आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुरुगन नावाची दंतकथा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिव्यक्तीचा संकोच असलेल्या काळातच चांगले साहित्य लिहिले जाण्याची शक्यता अधिक असते. वेगवेगळे फॉर्म मोडूनतोडून लेखक आपल्या अमर्याद ताकदीने व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असतो. तामिळ लेखक पेरुमल मुरुगन ताकदीने व्यक्त होतातच. पण एक जिवंत दंतकथाही बनून राहतात...


पेरुमल मुरुगन यांच्या ‘पुनाची' या बहुचर्चित कादंबरीची प्रस्तावना फार महत्त्वाची आहे. ते सांगतात, की ‘मला माणसांविषयी लिहायला भीती वाटते. आणि देवांविषयी लिहायला तर त्याहूनही अधिक'. म्हणूनच मी आता फक्त प्राण्यांविषयी लिहिणार आहे. पण त्यातही बऱ्याच अटीतटी आहेतच. म्हणजे कुत्रे आणि मांजरे मी कवितेसाठी राखून ठेवलीत. गायी नि डुकरांविषयी लिहिण्याची केव्हाचीच मनाई आहे. उरते फक्त बकरी... यातून एकेकाळी स्वतःतील लेखकाचा मृत्यू जाहीर करणाऱ्या मुरुगन यांची मनोवस्था निश्चितच समजून येते. आजमितीच्या प्रादेशिक साहित्यातील एका लक्षवेधी लेखकाच्या कादंबरीची नायिका ठरते ‘पुनाची’ नावाची बकरी! या कादंबरीचे इंग्रजीत भाषांतर करणाऱ्या एन. कल्याण रमण यांनी या कादंबरीची तुलना जॉर्ज ऑर्वेलच्या प्रस्फोटित साहित्याशी केलेली आहे.


मुरुगन यांच्या साहित्यात अस्तित्वहीन माणूस स्पष्ट दिसतो. त्याला हतबल करणारी, मुकाआंधळाबहिरा करू पाहणारी व्यवस्था दिसते. सोयीचं तेच बरोबर म्हणणारी राजसत्ता दिसते. या साहित्यात दलित आहे. शेतकरी आहे. कामगार आहे. ठेलेवाला आहे. रोजमर्रा जगण्यात चोळामोळा झालेले असंख्य लोक आहेत. या साहित्याच्या तळाशी चांगलं आयुष्य जगण्याची धडपड आहे. व्यथित भावभावना आहेत. नि अपयशाने झालेला लगदासुद्धा. ही आपल्या काळाची गोष्ट आहे. दहशतग्रस्त काळाच्या दाबातून निर्माण झालेल्या आपल्या भवतालची गोष्ट आहे. त्यात प्राणी आहेत. जनावरे आहेत. पण त्यातून व्यक्त होणारी कहाणी फक्त माणसांची आहे. माणसांसाठीची आहे. नि तिची मुले आपल्या रोजच्या जगण्यात रुतून बसलीत. त्यांच्या बहुचर्चित ‘पुनाची' या कादंबरीत सामान्य माणसाच्या सरकारसंबंधी काही नोंदी आहेत. लेखकाने छोट्या छोट्या गोष्टीतून आणि उपकथनातून आपल्या आजूबाजूचा बीभत्स वर्तमान उभा केला आहे. ते सांगतात - ‘खूप वर्षांपासून लोक सांगताहेत की हा प्रदेश बहिऱ्यांचा आहे. आणि तोही जेव्हा आपल्याला काहीतरी समस्या असतात तेव्हा. अडचणी असतात तेव्हा. पण आपण सरकारबाबतीत बोलायला लागलो, की मात्र त्यांचे कान तीक्ष्ण बनतात.' यासाठी आपल्याकडे गेल्या आठवड्यात घडलेलं प्रकरण पाहता येईल. एखाद्या मंत्री किंवा नेत्यांविषयी एखादी आक्षेपार्ह ओळ लिहिली, तर लगेच शासन जागे होते. कार्टुनिस्टला शिक्षा केली जाते. कवीची जाहीर समाजमाध्यमांवर निंदानालस्ती केली जाते, नि शासन मात्र आपल्याच कोशात असते. एकंदरीत याचमुळे मुरुगन यांची ‘पुनाची' फक्त पुस्तकांपुरती मर्यदित न राहता आपल्या परिवेशाची कहाणी बनते.


