आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमेतून वाहतं काळं निळं पाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘कास्टिंग काऊच' केवळ सिनेसृष्टीतच आहे, असा आपला भ्रम आहे. खरं तर त्याचं अस्तित्व सगळ्याच क्षेत्रात ऑक्टोपसच्या हातांसारखं विक्राळ पसरलेलं आहे. मराठी साहित्यविश्वाचाही याला मुळीच अपवाद नाही. विचारा अनेक कवयित्री, लेखिकांना. अनेकानेक अनुभव आहेत एकेकींचे. दाहक. तिरस्करणीय...

 

नुश्री दत्ताने माध्यमविश्वात हलकल्लोळ माजवला आहे. तिच्या निमित्ताने अनेक जणी आजवर दडपून ठेवलेल्या, त्यांच्या दुखऱ्या कहाण्या वदत्या झाल्या आहेत. बॉलिवूडमधील ‘आपल्या’ मराठमोळ्या  नानापासून अनेक रथी महारथी, पत्रकारितेमधले वरिष्ठ पत्रकार, संपादक, कॉमेडी शोजमधले दिग्गज, इंग्रजीत लिहिणारे भारतीय लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार अशा अनेक नरपुंगवांनी कामानिमित्ताने त्यांच्या सहवासात येणाऱ्या स्त्रियांशी जे घृणास्पद वर्तन केले आहे, ते ‘मी टू’ मोहिमेच्या निमित्ताने रोजच्या रोज बाहेर येत असून, आता तर त्याला अचानक वारूळ फुटल्यावर सैरभैर धावणाऱ्या टोणग्या मुंगळ्यांचं रूप आलं आहे. मुळात कशाला लैंगिक छळ म्हणायचं आणि कशाला नाही, याबद्दलच्या चर्चेचे पतंगही खूप उडवले जाताहेत सध्या. ‘इतकी वर्ष या बाया का गप्प राहिल्या?’, ‘हे प्रकार तर किरकोळच आहेत, लैंगिक अत्याचार म्हणजे काय हे यांना कळतं तरी का?’, ‘या पोरी कामं मिळत नसल्याने नैराश्यातून किंवा स्वस्त आणि सनसनाटी प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे प्रकार रचून सांगत आहेत’, अशी मुक्ताफळं उधळली जात आहेत आणि बोलणाऱ्या स्त्रियांनाच गुन्हेगार ठरवलं जात आहे. 


साहजिकच खऱ्या गुन्हेगारांचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढतो आहे. ‘मी दीडशे-दोनशे लोकांसमोर तिच्यासोबत होतो, त्यांच्यासमोर कसं काय मी असं वर्तन करू शकतो? ती खोटं बोलतेय’, हे पाटेकर महोदयांचे उद्गार किंवा ‘मी तर तनुश्री दत्ताही नाही आणि नाना पाटेकरही नाही त्यामुळे मी या विषयावर कसं काय बोलू? तुम्ही मला काहीच विचारू नका’, असे ‘शहेनशहा’ अमिताभ बच्चन यांचे उद््गार मुळात एकच आहेत. ‘पिंक’ चित्रपटात ‘नो मीन्स नो' म्हणणारे श्रीयुत बच्चन एका अत्यंत कमिटेड वृद्ध वकिलाच्या भूमिकेत दिसतात. जीव ओतून अभिनय करतात. तेच बच्चन भूमिकेबाहेर येताच अत्यंत सोयीस्कर विधाने करू लागतात. ‘एकमेकांस साहाय्य करू, अवघे धरू कुपंथ’ हेच या पुरुषी अवकाशातलं ब्रीदवाक्य आहे, की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आपल्या भोवतालात दिसते आहे.


