आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवी अस्तित्वाचे अचूक भाषांतरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजातील एकाकी आणि शापित माणसाच्या कारुण्याच्या कथा सुदाम राठोड यांच्या कवितेचा आधार आहे. या विसंगतीमधून मार्ग काढण्याचे केवळ दोनच पर्याय एक-परमेश्वरशरणता आणि दोन - आत्महत्या. कवीला  हे दोन्ही मार्ग मंजूर नाहीत. त्याने  काढलेला तिसरा मार्ग म्हणजे द्रोह!... प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधातला विद्रोह. त्याचेच प्रतिबिंब प्रस्तुत काव्यसंग्रहात उमटते...

 

कोणताही वाङ्मयीन जाणिवेचा आद्य उद्गार हा सर्वप्रथम कवितेच्या रूपाने आविष्कृत होत असतो. कविता हा वाङ्मयप्रकार सर्वश्रेष्ठ मानला जातो, त्याचे मूळ त्याच्या संकेतार्थातील सूचनक्षमतेत आहे. कवितेला अंतर्मुख आणि बहिर्मुख असे दोन डोळे असतात. एका डोळ्याने स्वतःला संस्कारित करण्याची संधी असते, तर दुसऱ्या डोळ्याने समाजवास्तव डोळसपणे समजून घेण्याची गरज असते. पण  हे डोळे जेव्हा हातांनी फोडले जातात, तेव्हा साहित्य निर्मिती थंड होते. साहित्य निर्मिती थंड झाली की संधीसाधू डल्लामारांचा सुळसुळाट होतो. सर्वात आधी ते धर्मात शिरतात, मग राजकारण, समाज, शिक्षण आणि साहित्यातही या मंडळींचा सुळ्सुळाट होतो, जेव्हा डल्लामारांच्या हाती सत्ता जाते, तेव्हा सामान्य लोकांचा उद्यावरचा भरोसा उडून जातो. शेतकऱ्यांना जमीन नांगरावीशी वाटत नाही. कष्टकऱ्यांना हातपाय हलवावेसे वाटत नाहीत. भुकेकंगालांच्या तोंडचा घास गर्भश्रीमंत पळवून नेतात, जेव्हा सगळीकडून दुर्गंधी येऊ लागते, जेव्हा सरकारी कचेरीतील कागदपत्रे लुटली जातात, दस्तऐवज नष्ट केले जातात आणि जेव्हा ज्ञानाचा बागुलबुवा चवताळलेल्या नागासारखा आपलाच पाठलाग करतो, तेव्हा समाजाच्या अस्वस्थतेचा स्फोट होण्याऐवजी तो समाजव्यवस्थेसमोर शरणागती पत्करतो, तेव्हा त्या देशाचा विनाश अटळ असतो. याविरोधात जे कवी बेडरपणे उभे राहतात, तेच खरे शब्द आणि तेच खरे कवी असतात. या पार्श्वभूमीवर ‘कवीच पृथ्वीला वाचवू शकतात सर्वनाशापासून’,असे लिहिणाऱ्या महाकवी नामदेव ढसाळ यांचा वारसा सांगणाऱ्या सुदाम राठोड यांचा "आपल्यात कुणीही युद्धखोर नव्हते" हा शब्द प्रकाशनाने प्रकाशित केलेला कवितासंग्रह अत्यंत लक्षवेधी आहे.


सुदामची कविता म्हणजे, देशाच्या विनाशकारी संक्रमणकाळातली गोष्ट आहे. मागील १०-१२ वर्षात जाती अस्मितेच्या राजकारणामुळे समस्या कमी होण्याऐवजी त्या अधिक झाल्या. त्याचा  परिणाम दुर्बलांच्या आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषणात झाला, स्त्रीपेक्षा गाय श्रेष्ठ ठरवली गेली आणि माणसांचे वस्तूकरण करून त्याला जीएसटी लावला गेला. विविध चळवळींचे विघटीकरण करण्यात आले. या सगळ्यांचे पडसाद सुदामची कविता टिपते.  


