आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेचित नैतिकता?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज या "मीटू' लाटेत सत्ता-संपत्तीच्या विशिष्ट स्थितीत नसलेल्या स्त्रिया-मुलींना प्रचलित आणि प्रसिद्धी मिळत असलेली उदाहरणं पाहून आपल्यावर अन्याय करणाऱ्याचं नाव जाहीर केलं तर त्याच्या परिणामाची त्यांना कल्पना आहे का? अशी केस कोर्टात उभी राहिल्यावर कोर्ट रोकडे पुरावे मागणार आहे त्याचं त्या काय करणार आहेत?...


जगातले ९५ टक्के पुरूष हे स्त्रियांकडे उपभोगण्याच्या नजरेनेच पाहतात”, असा बेधडक दावा चित्रपट निर्मात्या-दिग्दर्शक कांचन अधिकारी यांनी परवा आमच्या ‘माझा विशेष’च्या चर्चेत बोलताना केला. विषय होता ‘मी टू: अन्यायाला वाचा की बळी पुरूषाचा’. लगेचच दुसऱ्या दिवशी आम्ही ‘मी टू: पुरूषांना काय वाटतं?’ अशीही चर्चा ठेवली. त्यात कवी-चित्रकार संजीव खांडेकर यांनी आणखीनच स्फोटक दावा केला की, जगातल्या सर्वच महिला कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात लैंगिक छळाच्या शिकार बनलेल्या असतात आणि जगातल्या सर्वच पुरूषांनी कधी ना कधी एखाद्या महिलेशी लैंगिक गैरवर्तन केलेलं असतं. ज्येष्ठ पत्रकार सतीश कामतांनी तर याहीपुढे त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर एक मार्मिक पोस्ट टाकलीये. ते म्हणतायत, ‘मी टू ची दिवसागणिक वाढत जाणारी यादी पाहता, आपल्या समाजात ‘संधी अभावी चारित्र्यवान’ असा दांभिकांचा स्वतंत्र गट असावा काय?’ या  झाल्या एका प्रकारच्या स्त्री-पक्षपाती भूमिका. यांचं दुसरं टोक म्हणजे ‘मी टू’ची खिल्ली उडवणारे मेसेजेस. पण, त्यांची दखल इथे घ्यायचं कारण नाही. कारण, मुळात कुठल्याही लिंगाच्या संवेदनशील माणसानं सर्वात आधी आज आपल्यावरच्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या महिलेचं ऐकलं पाहिजे आणि नुसतं ऐकलंच नाही तर काही अंशी तिच्यावर पहिला विश्वास टाकला पाहिजे. याच मताचा मी आणि आपण सारे असू असं मला वाटतं. 


मात्र, हे करत असताना सहानुभूतीची जागा आंधळ्या अनुनयाची नसावी असंही मला वाटतं. उदाहरणार्थ दिग्दर्शक अनुराग कश्यपच घ्या. त्यानं आणि अन्य काही सेलेब्रिटीजनी म्हटलंय की, पीडितेच्या बोलण्यावर लगेच संशय घेऊ नका, तिला इतक्या काळानं आज का तोंड उघडतेस असे प्रश्न विचारू नका. काही प्रमाणात अनुरागचं म्हणणं योग्यही आहे, म्हणूनच ती भूमिका मी पहिल्यांदाच मांडलीये. मात्र, अशा कथित पीडित महिलेचं ऐकून घेतल्यानंतर पुढे काय करायचं, काय होणं अपेक्षित आहे, कुणी काय ठरवायचं याबद्दल सध्या फक्त आणि फक्त कोलाहल आहे. ज्यात तर्कबुद्धीला वाव नाही. आता ही गंमत पाहा, लेखाच्या पहिल्याच वाक्यात ज्या कांचन अधिकारी पुरूषांना खलनायक ठरवतायत, त्याच आमच्या चर्चेत त्या  जाहीररित्या म्हणाल्या,की आलोकनाथ यांच्याबरोबर त्यांनी काम केलं असून, त्यांना तेव्हा आणि नंतरही कधी आलोकनाथ यांचा ‘तसला’ अनुभव किंवा त्यांच्याबद्दल काही एकिवात आलं नाही. सेटवर ते आपल्याच तंद्रीत असत असंही त्यांनी म्हटलंय. 


