आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मेच अर्थेच कामेच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्री-शिल्पकथा या सदराचा हा शेवटचा भाग लिहिताना शिल्पांकित स्त्रीची कितीतरी विलोभनीय रूपे नजरेपुढे येत आहेत. ही शिल्पे सर्वार्थाने भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीच्या सर्वोच्च आदरस्थानाचं  कालातीत प्रतीक आहेत. त्यांचा   मागोवा घेणे हे संस्कृती-परपरांचा नव्याने उकल करणे आहे...

 

गतवर्षभरातील शिल्पबद्ध स्त्रीची अनेक रूपे आपण पाहिली. कधी ती वत्सल माता म्हणून आपल्याला भेटली, कधी प्रेमळ पत्नी म्हणून, कधी स्वाधीनपतिकेच्या रूपात, तर कधी प्रोषितभर्तृका म्हणून, ती रागावलेली, ती मत्सरग्रस्त, ती उपवर, ती असहाय, किर अशा किती तरी रूपात, अविर्भावात ती आपल्याला भेटत आली. आणखी अशी कितीतरी रूपे तिची आहेत. वेदात ती गार्गी, मैत्रेयी सारख्या विद्वत्सभा गाजवणाऱ्या म्हणून तर पुराणात अनसूया, अहल्या म्हणून भेटतात. रामायण-महाभारतासारख्या आर्ष  काव्यात सीता, उर्मिला, शूर्पणखा, मंदोदरी, कैकयी म्हणून वा द्रौपदी, कुंती म्हणून भेटते. या एवढ्या प्रभावशाली आहेत, की सीतेमुळे रामायण घडले आणि द्रौपदीमुळे महाभारत.


इच्छित पती प्राप्त व्हावा म्हणून घोर तपश्चर्या करणारी पार्वती म्हणून ती आपल्याला वेरूळ लेणीत भेटते, उपवर म्हणूनही तेथेच भेटते, शिवाने गंगेला डोक्यावर बसविले म्हणून रूसलेली, रुष्ट झालेली, सारीपाटाच्या खेळात खोटं खेळणाऱ्या शिवाशी भांडणारी आणि सलज्जिता, सविनया, अधोवदना अशा नववधूच्या लोभसवाण्या रूपातही ती भेटते. खरं तर कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यात येणाऱ्या क्षणांचेच हे शिल्पांकन आहे.


ती भावार्थाने समर्पिता असते. विवाहोत्तरच्या कोणत्याही धार्मिककृत्यात पति समवेत असते. यज्ञप्रसंगी तर असतेच असते, असावेच लागते. एकदा ब्रह्मदेव यज्ञासाठी बसले असता, पाणी नसते, तर ते आणण्यास सरोवरापाशी गेलेल्या सावित्रीला उशिर होतो आहे, हे पाहून ब्रह्मदेव क्रोधदग्ध झाल्याचे पुराणात सांगितले आहे. तर राम जेव्हा यज्ञाला बसले, तेव्हा सीता नव्हती जवळ, त्यावेळी तिची सुवर्णप्रतिमा केली गेली होती, असे वर्णन आलेले आहे. वेरूळ येथील कैलास लेणीच्या नैऋत्य कोपऱ्यात यज्ञशाळा आहे. सप्तमातृका आहेत, शिव व गणेशही आहे. द्रोणचिनी प्रकारची यज्ञकुंडे आहेत आणि राष्ट्रकूट राजा पहिला कृष्ण याची पत्नी पाषाणात शिल्पीत केलेली आहे, तिथे थोडक्यात असे की, धर्मकार्यात ती पतिसमवेत असतेच असते.