मुळात एखाद्या पुरुषाचा नकोसा असलेला स्पर्श, तर चिमुरडी मुलगीही ओळखू शकते. या सगळ्याजणी तर त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात धडपडणाऱ्या, करिअर करू पाहणाऱ्या, जाणत्या. डोळ्यात असंख्य लुकलुकणारी स्वप्नं घेऊन संघर्ष करणाऱ्या आणि होय, ’ही अर्धी पृथ्वी आमचीही आहे' असं सांगू पाहणाऱ्या वेगवेगळ्या चेहऱ्यांच्या स्त्रिया आहेत. यातल्या प्रत्येकीची सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक पार्श्वभूमी वेगवेगळी आहे, पण प्रत्येकीचं स्वप्नं मात्र एकच आहे. अर्थवाही जगण्याचं स्वप्न. आपल्या नावाची मुद्रा सकारात्मक व ठळकपणे उमटवण्याचं स्वप्न. पण यातल्या अनेकींना अशा नकोशा लैंगिक अत्याचारांच्या अनुभवांमधून जावं लागलेलं आहे. ‘कास्टिंग काऊच'चा अडथळा पार करावा लागलेला आहे. हा काऊच केवळ सिनेसृष्टीतच आहे, असा आपला भ्रम आहे. खरं तर त्याचं अस्तित्व सगळ्याच क्षेत्रात ऑक्टोपसच्या हातांसारखं विक्राळ पसरलेलं आहे. आजवर तर त्या बोलतही नव्हत्या. मनाच्या तळघरात त्यांनी गाडून टाकल्या होत्या, त्या आठवणी. आठवणीतही नको राह्यला काहीच म्हणून थडगीही बांधली असतील, काहींनी त्याची, इतके किळसवाणे अनुभव असतील ते. पण थडगी बांधली, तरी प्रश्न सुटत नसतात. संकोच, लज्जा, भीती, खेद, संताप, अश्रू या सगळ्या भावानुभवांचं खदखदणारं रसायन किती जणी किती काळापासून स्वतःच्या उरात साठवत असतील, ते त्याच जाणोत. काहीच घडलेलं नाही, सर्व काही आलबेलच चाललेलं आहे आमच्या क्षेत्रात, असं वरकरणी दर्शवत केवळ या स्त्रियाच नव्हेत, तर त्या अनुभवांना साक्षी असलेले अन्य सगळेही आला दिवस साजरा करत असतात. मराठी साहित्यविश्वाचाही याला मुळीच अपवाद नाही. विचारा, अनेक कवयित्री, लेखिकांना. अनेकानेक अनुभव आहेत एकेकींचे. दाहक. तिरस्करणीय. काही जणी तर त्या जखमा उराशी वागवत जगाचा निरोप घेत्या झाल्यादेखील.


...पण मी मात्र सर्व काही आलबेल आहे, असं नव्हते दाखवत कधीच. एवढंच कशाला, मी त्याला वारंवार सांगतही होते, की ‘अरे का असा वागतोयस माझ्याशी? मला त्या अर्थाने नाही आवडत तू. नाहीए माझं प्रेम तुझ्यावर. नव्हतं कधीच. तू माझा एक आवडता कवी आहेस. खूप आदर वाटतो, मला तुझ्याविषयी. तू ज्या समूहातून आला आहेस आणि ‘उलगुलान’ची घोषणा देतोस तप्त आवाजात, तिथे तर स्त्रीच्या इच्छेशिवाय काहीच घडत नाही कधी. तू मातृसत्ताक समाजाचा प्रतिनिधी ना... तू असं वागावंस?’ 


पण त्याला जणू काहीच ऐकू जात नव्हतं. अक्षरशः कान बंद करून घेतले होते त्याने. मी तेव्हा नुकतीच कविता लिहू लागले होते. माझा पहिला संग्रहदेखील प्रसिद्ध झाला नव्हता त्या काळातली ही गोष्ट. महाविद्यालयीन विद्यार्थिनी होते मी. हैद्राबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ‘ऑल इंडिया दलित रायटर्स कॉन्फरन्स’साठी गेलेले असताना तोही तिथे निमंत्रित होता. सहकुटुंब आला होता. आमच्या शेजारचीच रूम त्यांना मिळालेली. मी जेव्हा त्याच्या बायकोला ‘मला साडी नेसायची आहे, पण नेसता येत नाही, तुम्ही मदत कराल का?’ असं विचारायला गेले, तेव्हा त्याची बायको हसून म्हणाली, ‘ये इकडे आमच्या रूममध्येच. नेसवते तुला.’ मग मी परकर ब्लाउजवर त्यांच्या रूममध्ये साडी घेऊन गेले. इतकी बारकुंडी होते मी. लहानही. एस.वाय.बी.ए.ला शिकणारी. तो हसतच होता. बायकोनं बळंच त्याला बाहेर जायला लावलं. तो कवी नंतर एक दोन वर्षातच माझं लग्न झाल्यावर, मी प्राध्यापिका म्हणून नुकतीच जॉईन झाल्यावर, मला दीड वर्षाचा मुलगा असताना वगैरे एक दिवस अचानकच भर दुपारी न सांगता सवरता घरी आला, पुस्तक देण्याच्या निमित्ताने. घरात मी एकटीच होते.  आगत स्वागत झाल्यानंतर मी जेव्हा चहा करायला किचनमध्ये गेले, तेव्हा एकाएकी तो मागून आला आणि पाठीमागून त्याने मला मिठी मारली. काय होतंय हे कळण्याआधीच त्यानं माझं तोंड फिरवून जबरदस्तीने किस घेण्याचा प्रयत्न केला. मला काही कळेचना. कशीबशी ओरडून, धडपडून, त्याच्यापासून स्वत:ला सोडवून घेत मी थोडी दूर झाले. पण तो थांबेच ना. त्या क्षणी नेमका माझ्या हाताशी चहाच्या भांड्याचा दांडा होता. मग मी तो उकळता चहा थेट त्याच्या शर्टावर ओतला. खूप भाजल्यामुळे तो आईऊई करत घरातून पळूनच गेला. 