‘माधोरुबगन' अर्थात ‘वन पार्ट वुमन' या कादंबरीमुळे मुरुगन भारतभर पोहचले. आपल्याकडे या कादंबरीचा मराठी अनुवाद प्रणव सखदेवने केलेला आहे. या कादंबरीत अपत्यप्राप्तीच्या   सामाजिक दबावामुळे अस्वस्थ असलेली नायिका नि तिचे मनोविश्व लेखकाने रेखाटलेलं आहे. परंपरेने चालत आलेल्या रथयात्रा उत्सवात ती पुत्रप्राप्तसाठी येते. जिथे अपत्यप्राप्तीसाठी स्त्री-पुरुषांना परस्पर अनुमतीने  एकत्र राहण्याची मान्यता दिलेली असते. यावर काही जातीयवादी नि धर्मांध लोकांनी आक्षेप घेतले. लेखकाला धमक्या देण्यात येऊ लागल्या. जातीतल्या म्होरक्यांनी ‘लिहिणारा हात कापू' अशी धमकी द्यायला सुरुवात केली. लेखकाला कादंबरीतील काही भाग वगळण्यासाठी दबाव निर्माण केला जाऊ लागला. नि पर्यायाने कोणताही शब्द मागे न घेता मुरुगन यांनी लेखक म्हणून स्वतःचा मृत्यू जाहीर करून टाकला.


मुरुगन यांच्या घटनेनंतर बऱ्याच गोष्टी समाज म्हणून आपल्या समोर उभ्या राहिलेल्या आहेत. दुर्दैवाने त्या समजून घ्यायला आपण कमी पडतोय. अभिव्यक्तीसाठी धोका स्वीकारून लिहिणारा कोणताही लेखक असेल. नि तो कोणत्याही भाषेत लिहिणारा असेल. तो देशातील कोणत्याही भागातून असेल. तो ज्या जोखमीने लिहितोय, त्याच जोखमीने समाज त्याच्या पाठीशी उभा राहताना मात्र  दिसत नाहीये. दिनकर मनवर प्रकरण झाल्यानंतर त्यांच्या बाजूने लिहिणारे बोलणारे जास्तीत जास्त हे साहित्यिकच होते. मराठीतील एका कवीला, त्याच्या संपूर्ण संग्रहातील एखाद्या कवितेतील एक ओळ उचलून त्यातून एखाद्या समाजाची बदनामी झाली हे दाखवणे टोळक्यांसाठी कधीही सोप्पेच असते. कवीने माफी मागितल्याने हे प्रकरण आपल्या चर्चाविश्वातून संपले, असेलही कदाचित. पण अशा प्रकरणातून खूप मारक प्रघात पडत चालले आहेत. आपण विचार करायला हवा की सांस्कृतिक नि सामाजिक स्तरावर नेतृत्व करणारी माणसं झुंडीत कधीपासून रूपांतरित झालीत. हा समाज म्हणून स्वतःला तपासण्याचा काळ आहे. तुम्ही पुस्तके वाचता की वाचत नाही, लिहिता की लिहीत नाही, हा व्यक्ती आणि समूहाने एकत्र येण्याचा क्रायटेरिया कधी झाला. आपण ज्या पुरोगामी राज्याचा गोडवा गातो, त्याच राज्यात कैक लेखक कलाकारांना संरक्षण द्यावे लागते, हे कशाचे द्योतक आहे? मागच्याच आठवड्यात भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवींच्या पुढाकाराने पुण्यात ‘पेन काँग्रेस’ पार पडली. त्यातील एका कार्यक्रमाच्या समारोपात मराठीत लिहिणाऱ्या काही लेखकांना देवींनी आग्रहाने व्यासपीठावर बसविले होते. यापैकी प्रत्येकाच्याच जिवाला धोका असल्याने सरकारने त्यांना संरक्षण दिलेले होते. या सर्वांमध्ये ठळकपणे दिसणारा माणूस म्हणजे संदेश भंडारे. कोणत्याच अर्थाने या माणसाच्या नावावर कविता नाहीये. किंवा हा कथा-कादंबरीकारही नाहीये. तो छायाचित्रकार आहे. नि तरीही त्यांच्या जिवाला धोका आहे. थोडक्यात काय, तर हा माणूस हातातील कॅमेऱ्याच्या माध्यमातून एक जग दाखवू पाहतोय. ते जग प्रस्थापितांच्या सोयीचं नाहीये. अशी रोजच्या जगण्यातील नागडी सत्यं पुढे आली की व्यवस्था घाबरते. नि झुंडीच्या मदतीने बोलणाऱ्याला गप्प करू पाहते, तेव्हा समाज म्हणून आपली जबाबदारी वाढलेली असते. आपल्या सामाजिक सांस्कृतिक जगण्यातून झुंडीच्या म्होरक्यांना हद्दपार करण्याची जबाबदारी ही लिहित्या हातांसोबतच तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाची सुद्धा असतेच की.