आता माझा प्रश्न आहे की कांचन अधिकारींच्या या वक्तव्याचं काय करायचं? आणखी एक उदाहरण पाहू. तनुश्री दत्तानं नाना पाटेकरांवर आरोप केल्यानंतर सर्वात विश्वसनीय साक्ष ठरणार आहे ती ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या शूटींगवेळी उपस्थित असलेल्यांची. आता तनुश्रीच्या म्हणण्याला तिथे तेव्हा उपस्थित असलेल्या काही महिला पत्रकार दुजोरा देताहेत. त्याची मीडियात चर्चाही आहे. मात्र, त्याचवेळी तिथेच असणारे नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य आणि स्वत: चित्रपटाचे दिग्दर्शक सारंग यांनी मात्र असं काही घडलेलं नाही, असं म्हणून तनुश्रीवर टीका केली आहे. तनुश्री प्रकरणानंतर अनेक प्रसिद्ध पुरूषांची अशीच प्रकरणं बाहेर आली आहेत. त्यातील बहुतांश प्रकरणात आरोप झालेल्यांनी आरोप नाकारले नाहीयेत. मात्र, त्याचवेळी वरूण ग्रोव्हर किंवा अनुराग यांचे सहकारी राहिलेल्या विकास बहल यांनी आपल्यावरील आरोप फेटाळलेत हेही नमूद करण्याजोगं आहे. आणि इथेच आता आपण ‘मी टू’च्या गुंतागुंतीच्या आणि कायदेशीरदृष्ट्या अवघड भागात जातोय. सध्या लाट अशी आहे की पीडित महिला-मुलगी किती काळानं बोलते याला फार महत्व देऊ नये, तीला मोकळं होऊ द्यावं. १०० टक्के मान्य! मात्र, ती स्त्री किंवा मुलगी संबंधित पुरूषाचं नाव घेतेय हे लक्षात येतंय का तुमच्या? काही महिने-वर्ष जुन्या अशा घटनेचे (त्यातही बहुतांश वेळा असे प्रसंग सार्वजनिक दखल घेतली जाणार नाही अशा परिस्थितीत घडतात) कोणते पुरावे राहणार आहेत? अशा वेळी आरोपांची राळ उडून जमिनीवर आल्यावर, प्रसिद्धीचा झोत निघून गेल्यावर संबंधित पुरूषानं अब्रुनुकसानीचा दावा केल्यास त्या स्त्रीची स्थिती कशी होईल? 


आज या #MeToo लाटेत सत्ता-संपत्तीच्या विशिष्ट स्थितीत नसलेल्या स्त्रीया-मुलींना प्रचलित आणि प्रसिद्धी मिळत असलेली उदाहरणं पाहून आपल्यावर अन्याय करणाऱ्याचं नाव जाहीर केलं तर त्याच्या परिणामाची त्यांना कल्पना आहे का? अशी केस कोर्टात उभी राहिल्यावर कोर्ट रोकडे पुरावे मागणार आहे त्याचं काय? झालेल्या कृत्याचे काटेकोर अर्थ लावले जाणार आहेत हेही पाहावं लागेल. प्रिती झिंटानं आपला पूर्वाश्रमीचा प्रियकर व उद्योगपती नेस वाडियावरील विनयभंगाची केस मुंबई उच्च न्यायालयानं निकालात काढलीये. दोन्ही बाजूंकडून याबाबत तडजोड झाल्याचं समजतंय. बॅडमिंटनमधली भारताची अव्वल खेळाडू पी. व्ही. सिंधूनं एकीकडे ‘मी टू’ पाठिंबा देतानाच बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टानं प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्यावर केलेल्या मानसिक छळाच्या आरोपांविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.  हे इथं लक्षात घेण्याजोगं आहे. 