मी सुन्न होऊन बसले होते. खूप घाबरले होते. नवऱ्याला कळलं, तर या भीतीने माझी गाळण उडाली होती. खूप राग आला होता स्वतःचाच. सारखं ताण देऊन आठवत होते की, कसं काय हा आपल्याशी असं वागू शकला? आपल्या नेमक्या कोणत्या कृतीतून त्याला तसं करण्याचा सिग्नल मिळाला असावा? रडत रडत मैत्रिणीला फोन केला. ती म्हणाली, ‘कुणालाही सांगू नकोस हे. नवऱ्याला तर अजिबात नको. तुझ्या नेहमीच्या बावळटपणाला थोडा आवर घाल. काही गोष्टी न सांगितलेल्याच बऱ्या’. तिच्याशी बोलून फोन ठेवला, तर पुन्हा रिंग वाजली. फोनवर तोच होता. ‘माझी चूक झाली. प्लीज सांगू नकोस कुणाला. मी स्टेशनवरून बोलतोय. तुला बघून आवरलं नाही मला. तू समोर आलीस की असंच होतं’. असं काहीबाही बडबडत राहिला. अर्थात, त्या थोर कवीचा माझ्याप्रतीचा हा व्यवहार तिथेच संपला नाही. त्यानंतरही अनेकदा वेगवेगळ्या वेळी उफाळत राहिला. ‘तुला अमूक अमूक मित्र म्हणून चालतो, मग मी का नाही?’ अशी संतप्त विचारणा करणं, रात्री अपरात्री ब्लँक कॉल्स करणं, देवळालीला एका आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी गेलेले असताना दारू पिऊन रात्रभर माझ्या रूमबाहेर उभं राहून दरवाजा ठोठावत राहणं, भिंतीवर लाथा झाडणं, असे अनेक उपद्व्याप तो करत राहिला. मी एकदा खूप चिडून म्हणाले, ‘तुझ्या बायकोला फोन करून सगळं सांगते’. तर निर्लज्जपणे हसत म्हणाला, ‘तू काही जरी सांगितलंस तरी तिचा विश्वास बसणार नाही’. आणि मग काही वर्षांतच अतिशय गंभीर आजार होऊन अल्पायुष्यातच तो मरून गेला. 


वांद्र्याच्या चेतना महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या त्याच्या आदरांजली सभेत बोलण्यासाठी सुबोध मोरेनं मला यायला सांगितलं. माझ्यासमोर प्रश्न होता जावं की नाही. खोटं खोटं बोलणं मला जमणारं नव्हतं. मी माझा पेच सुबोधला बोलून दाखवला. तो म्हणाला, ‘प्रज्ञा, तू मोकळेपणाने बोल. त्याच्या कवितेविषयी तर तू बोलशीलच पण त्याच्या व्यक्तित्वाबद्दल बोलणं टाळू नकोस’. मी बोलले. उपस्थितांपैकी कुणाला ते आवडलं की नाही मला माहिती नाही, पण त्यावेळी तरी मला कुणीच काही चांगलं-वाईट बोललं नाही. आमच्या ‘वाटसरू’च्या अंकात त्याच्यावर एक संपादकीय टिपणही मी लिहिलं. पुढे काही वर्षांनी माझ्या ‘टेहलटिकोरी’ या पुस्तकात ते टिपण मी घेतलं,  पण तो उल्लेख वगळून. ‘कवयित्री-लेखिका’ आणि ‘साहित्याची प्राध्यापिका’ या माझ्या भूमिकांमुळे फार काळ ती आठवण धगधगत ठेवण्यात अर्थ नव्हता. पुढेमागे त्याचा संग्रह अभ्यासक्रमात लागला तर तो शिकवणं ही माझी जबाबदारी मी टाळणार नव्हतेच. त्यामुळे एका अर्थाने तो सगळा प्रसंग मनात कुलुपबंद करून त्याची चावी मी खिडकीबाहेर टाकून दिली ती कायमसाठीच. परवा तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांबद्दल वक्तव्य केल्याने बिना चावीनेच माझंही कुलुप उघडलं गेलं नि जखमेतून काळंनिळं पाणी वाहू लागलं.

बातम्या आणखी आहेत...