आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक: क्रिकेटमधील अँग्री यंग मॅन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेटमधील अँग्री यंग मॅन म्हणून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची क्रिकेट जगतात ओळख आहे. पण कोहली हा पहिला अँग्री यंग मॅन नाही. त्याच्या अगोदर हा किताब जातो तो दिल्लीतला ३७ वर्षे वयाचा खेळाडू गौतम गंभीरकडे. सामना खेळताना तो नेहमी धीरगंभीर, रागीट चेहऱ्याने मैदानावर वावरायचा. क्वचितच हसायचा. विरोधी संघाशी, खेळाडूंशी मैदानावर भांडायलाही तो कमी करायचा नाही. पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीबरोबर त्याने झगडा केला होता. एवढेच नाही तर त्याने दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज शेन वॉटसन याला कोपराने बाजूला केले होते. धाव काढत असताना वॉटसन मध्ये आला होता. याच सामन्यात गौतमने द्विशतक ठोकले. कॅमरन अकमलशीही त्याने भांडण ओढवून घेतले होते.

 

चूक असेल तर कोणाच्याही बाबतीत गप्प बसायचे नाही, हा गौतमचा स्थायीभाव. यामुळेच त्याने आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चक्क सध्याचा अँग्री यंग मॅन विराट कोहली याच्याशी पंगा घेतला होता. मतभेद, भांडण हे केवळ मैदानावरच झाले असे नाही, तर बाहेर क्रिकेट संघटनेच्या प्रशासनातल्या लोकांशीही संघर्ष करायचा. मनातलं बोलण्यासाठी कधीही न घाबरणारा खेळाडू म्हणजे गौतम गंभीर. विशेष म्हणजे केवळ क्रिकेटच नाही तर अन्य विषयावरही त्यांनी जाहीर मत प्रदर्शन केले आहे. मग ते जम्मू काश्मीरमधील दहशतवाद असो किंवा मध्य भारतात उफाळून आलेला नक्षलवाद असो.

 

कोणत्याही विषयावर मत प्रदर्शन करताना मूळ स्वभाव धर्मात असलेली बंडखाेरवृत्ती त्याने कधी सोडली नाही. अशा गौतमने मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ती जाहीर करतानाही त्याने माध्यम वापरले ते फेसबुकचे. निवृत्तीचा निर्णय जाहीर करणारा व्हिडिओ त्याने फेसबुकवर टाकला. गुरुवारपासून सुरू होणारा आंध्र प्रदेशविरुद्धची रणजी क्रिकेट सामन्यातली खेळी त्याची अखेरची असेल. 

 
ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्लीत द्विशतक ठोकल्यानंतरच त्याच्या भारतीय क्रिकेट संघातल्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले होते.  २००४ मध्ये त्याच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. २००७ पर्यंत त्याची खेळी अडखळतच चालली होती. पण त्यानंतर मात्र २०११ पर्यंत गौतम अतिशय फॉर्मात होता. २००७ मध्ये टी-ट्वेंटी आणि २०११ मध्ये एक दिवसीय क्रिकेट असे दोन्ही विश्वचषक भारताने जिंकले होते. टी-ट्वेंटीमधील अर्धशतकीय खेळीमुळे पाकिस्तानला भारताने दिलेले आव्हान पूर्ण करता आले नाही. तर भारतात झालेल्या दुसऱ्या विश्वचषक सामन्यातील गौतमच्या ९७ धावांमुळे जिंकण्याचा मार्ग सुलभ झाला होता. सुनील गावस्करसारखी फलंदाजीतील तांत्रिक सुंदरता, सफाईदारपणा गौतमकडे नव्हता. पण त्याच्या खेळामध्ये होता तो स्वभावातला बंडखोरपणा, धैर्य आणि धाडस, की जे आघाडीच्या खेळाडूसाठी आवश्यक असते. कणखरपणामुळे त्याची दखल घेणे लोकांना भाग पडायचे. शिवाय खेळताना दाखवलेल्या जबाबदारीमुळे कमावलेली कीर्ती ही लोकांच्या भुवया वर उंचावणारी होती. या त्याच्या सगळ्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे गौतमने आकडेशास्त्राच्या दृष्टीने फार मोठी विक्रमी कामगिरी केली, असे नाही. पण तो नेहमीच संघातला एक जबाबदार खेळाडू म्हणून गणला जायचा.

 
तरुण खेळाडूंसाठी क्रिकेट संघटनेतल्या दिग्गजांशी पंगा घेतानाही त्याने मागे-पुढे पाहिले नाही. घरची श्रीमंती असलेला गौतम सरावासाठी मैदानाकडे ड्रायव्हर असलेल्या कारमधून सुरुवातीपासून यायचा. त्यामुळे क्रिकेटमधून निर्माण होणाऱ्या दोन नंबरच्या पैशाचे त्याला कधीच आकर्षण वाटले नाही. अजय जडेजा व मनोज प्रभाकर यांच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप झाले होते. त्यांना दिल्ली संघाचे प्रशिक्षक म्हणून नेमण्यास  त्याने विरोध केला. कारकीर्दीला कुठलाही डाग त्याने लागू दिला नाही. सुनील गावस्करनंतर भारताचा एक उत्कृष्ट आघाडीचा खेळाडू अशी गौतमची प्रशंसा दस्तुरखुद्द वीरेंद्र सेहवागने केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये ४१५४ धावांची खेळी करणाऱ्या गंभीरच्या फलंदाजीत सेहवागचा झंझावात नसला तरीही त्याने संघाला उत्तम सुरुवात करून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. केवळ आक्रमकपणाच नाही तर न्यूझीलंडमध्ये ११ तासांची खेळी करून सामना वाचवण्याची त्याची कामगिरी अविस्मरणीय आहे. याच मालिकेत त्याने एका कसोटीत दोन डावात दोन शतके ठोकली होती. त्याच्या या कामगिरीमुळेच देशाबाहेरच्या मैदानावर भारताला अनेक वर्षांनतर विजय मिळाला. आयपीएलमध्ये त्याने दोनवेळा कोलकाता संघाला विजेतेपद मिळवून दिले खरे. पण त्यानंतर दिल्लीकडून खेळलेल्या दोन सामन्यातील अपयशामुळे गौतमवर कारकीर्द आेसरत असल्याची टीकाही झाली होती.  विश्वचषक सामन्यात केलेली महत्त्वाची खेळी आणि मैदानावर प्रतिस्पर्धी संघाशी घेतलेला पंगा, बंडखोर स्पष्टवक्तेपणा हा भारतीय क्रिकेट रसिकांना सदैव स्मरणात राहील.  ‑ निवासी संपादक, सोलापूर

 

बातम्या आणखी आहेत...