा आपल्या मुलीचे हे जग समजून घेण्याचे ‘खूळ’ लक्षात आले तेव्हा त्यांनी तिचा आत्मविश्वास ढळू दिला नाही. उलट तिच्या २९ हजार किमीच्या प्रवासात ते तिच्यासोबत सावलीसारखे होते. रशियातल्या उणे १८ अंश सेल्सियस थंडीतून आपली मुलगी जंगली श्वापदांचा सामना करत प्रवास करते याचा त्यांना अभिमान वाटत होता. आपल्या खिशातले पैसे त्यांनी तिच्या या स्वच्छंदी व मनस्वी साहसासाठी खर्च केले. आपल्या मुलाला आपण काय देऊ शकतो, असा प्रश्न अनेक पालकांपुढे असतो, त्यांनी वेदांगीच्या पालकांचा आदर्श घेतला पाहिजे. हे जग सुंदर आहे, पण ते जाणून घेण्यासाठी पालकांनी मुलांना  आत्मशोधातून दृष्टी विस्तारण्याचे महत्त्वही आवर्जून  सांगायला हवे.

बातम्या आणखी आहेत...