गेल्या काही दिवसात आरोपाच्या फैरी काही महिला सेलेब्रिटींनी केल्यानंतर ज्यांच्यावर आरोप झाले ते आलोकनाथ, विकास बहल आदी मंडळींनी न्यायिक मार्गांचा अवलंब करण्यास सुरूवात केली आहे. विचित्र बाब म्हणजे एक मुद्दा आपल्या सर्वांच्या समजुतीतून निसटतोय की, पीडितेनं अन्याय करणाऱ्याचं नाव घेतल्यानंतर त्या पुरूषानं जाहीर कबुली द्यावी अशी अपेक्षा आपण धरतोय का? आणि तसं त्या व्यक्तीनं केल्यास तो त्याचा ‘नैतिक चांगुलपणा’ ठरवणार आहोत की काय? मी या लेखासाठी अॅडव्होकेट गणेश सोवनी आणि असीम सरोदे यांच्याशी बोललो असता त्यांनी स्पष्ट निर्वाळा दिलाय की, जरी याबाबतीतले कायदे स्त्रीयांप्रति संवेदनशील असले तरी अंतिमत: आरोपी पुरूषाविरूद्ध पुरावे नसल्यास अब्रुनुकसानीचा पेच उभा राहू शकतो. हेही लक्षात घेतलं पाहिजे की, प्रचलित कायदेशीर प्रक्रिया न अवलंबवता जर आरोपीची नावं समाजमाध्यमांवर उधळली जाऊ लागली तर अशा ‘सोशल मीडिया ट्रायल’बाबत कोर्ट प्रतिकूल असण्याचीच शक्यता जास्त आहे. आज ज्या प्रकारे आरोपीचं नाव जाहीररित्या घ्यायला उद्युक्त केलं जातंय, त्या पार्श्वभूमीवर हे महत्वाचं आहे. 


या सगळ्या वातावरणात सुक्यासोबत ओलंही जळण्याची शक्यता वाढलीये. अधिक खुल्या आणि व्यक्तिगत, व्यावसायिक नातेसंबंधांबाबत अधिक गुंतागुंतीच्या काळात आपण राहतोय. अशावेळी ‘ओलांडलेल्या सीमारेषेची’ परिभाषा ठरवणं अवघड असणार आहे. याच्या जोडीला भारतातल्या जाती संघर्षाचा अंत:प्रवाह हे प्रकरण अधिकच अवघड बनवतो. स्त्री-पुरूषांच्या एकमेकांवरील आरोपांना त्यांच्या जातीचे कंगोरे लावले गेले तर आरोप करणाराच गुन्हेगार ठरू शकतो,अशी देशातली स्थिती आहे. सोशल मीडिया लिंग-भानाच्या, लिंग-भेदाच्या, लिंग-विकृतीच्या व लिंग-टिप्पणीच्या उदाहरणांनी भरला आहे.  स्त्री-पुरूष व्यक्ती इथं हा हा म्हणता जातीत, धर्मात विभागून बोलू शकतात आणि त्याचवेळी प्रसंगी स्त्री-पुरूष म्हणून लिंगाधारीत एकीही दाखवू शकतात. एक उदा. सांगतो. ज्यावेळी देशात राष्ट्रवाद-जेएनयु वगैरे विषय पेटले होते तेव्हा नाना पाटेकरांनी बॉलिवूडमधल्या स्वरा भास्करादी अभिनेत्रींच्या मताच्या विरूद्ध भूमिका घेतली होती. त्यावेळी त्यांना पाठिंबा देणाऱ्या मुली तनुश्री प्रकरणात मात्र त्यांच्याविरूद्ध एका पातळीवर येतात. याच मुली-महिला तेव्हा स्वरा भास्करला बोलही लावतात. ट्विटरवर पुण्यातील एक महिला आहेत. भाजप-संघाच्या बाजूनं लिहितात. मोठ्या संख्येनं त्यांना फॉलोअर्स आहेत. उजवी मांडणी करणारं लिहितात नेहमी. तर, एकदा ‘दंगल’ फेम झायरा वसिमनं तीला विमान प्रवासादरम्यान मागच्या सीटवर बसलेल्या माणासाचा पाय कसा लागत होता आणि सांगूनही त्यानं आवर कसा घातला नाही, याबदद्ल एअरपोर्टवरून इन्स्टावर लाइव्ह केलं. तीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. तीनं त्या माणसाचा पाय लागतानाचा व्हिडिओही काढला होता हे विशेष. दुसरीकडे, त्या माणसानं आणि त्याच्या पत्नीनं झायरावर उलट आरोप केले. दोन्ही बाजूनं वाद-प्रतिवाद होणं ठिकच. मात्र, बाईंनी आपल्या ट्विटरवर ‘हा झायराचा एखाद्या आगामी चित्रपटासाठीचा स्टंट तर नाही ना’ अशी शंका उपस्थित केली. याच बाई केरळमधल्या चर्चमधल्या ननवरच्या लैंगिक अत्याचारांबद्दलही अहमहमिकेनं ट्विटत असत. ते योग्यही आहे. मात्र, होतं काय, असे लोक बाबा-बुवा-राम रहिम-आसाराम यांच्या प्रकरणात बोलत नाही. हा ‘सिलेक्टिव्ह अॅक्टिव्हिझम’ सोशल मीडियावरच्या सर्वांच्याचबाबतीत थोड्या-फार फरकानं दिसतो. पण, सेक्सिस्ट वागण्यात पुरूषच उजवे आहेत हेही खरं. जरा ओळख झाली नाही किंवा नुसती फ्रेंड रिक्वेस्ट एखाद्या महिलेनं स्वीकारली की त्या मुलीला-महिलेला डीएम-डायरेक्ट मेसेज करणं, खासगी चौकश्या करणं सुरू होतं, असा अनेक महिलांनी उघडपणे माडंलेला मुद्दा आहे. माझ्या एका मैत्रिणीला तर तीनं फेसबुकवर टाकलेला फोटो खासगी व्हॉट्सअप ग्रुपवर टाकल्याचं कळल्यावर धक्का बसला. तीनं त्याबदद्ल नाराजीही व्यक्त केली. 


