आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संहारानंतरचे सर्वकालिक शोकनाट्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाभारत हे मानवी स्वभावाच्या अगणित छटा दृश्यमान करणारे महानाट्य. याच महानाट्याचा उत्तरार्ध  आणि त्या काळात घडणारं मानवी हतबलतेचं, एकाकीपणाचं दर्शन रत्नाकर मतकरींचे “आरण्यक’ हे नाटक घडवते. सत्तरच्या दशकात गाजलेले हे नाटक पुन्हा एकदा येत्या दसऱ्याला रंगमंचावर येत आहे.


त्नाकर मतकरींचे "आरण्यक' हे १९७४ मधील नाटक. त्या वेळी ते पाहिले आणि कायमस्वरूपी आठवणीत  राहिले. एव्हाना सारे महाभारत घडून गेलेले आहे, संहार संपलेला आणि उरलेल्यांची आयुष्ये अडखळत चालू राहिलेली आहेत. कारण त्या प्रचंड संहारात प्रत्येकाचेच काहीतरी गेलेले आहे. त्यामुळे निखळ सुख कोणालाही नाही. जितांना तर नाहीच, पण जेत्यांनाही नाही. तरुण आता उरलेले नाहीत. आहेत ते वार्धक्याकडे झुकणारे मध्यमवयीन आणि चार जराजर्जर वृद्ध. धृतराष्ट्र, गांधारी, कुंती आणि विदुर. प्रतिहारी धरून पाच. त्या अर्थाने ह्या चार वृद्धांच्या मृत्यूच्या दिशेने होणाऱ्या प्रवासाचे हे नाटक आहे.


 धृतराष्ट्र आणि गांधारी ह्यांचे दु:ख सांगण्यापलीकडचे आहेच, परंतु कुंती आणि विदुरही स्वस्थ नाहीत. त्यांनीही बरेच काही गमावले आहे. त्यांच्या आत्मशोधाचे, आयुष्यभरात काय कमावण्यासाठी काय काय गमावले व बाकी काय राहिले, ह्याचा हिशेब म्हणजे मतकरीलिखित हे नाटक आहे. ह्या नाटकाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, त्याचा ग्रीक ट्रॅजेडीचा फॉर्म. ग्रीक ट्रॅजेडीमध्ये सगळ्या पात्रांचे भवितव्य नियती किंवा दैव ठरवते. सर्व काही दैवाधीन असते. त्यामुळे दुष्ट-सुष्ट साऱ्यांची नियती एकच, अंतिम सर्वनाश. ग्रीक ट्रॅजेडीतील मोठमोठे नायक /नायिका नियतीपुढे हतबल झालेले दिसतात. नियतीपुढे कर्माला महत्त्व नसते. 
 
 
ह्याउलट महाभारताच्या शोकांतिकेत प्रत्येकजण आपापल्या कर्माचे फळ भोगतो आहे. गीतेत निष्काम कर्मयोग सांगितलेला असला तरीही भारतीय संस्कृतीत कर्मफलाचे महत्त्व सर्वाधिक आहे. करावे तसे भरावे, पेराल तसे उगवेल इत्यादी वचनांवर आपला पूर्ण विश्वास असतो. महाभारतात प्रत्यक्षात तेच घडलेले दिसते. सगळी ज्याच्या त्याच्या कर्माची गोड-कडू फळे असतात. 


ही दोन्ही तत्त्वज्ञाने एकत्र करून महाभारताची उत्तरकथा सांगणे हे मोठेच आव्हान मतकरींनी "आरण्यक' लिहिताना स्वीकारले आणि पेलूनही दाखविले. महाभारत आणि ग्रीक शोकांतिकेतील व्यक्तिरेखांमध्ये एक मोठा फरक आहे. महाभारतात उदात्त वाटणाऱ्या पात्रांचेही मातीचे पाय सहज दिसतात. तेच त्यांना जमिनीशी जखडून ठेवतात आणि वास्तवरूप देतात. "आरण्यक'मधील व्यक्तिरेखांबद्दलच बोलायचे तर धीरोदात्तपणे सगळ्या संकटांना तोंड देत आपल्या मुलांचे भले करण्यासाठी धडपडणाऱ्या कुंतीने आपल्याच पोटचा पोर असलेल्या कर्णावर होणारे अन्याय जन्मभर उघड्या डोळ्यांनी पाहिले.  त्याला न्याय देण्यासाठी "ब्र' उच्चारला नाही, एवढेच नव्हे तर युद्धाच्या आदल्या दिवशी त्याला भेटून त्याचा तेजोभंगच केला. हे तिच्या मनाला आता सतत खाते आहे. युधिष्ठिराचे ‘नरो वा कुंजरो वा’ हे वचन तर सर्वज्ञात आहे. त्यामुळे त्याला विजयाचा आनंद तर नाहीच, पण तो पश्चात्तापात पोळतो आहे.


