झायराची माघार देशासाठी / झायराची माघार देशासाठी अपमानास्पद

देवेंद्रराज सुथार

Jan 23,2017 03:00:00 AM IST
१६ वर्षांची काश्मिरी कन्या मोठ्या मुश्किलीने आई-वडिलांची परवानगी मिळवते आणि ऑडिशन दिल्यानंतर ‘दंगल’ चित्रपटात काम करण्यासाठी निवडली जाते. उत्तम अभिनयाच्या जोरावर तरुणांसाठी आदर्शही ठरते. परंतु एक दिवस अचानक फेसबुकवर मिळालेल्या धमक्यांसमोर माघार घेते. सार्वजनिकरीत्या माफी मागते व म्हणते, ‘मला रोल मॉडेल वगैरे बनायचे नाही. मी कुणासाठीही आदर्श नाही, कुणीही माझे अनुकरण करू नये.’

अशा प्रकारचे वक्तव्य करताच झायरावर चहुबाजूंनी टीका सुरू होते. कुणीही १६ वर्षांच्या या अल्पवयीन मुलीच्या मनात काय सुरू आहे, याचा विचार करत नाही. किती भयंकर दबावापुढे तिने असे वक्तव्य केले असेल, हे जाणून न घेताच झायराच्या वक्तव्यावर टीका करणे कितपत योग्य आहे?
स्वातंत्र्यपूर्तीच्या सात दशकांनंतरही देशात महिलांसाठी सुरक्षित वातावरण नसणे, हा आपल्या लोकशाहीचा सर्वात मोठा उपहास आहे.

राजधानी दिल्लीतील रस्ते असो वा सायबर सिटी बंगळुरू.. आजही महिला सुरक्षित नाही. दहावीत ९२ टक्के गुण मिळवणारी मुलगी, जिने अन्याय आणि असत्याशी लढण्याचे शाळेत शिकले असेल अशी मुलगी कट्टरपंथीयांशी लढण्याऐवजी आपले पाऊल मागे घेते. मग समाजातील शिकलेल्या आणि न शिकलेल्या मुलींमध्ये काय फरक उरतो? विशेष म्हणजे जिथे हे घडते, तेथील मुख्यमंत्रीही महिलाच आहेत. मुलींनी अशा प्रकारे पुढे जाणे दहशतवाद्यांना सहन होत नाही. मुलींच्या पायात बेड्या घालून तिला पुढे जाण्यास रोखण्याचा संदेश कोणता धर्म देतो? या कट्टरपंथीयांना सडेतोड उत्तर देण्यासाठी कुणी पुढाकार घेत नाही तोपर्यंत कथित धर्मानुयायी अशी कारणे देत झायरासारख्या कित्येक प्रतिभासंपन्न मुलींच्या मन आणि बुद्धीवर घाव घालण्याचे काम करतच राहतील.
देवेंद्रराज सुथार, २०
जयनारायण विद्यापीठ, जोधपूर
X
COMMENT