आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक: आदर्श रुग्णसेवेचे मानांकन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या शहराची ओळख जशी तिथल्या नागरिकांच्या वागण्यावरून होते तशीच ती तिथल्या संस्थांवरूनही होते. शहरातील संस्था कोणत्या दर्जाचे काम करीत आहेत यावर त्या शहराकडे पाहण्याचा दृष्टिकोन तयार होत असतो. औरंगाबाद शहरात अशा काही संस्था आहेत, ज्या त्यांच्या तत्त्वनिष्ठ आणि दर्जेदार कामांसाठी ओळखल्या जातात. महात्मा गांधी मिशन अर्थात, एमजीएम ही त्यापैकीच एक. या संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय शहरातील आर्थिक दुर्बलांसाठी मोठाच आधार बनले आहे. १२०० खाटांचे हे भव्य रुग्णालय सर्व अत्याधुनिक उपचार सुविधांनी सुसज्ज आहे. रुग्णाची परिस्थिती पाहून अत्यंत कमी दरात इथे उपचार उपलब्ध करून दिले जातात. आज त्या संदर्भात लिहिण्याचे कारण म्हणजे ‘एनएबीएच’च्या अधिस्वीकृतीची माेहोर त्यावर उमटली आहे.

 

एनएबीएच म्हणजे नॅशनल अॅक्रिडिएशन बोर्ड फाॅर हाॅस्पिटल्स. अर्थात, रुग्णालयांना अधिस्वीकृती देणारे राष्ट्रीय मंडळ. ज्या रुग्णालयाला या मंडळाची अधिस्वीकृती मिळते त्या रुग्णालयातील कार्यपद्धती आणि उपचारांचा दर्जा हा अतिउत्तमच असणार याविषयी शंका राहत नाही. कारण या मंडळाची स्वीकृती तेव्हाच मिळते ज्या वेळी दर्जाच्या बाबतीत मंडळाच्या सदस्यांची अनेकदा खात्री होते. या संदर्भातले एक उदाहरण उल्लेखनीय आहे. या मंडळातील परीक्षकांच्या एका दौऱ्याच्या वेळी परीक्षक मंडळातील सदस्या प्रसूती कक्षात पाहणी करीत होत्या. त्यापैकी एका महिलेने अचानक एका पलंगावरील बाळ उचलले आणि ती पळायला लागली. नंतर कळले की, अशा घटना घडल्या तर या कक्षातील डाॅक्टर्स आणि परिचारिका नेमके काय करतात, याची त्या परीक्षा घेत होत्या. एका पथकाने एका मावशीला (रुग्णालयात सफाईचे काम करणारी महिला) ती कॉरिडॉरमधून जात असताना अचानक थांबवले आणि कोणत्या कक्षात काम करते, हे विचारले. तिने आॅपरेशन थिएटरमध्ये काम करीत असल्याचे सांगितल्यावर तिथेच तिची परीक्षा सुरू झाली. आॅपरेशनच्या वेळी खाली रक्त सांडले तर तू ते कसे साफ करशील, असे थेट विचारले गेले. त्या मावशीने योग्य उत्तर देऊन रुग्णालयाला उत्तीर्ण करून दिले. अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यातून रुग्णालयाची वारंवार कठीण परीक्षा घेण्यात आली आहे. हेच या अधिस्वीकृतीचे महत्त्व आहे.

 

बाराशे रुग्णसंख्या आणि १८०० कर्मचारी संख्या असलेल्या हाॅस्पिटलसाठी ही अधिस्वीकृती मिळवणे म्हणजे दिव्य होते. पण रुग्णालयाचे प्रमुख कार्याधिकारी (सीईओ) डाॅ. प्रवीण सूर्यवंशी सांगतात, रुग्णालयातील सर्व सहकाऱ्यांनी मनावर घेतले आणि बदल स्वीकारले म्हणून हे शक्य झाले. ही अधिस्वीकृती मिळवणारे राज्यातले हे पहिलेच वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय आहे. देशात याचा ११ वा क्रमांक लागतो. या रुग्णालयाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक वर्षे मेहनत घेऊन या रुग्णालयाने स्वत:च्या आदर्श कार्यपद्धती (एसओपी) स्वत: तयार केल्या. सुमारे २५० एसओपी रुग्णालयाने तयार केल्या आहेत आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. बहुतांश हाॅस्पिटल्स ही अधिस्वीकृती मिळवण्यासाठी एजन्सीला काम देतात. ती एजन्सी सर्व ठिकाणी सारखेच एसओपी आणि सारखेच फाॅर्म बनवून देते. पण त्यामुळे आपण हे का करीत आहोत आणि एखादा फाॅर्म का भरत आहोत याची समज कर्मचाऱ्यांत विकसित होत नाही, असेही डाॅ. सूर्यवंशी सांगतात.  

 

रुग्णालयाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी किमान ५०० प्रशिक्षण कार्यशाळा या काळात घेण्यात आल्या. त्या माध्यमातून सर्वांना आदर्श कार्यपद्धतीचे ट्रेनिंग दिले गेले. शंभरहून अधिक फाॅर्म्स तयार करण्यात आले आहेत. रुग्ण दाखल झाल्यापासून कमीत कमी वेळेत त्याच्यावर उपचार झाले पाहिजेत आणि कमीत कमी वेळेत तो बरा होऊन हाॅस्पिटलच्या बाहेर गेला पाहिजे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून हे सारे करण्यात आले आहे. या अधिस्वीकृतीमुळे या रुग्णालयाचे नाव देशपातळीवर होईल, हे खरे असले तरी त्यापेक्षा महत्त्वाचे काम होते आहे ते परिणामकारक रुग्णसेवेचे. या नामांकनामुळे रुग्णालयाची कार्यपद्धती आदर्श झाली आहे. परिणामी रुग्णालयाचा सक्सेस रेट वाढला आहे. ब्ल्यू अलर्टसारख्या सिस्टिममुळे गंभीर अवस्थेत गेलेल्या रुग्णाजवळ अवघ्या २० सेकंदांत सपोर्ट सिस्टिम पोहोचू लागली आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळाल्याचे समाधानच आमच्यासाठी मोठे आहे, असे डाॅ. प्रवीण सूर्यवंशी सांगतात. या कार्यपद्धतीची सवय वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असलेल्या उद्याच्या डाॅक्टरांना होईल, ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. पुढच्या आयुष्यात ते त्याच पद्धतीने काम करीत राहतील आणि आदर्श सेवा रुग्णांना देतील. या रुग्णालयाच्या या कामगिरीमुळे औरंगाबाद शहराला नवी ओळख मिळाली आहे, हेही महत्त्वाचे आहे .   

बातम्या आणखी आहेत...