मुरुगन हे आजमितीस भारतीय प्रादेशिक साहित्यातील एक प्रतिभाशाली लेखक आहेत. ‘इरु वैय्यील' ही त्यांची १९९१ मध्ये प्रकाशित झालेली पहिली कादंबरी. आर्थिक स्थित्यंतराच्या काळात हतबल होत झालेल्या शेतकरी कुटुंबाची कहाणी यात आहे. शेतीचा आतबट्ट्याचा धंदा करत असतानाची होणारी ओढाताण मुरुगन यांनी या कादंबरीत मांडली. त्यानंतर दोन वर्षातच त्यांची ‘निझल मूत्रम' ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीत मुरुगन यांनी एकेकाळी चित्रपटगृहाच्या बाहेर सोडा विक्री करणाऱ्या वडिलांना मदत करतानाच पाहिलेलं विश्व उभं केलं. व्ही. गीता यांनी या कादंबरीचे इंग्रजीमध्ये ‘करंट शो' या नावाने भाषांतर केलेलं आहे. कुलमंद्री अर्थात ‘सीझन ऑफ पाम' ही त्यांची यानंतर प्रकाशित झालेली एक दर्जेदार कादंबरी. एकंदरीत कथेपासून साहित्यलेखनाला सुरुवात करणाऱ्या मुरुगन यांच्या नावावर आजमितीस पाच कथासंग्रह, दहा कादंबऱ्या व पाच कवितासंग्रह असं विपुल साहित्यलेखन आहे. एकीकडे समाज अधिकाधिक मठ्ठ होत असताना दिसतोय. तो ओठांवर ओठ रुतवून गप्प बसतो, तेव्हा निश्चितच कवीला भित्र्यांची गाणी लिहिल्याशिवाय पर्याय उरत नाही. ‘दिव्य जीभ' या कवितेत कवी सांगतो की, मी अतिशय रागावलोय. या काळात खोटे बोलणाऱ्यांचे ओठ नक्कीच जळून जातील. किंवा त्यांच्यात सामील होणारे मरूनही जातील. नि म्हणूनच तुम्हाला शाप द्यायचाय. पण कवी सांगतो की - ‘माझ्या दिव्य जिभेकडे नाहीये एकही शब्द / शापासाठी /तुम्ही चालते व्हा. शेवटी पेरुमल मुरुगनसारख्या लेखकाचा लढा समाजातील अनिष्ट रूढींशी असतो. दुःखाशी असतो. विषमतेशी नि अन्यायाशी असतो. नि यातूनच हा लेखक नि त्याचे साहित्य सगळ्याच पातळ्यांवरील झुंडील म्होरक्यांना नाकारतात. सरतेशेवटी, पेरुमल मुरुगन ही अराजकतेला आव्हान देऊ पाहणाऱ्या लेखकाची गोष्ट आहे. आपल्या साहित्यातून दंतकथांचा समकालीन प्रभाव टिपणारा हा लेखक दस्तरखुद्द स्वतःच आपल्या काळाची दंतकथा बनलेला आहे...


लेखकाचा संपर्क - ९६१९०५२०८३

बातम्या आणखी आहेत...