दिग्दर्शक नागराज मंजुळेचं पहिल्या पत्नीबरोबर विभक्त होणं, आमिर खान, सैफ अली खानचं पूर्व वैवाहिक आयुष्य, ‘बिग बॉस’मध्ये राजेश श्रृंगारपुरे- रेशम टिपणीस यांचं वर्तन, सचिन पिळगावकरच्या ‘मुंबई अँथम’ची टर उडवताना त्यांचं म्हातारा असणं, विग लावणं यावरून शेरेबाजी करणं, कवी दिनकर मनवर यांच्या ‘पाणी कसं अस्तं’मधल्या एकाच ओळीवरून समाजाच्या भावना दुखावल्याचे दावे करत ती कविता अभ्यासक्रमातून मागे घ्यायला लावणं आणि टोक म्हणजे अभिव्यक्ती, देशभक्ती प्रकरणावरून मध्यंतरी देशात जो एक डिस्कोर्स आकार घेत होता, त्यावेळी असंख्य महिला पत्रकार, कार्यकर्त्यांवर सोशल मीडियातून तुटून पडणं, अत्यंत घाणेरड्या भाषेत त्यांना धमकावणं हे सगळं आपल्या समाजाच्याच मनाच्या सोशल मीडिया वर्तनाचे आविष्कार आहेत. मी वर दिलेले संदर्भ पाहता जाणता-अजाणता, सुस्थित-मागास, शहरी-ग्रामीण यांच्याही पलिकडे ही मानसिकता आपल्यात आहे. एक हिंदी गाणं मध्यंतरी गाजत होतं. ‘इसमें तेरा घाटा, मेरा कुछ नही जाता, ज्यादा प्यार हो जाता तो में सह नहीं पाता’, अशा ओळी त्यात होत्या. या गाण्यावर काही मुलींनी एक यू-ट्यूब व्हिडिओ बनवला. त्यात इसमें तेरा घाटा...च्या नंतर एक मुलगी आपल्या योनीकडे निर्देश करून ‘मेरा कुछ नहीं जाता’ या वाक्यावर हावभाव करते. याला उत्तर म्हणून एका मुलाचा व्हिडिओ दिसतो ज्यात तो इसमें तेरा घाटा या वाक्यावर वाढलेल्या पोटासारखा हावभाव करतो. या व्हिडिओतल्या लैंगिक वर्तनाला कुणी कसं घ्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. या सगळ्या मांडणीमागे सांगण्याचा हेतू हा की, नैतिकता आम्ही तिच्या पूर्णतेसह स्वीकारायची आहे की सोयीस्कररित्या? की....वेचित नैतिकता हे हेच आपलं व्हर्च्युअल जमान्यातलं अॅक्च्युअल वास्तव आहे?

बातम्या आणखी आहेत...