स्वतःच्या अस्तित्वाचे भान हरपलेल्या संपूर्ण समाजासाठी कविता लिहिणे ही गोष्ट सामाजिक कारणांचा परिणाम नसतो. तर ते सामाजिक परिणामांचे कारणही असू शकते, हे सुदामची कविता दाखवून देते.


विद्रोह अस्वस्थ व्यवस्थेचा  सारांश असतो, जिथे अस्वस्थता असते, तिथे आनंद नसतो. मरेपर्यंत अस्वस्थतेत जगावं हा कलावंताने स्वेच्छेने निवडलेला पर्याय नसतो. समाजाच्या आनंदासाठी त्याची तडफड असते. कुत्रा चावलेल्या माणसाला निर्दयीपणे भसाभस पोटात इंजेक्शन देऊन त्याला त्रास द्यावा असं कुठल्याही डॉक्टरला वाटत नाही, पण तो माणूस पिसाळू नये हे त्यामागचं शास्त्र आहे. या पिसाळलेपणातून माणसाची सुटका व्हावी यालाच आम्ही भाषेत सौंदर्यशास्त्र मानत आलो आणि सुदाम राठोड यांची कविता  या सौंदर्यशास्त्राला नेमकेपणाने आपल्या कवेत घेते. कलेचे हेर मात्र हे समजून घेण्याऐवजी विद्रोही भूमिका घेणाऱ्याला तो कायम अस्वस्थ राहावा, अशी व्यवस्था करतात. ही संसर्गजन्य  विकृती वाङ्मयीन क्षेत्राचं नुकसान करणारी आहे.


उदा. सुदाम राठोड आपल्या "मूठभर लोकं' या कवितेत म्हणतो, ‘ही मूठभर लोकं अत्यंत हुशार, भाडखाऊ आणि धार्मिक असतात...’
स्त्रीबद्दलची सुदाम राठोड यांची जाणीव अत्यंत प्रगल्भ आहे. त्यांच्या कविता, त्यातील आशय  भारतीय स्त्रीवादाचा आणि एकूण भारतीय समाजरचनेमध्ये स्त्रीदुःखाच्या मुळापर्यंत जाण्याचा एक मार्ग सशक्तपणे आपल्यासमोर आणून ठेवतो. स्त्रियांच्या दुःखाच्या मुळापर्यंत आपण का पोहोचू शकलो नाही याचे नेमकेपणाने विश्लेषण कवीने आपल्या "हे सुंदर फेमिनिस्ट कवयत्रे', कवितेतून केलेलं आहे.
तुझ्या चळवळी, तुझे कँडल मार्च
तुझ्या एनजीओ, तुझे इझम
इथला विनाश थांबवू शकतील काय?
किंवा
‘योनीमीमांसा’सारखी त्यांची कविता भारतीय सत्ताशास्त्राचे गुपित उघड करून पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या कानाखाली सणसणीत चपराक लगावते.
रोज घराघरात फक्त बायका जाळल्या जात नाहीत 
तिची योनी जाळली जाते संशयाच्या आगीमधे
सगळ्याच धर्मांनी योनीविरुद्ध साक्ष दिली आहे
सगळ्याच प्रेषितांनी योनीचा निषेध केला आहे
किंवा 
चेहऱ्यावर फेकलेले अॅसिड फक्त अॅसिड नसते
तो भयंकर दुस्वास असतो योनीविरुद्ध साचलेला...
इथे कवीची धारणा आपल्या विचाराना तत्वचिंतनात्मक पातळीवर घेऊन जाण्यात यशस्वी ठरते...
कला ही त्याच्या दृष्टीने एक बंडखोरीच आहे. अर्थात ही बंडखोरी नकारात्मक नसून अप्रिय ते नष्ट करण्यासाठी, अनुकूल बदलासाठी नवनिर्मितीसाठी आवश्यक आहे, ही त्याची भूमिका आहे. आणि आपली भूमिका तो कोणत्याही पातळीवर सोडण्यास तयार नाही याचे प्रत्यंतर खालील काही ओळींमधून येऊ शकेल,
मला सनी लिओनचा उन्माद
आणि नेमाडेचा देशीवाद
यात वाटत नाही कुठलाच फरक
सर्जनाच्या सगळ्याच शक्यता
याने टाकल्या आहेत जिरवून
आणि आणली आहे एक तात्पुरती झिंग
त्याला कुणी क्रांती म्हणो वा परिवर्तन
मी प्रतिक्रांतीच म्हणणार आहे
मी प्रतिपरिवर्तनच म्हणणार आहे


