आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नात्यांचे चक्रव्यूह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी लघुकथेत अरविंद गोखले आदी कथाकारांनी मनोविश्लेषणात्मक लघुकथांचे स्कूल समृद्ध केले होते. पुढे ही परंपरा म्लान झालेली दिसते. प्रा. मिलिंद जोशी यांच्या कथा या परंपरेला आश्वस्त करू पाहतात...

 

तमाच्या तळाशी’ आणि ‘पानगळ’ या दोन कथासंग्रहांनंतरचा प्रा. मिलिंद जोशी यांचा ‘खेळ’ हा तिसरा कथासंग्रह प्रामुख्याने नात्यांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या माणसांच्या कथा वाचकांसमोर ठेवतो. एकूण आठ लघुकथांचा या संग्रहात समावेश आहे. खेळ या शीर्षककथेचा विस्तार तीन भागांत वाचकाला भेटतो. स्वप्रेरणेने उद्युक्त झालेली, फक्त आपल्या प्रेरणांनाच मानणारी या कथेची नायिका ही एक सहजमुक्त आधुनिक स्त्रीव्यक्तिरेखा आहे. आधुनिक स्त्रीजीवनातील ताणतणावांचे, तिच्या मानसिकतेचे धीट चित्रण या कथेत दिसते. गुन्हा प्रत्यक्षात उघडकीस न आल्याने नायिकेला शिक्षा झालेली नाही. परंतु कालांतराने तिच्या नेणिवेतील मनोगंडांनी घडवलेले कथानक फ्लॅशबॅक तंत्र आणि तृतीयपुरुषी निवेदन पद्धतीने लेखकाने उलगडले आहे. मानवी मन ही किती गुंतागुंतीची गोष्ट आहे, त्याचा तळ शोधताना लेखक म्हणतात,‘खेळात प्रत्येक क्षणी जी उत्कंठावर्धक अनिश्चितता असते, तशीच ती जीवनातही असते. खेळात सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे घडत नाहीत. तरीही तो खेळ खेळायचा असतो. मैदानातल्या खेळांना एक शेवट असतो, पण मानवी नात्यांच्या खेळाला शेवट नाही. माणूस गेला तरी त्याच्यासोबतच्या नातेसंबंधांमुळे वाट्याला आलेल्या दु:खभोगांच्या कहाण्या इतरांना अंतापर्यंत छळत राहतात..’ लेखकाच्या या विधानाचा प्रत्यय ‘अधांतरी’, ‘वाडा’, ‘झोपाळा’, ‘भोगिले जे दु:ख त्याला’ इत्यादी कथांमधून येतो. नात्यांमधील नाट्य या कथा चित्रित करतात. ‘वाडा’, ‘झोपाळा’ या कथांत प्रतीकांचा अर्थपूर्ण वापर दिसतो. घटनाप्रधान कथानकाकडून मनोविश्लेषणप्रधान दिशेने मराठी कथेने घेतलेले वळण अधोरेखित करणाऱ्या या कथा वाटतात.


समाजजीवनातील बदलत्या प्रवाहांचे भान ‘ती’, भोगिले जे दु:ख त्याला’, ‘खेळ’ या कथा मांडतात. नैतिक पातळीवरील नात्यांमधील अवमूल्यन समाजाला व्यापणारे वाटते. नात्यांतून निर्माण होणारा मानसिक संघर्ष, हा प्रा. जोशी यांच्या कथालेखनाचा गाभा वाटतो. त्यामुळे नात्यांतील नानाविध रूपांची दर्शने घडविणारी, नात्यांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करणारी त्यांची स्वत:ची निवेदनशैली कथालेखनातून भेटते.  आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची जपणूक करू पाहताना विवाहित कथानायिकांसमोर जे पेच उभे राहतात, त्याचा गांभीर्याने वेध लेखक घेतो. आत्मप्रतिष्ठेचे भान असलेली आधुनिक सुशिक्षित स्त्रीपात्रे दिसतात.  स्वच्छंदपणे बागडणारे मोकळे मन आणि त्याला बंदिवान करणारे आकुंचित अंगण, त्यातून निर्माण होणाऱ्या तणावांचे मार्मिक चित्रण प्रस्तुत कथांतून प्रा. जोशी करतात. प्रा. जोशी कथेतील पात्रांच्या भावविश्वाला सामाजिक व मानसिक असे दुहेरी परिमाण प्राप्त करून देतात. माणसातील विक्षिप्तपणा शोधण्याचाही ते लेखक म्हणून प्रयत्न करतात. मराठी लघुकथेत अरविंद गोखले आदी कथाकारांनी मनोविश्लेषणात्मक लघुकथांचे स्कूल समृद्ध केले होते. पुढे ही परंपरा म्लान झालेली दिसते. प्रा. मिलिंद जोशी यांच्या कथा या परंपरेला आश्वस्त करू पाहतात.

बातम्या आणखी आहेत...