ऐहिक गोष्टीत तिचा सहभाग फार मोलाचा असतो. अर्थाजर्नाच्या पतीच्या कार्यात कोणत्याही परिस्थितीत ती त्याच्या पाठीशी असते. त्याच्या भरभराटीच्या काळात जशी ती सहभागी असते, तशीच पडत्या काळातही ठामपणे त्याच्या पाठीशी असते. त्याप्रसंगी पडेल ते काम करण्यास ती मागचा पुढचा विचार न करता त्याच्या मदतीला धावून जात असते. आपला सौभाग्यालंकारही त्याच्या उपयोगी पडणार असेल तर द्यायला तयार होते, ती त्यागशील असते. ‘जेथे राघव तेथे सीता’. वाल्मिकी रामायण सांगते की, वसिष्ठ ऋषींनी सुचविले होते, की रामाला वनात जाऊ दे, रामासाठी निर्माण केलेल्या सिंहासनावर सीता बसेल आणि ती अयोध्येचे राज्य करील, असे असतानाही राज्यलोभ न ठेवता सीता रामाबरोबर अज्ञात वनात चौदा वर्षे खडतर वनवास भोसण्यासाठी जाते. तर द्रुपदराजाची लाडकी राजकन्या द्रौपदी पांडवाबरोबर चौदा वर्षाचा वनवास आनंदाने, पडेल ते ‘सोंग’ घेत पार पाडते. एकूण स्त्री कशी असते - त्यागशील, सहनशील आणि संयमी!


आणखी एका महत्त्वाच्या विषयात स्त्रीचा सहभाग कसा असतो, त्याचे स्वरूप कसे असते हे पाहाणेही आवश्यक ठरते. विश्वचक्र अखंडपणे चालावे म्हणून ब्रह्मदेवाने शिवाकडे पाहिले, तेव्हा शिव अर्धनारीच्या रूपात प्रगट होतात. संकेत याचा असा की, स्त्रीशिवाय संसारचक्र गतिमान होत नाही. त्यासाठी या दोहोंचे एकत्र येणे आवश्यक व अनिवार्य ठरते. ‘कामेच’ तिची साथ मिळावी लागते. अशावेळी सर्वस्व झोकून द्यायला तिची तयारी असते. काम एवढा प्रबळ असतो, की ती विश्वामित्रासारख्या ऋषीला, पुरुरवासारख्या राजाला एवढेच काय, तर इंद्रासारख्या देवालाही ग्रस्त करते. शंकराने त्याला कामबद्ध करायला आलेल्या कामदेवाला तृतीय नेत्र उघडून जाळले, तरी तो धुमाकूळ घालायला सदैव तयार असतोच.


आपल्याकडे कामशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले गेलेत. त्यातून स्त्री-पुरुष संबंधासंबंधी काही विवेचन केलेले अाहे. त्यात वर्णिलेल्या संभोगासनांचे शिल्पांकन खजुराहो, कोणार्क इत्यादी ठिकाणच्या मंदिरावर केलेले आढळते. महाराष्ट्रातल्या आणि अनेक राज्यातल्या मंदिरांच्या बाह्यांगावर अशी शिल्पांकने आढळतात. मंदिरांच्या अंतर्भागात नसतात. त्याचे दोन उद्देश सांगता येतील (१) मंदिरात दर्शनाला जाताना विषय विचार बाहेरच ठेवायचा असतो. (२) ओशो म्हणतात, त्याप्रमाणे संभोगाकडून समाधीकडे जावे लागते, म्हणजेच कामतृप्त झाल्याशिवाय ध्यान-चिंतन होऊ शकत नाही. आणि कामतृप्त व्हायचे, तर स्त्री-पुरुषांनी मुक्तपणे एकांतात ते सुख विविध आसनाधारे भोगायचे असते. अशा संभोगावस्थेची अनेक शिल्पांकने आढळतात. विविध प्रकारच्या कामलीलात मनोभावे स्त्री साथ द्यायला तयार असते, मग ते चुंबनालिंगने असतील की समागम प्रसंग असतील. राजीखुशीने संगनमतानेच विविध प्रकारची संभोगासने साध्य होऊ शकतात. स्त्री अशा प्रसंगीही साथ द्यायला तयार असते. थोडक्यात, ‘धर्मेंन्ध अर्थेच कामेच’ ती तिच्या माणसाबरोबर म्हणजे, पतिसवे असते...
(समाप्त)
संपर्क- udeglurkar@hotmail.com

 

 

बातम्या आणखी आहेत...