सुदाम राठोड हा स्टंट करून प्रसिद्धी मिळवण्यासाठी धडपडणारा, त्यासाठी आक्रस्ताळेपणा करणारा कवी म्हणून त्यांना बाजूला सारण्याचाही प्रयत्न झाला, आजही होतो. मात्र शब्दांचे स्वभाव समजून न घेता टीका करणे, हे कोणत्याही वाङ्मयीन संस्कृतीत बसण्यासारखे नाही, किंबहुना, सुदाम राठोड यांच्या कवितेचा एक वेगळा प्रभाव आहे त्याचे मूल्य आपणास नाकारता येणार नाही. जगाचा डोळसपणाने इतिहास पाहिला  तर ज्ञान-विज्ञान युगाचा आद्य प्रणेता देकार्त मानला जातो. देकार्तने मानवाच्या अस्मितेची स्वायतत्ता व सर्वोच्चता ही कोणत्याही अदृश्य शक्तीपेक्षा मोठी असते असे प्रतिपादन  केले, हे करण्यासाठी आपल्याला बाबूराव बागुलांची  वाट पाहावी लागली. त्यानंतर कुठे ईश्वरापेक्षा माणूस  श्रेष्ठ आहे, हे आम्हाला कळले. तिकडे कांट म्हणत होता, श्रद्धेला जागा करून देण्यासाठी ज्ञानाला नाकारणे, मला आवश्यक वाटले आणि इकडे आपण ज्ञानाची जागा रिकामी करून श्रद्धा प्रस्थापित केली, त्यांचे आपल्याकडील प्रवक्ता बनले भालचंद्र नेमाडे! श्रद्धा ज्ञानापेक्षासुद्धा महत्त्वाची  हे सांगण्यात त्यांनी आपली हयात घालवली. तिकडे अल्बेर  कामू यांनी बंडखोरीचे तत्त्वज्ञान मांडले इकडे सुदाम राठोड विद्रोहाचे तत्त्वज्ञान घेऊन उभा आहे. या केवळ योगायोगाच्या  गोष्टी नाहीत.


संवेदना मेलेली नाही अशा कोणत्याही सामान्य माणसासारखेच कवीला पण एक जग असते, तो बहिणीबद्दल लिहितो, आईबद्दल लिहितो, वडिलांबद्दल लिहितो, तेव्हा कवितेची भाषा हळवी होते, मृदू, कोवळी होते. त्यामध्ये एक प्रकारची आर्तता येते .
सुदाम राठोड ‘आईच्या सुखासाठी’ या कवितेत लिहितात, 
मी जाणतो आहे, तुझ्या उदात्तीकरणाचं राजकारण 
तुला बहाल केलेल्या दैवत्वाचं मूळ
आई जमलंच, तर हे आईपणाचं ओझं जरा बाजूला ठेव 
तुझ्यातल्या बाळाला हलवून जागं कर 
हे आभाळ तुझ्यासाठी खुलं आहे 
आई आता मला तुझी आई बनू दे!
धर्माच्या युद्धात आईवडील आपले राहिले नाहीत, जातीय युद्धाने बहीण गमावली, सांस्कृतिक युद्धात समाज जळतो आहे, आपण युद्धखोर नसताना  सगळं घडतेय हे वजाबाकीचे गणित कवीला अस्वस्थ करणारे आहे. ही अस्वस्थता वाचकांनी समजावून घेतली, तरी आपल्यात कुणीही युद्धखोर नव्हते या कवितेचे सार्थक होईल यात शंका नाही!    

 

लेखकाचा संपर्क : ८५५२९००२२०
(लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पोस्ट डॉक्टरल रिसर्चर आहेत.)

बातम्या आणखी आहेत...