 विदुर तत्त्वज्ञानी, न्यायाचा पाठीराखा, पण "आरण्यक'मधला विदुर, अंतस्थ लाचारीच्या, हतबलतेच्या, कोणी विचारले नाही तर काय, अशा असुरक्षिततेच्या भावनेने पीडित आहे.  प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्या मानवी स्वभावाचे हीन पैलू कधी ना कधी दाखविते व त्यामुळे ती ह्या मातीतली वाटते आहे. ग्रीक ट्रॅजेडीतील व्यक्तिरेखा भव्यदिव्य, मानवी तर्काच्या पलीकडच्या, त्यांचे हेवेदावे, वासनाही असामान्य असतात. अशा परिघात मातीशी नाते असलेली महाभारतातील पात्रे व उत्तुंग आकाशाशी नाते सांगणारी ग्रीक ट्रॅजेडीतील पात्रे ह्यांची सांगड मतकरींनी घातली आहे. 
 
 
ह्यातील प्रमुख पात्रे म्हणजे धृतराष्ट्र, गांधारी, कुंती आणि विदुर. युधिष्ठिर हे त्यांना जोडणारे, पाच पांडवांच्या प्रतिनिधीसारखे पात्र. युयुत्सु हा कौरव, पण पांडवांच्या बाजूने लढलेला आणि पांडवांनी अधर्माने युद्ध जिंकले ह्या जाणिवेने, आपण चुकीच्या पक्षाला साथ दिली ह्या भावनेने वेडाखुळा झालेला. तो एका परीने युधिष्ठिराच्या सदसद्विवेकबुद्धीला सतत टोचणी लावतो. 


महायुद्धातील संहारानंतर काही वर्षांनी धृतराष्ट्र, गांधारी, कुंती आणि विदुर वनात गेले अशी कथा आहे. आरण्यक हे नाटक ह्या दोन्हीच्या मधल्या घटना विशेषत: त्या काळातील ह्या पात्रांची मनोवस्था दाखविते. ह्याबद्दल महाभारतात धृतराष्ट्राने भीमाचा लोखंडी पुतळा आवळून कसा नष्ट केला आणि गांधारीने श्रीकृष्णाला कसा शाप दिला, ह्याव्यतिरिक्त फार काही नाही.  परंतु मतकरींनी हा कालखंड निवडला. हरलेला, लाचार सम्राट, त्याची पुत्रशोकाने संतप्त राणी, सगळी सुखे आता उपलब्ध असूनही अलिप्त असलेली कुंती आणि तत्त्वज्ञानी पण ह्या साऱ्यांपासून स्वत:चे वेगळे अस्तिव नसलेला विदुर ही पात्रे शोककथेमध्ये चपखलपणे बसणारी आहेत. आता ती आधीच्या घटनांतून पुरती सावरलेली नसली तरी त्यासंबंधीच्या भावना व्यक्त करण्याइतकी दूर आहेत. युद्ध व त्यातून निर्माण झालेला शोक आता त्यांना त्यांच्या एकूण आयुष्याचा आणि नात्यांचाच लेखाजोखा मांडायला प्रवृत्त करतो, कारण आता पुढे काहीच नाही, आहे ते सारे मागे. 


"आरण्यक'मध्ये ह्या चार माणसांची एकमेकांना नव्याने ओळख होते. धृतराष्ट्र-गांधारी नात्यांमधील तिढे समोर येतात आणि ते सुटायला मदत होते. कुंती आणि विदुर ह्यांच्यातील आजवर अबोल असलेले नाते व्यक्त होते. युधिष्ठिर आणि विदुर ह्यांच्यामधील बाप-मुलाचे अव्यक्त नाते विदुराच्या मरणप्रसंगी व्यक्त होते. हा प्रसंग मतकरींनी हृद्य केला आहे. ह्या साऱ्यांचा हा प्रवास "आरण्यक'चा गाभा आहे. 


युयुत्सुचा उपयोग मतकरींनी युधिष्ठिराच्या सदसद्विवेकबुद्धीला आव्हान देण्यासाठी खुबीने केला आहे. तो जिवंतपणी त्याला अस्वस्थ तर करतोच, पण मेल्यावरही त्याचे पिशाच्च युधिष्ठिराला पछाडते. पांडवांनी अधर्माचा आसरा घेऊन युद्ध जिंकले ही गोष्ट तो सतत अधोरेखित करत राहतो.  युद्धावरील हे भेदक भाष्य करण्यासाठी मतकरींनी युद्धामध्ये मरण पावलेल्या युयुत्सुला आतापर्यंत जिवंत दाखवले आहे. येथे तो आत्महत्या करतो. 


ग्रीक ट्रॅजेडीच्या फॉर्मच्या जोडीने नाटकाच्या मांडणीत भरतमुनींचे पारंपरिक  भारतीय रंगभूमीचे संकेतही आलेले आहेत. नांदी, ईशस्तवन इत्यादी, तसेच ग्रीक पद्धतीचे वृंदगानही आहे. पारंपरिक  भारतीय रंगभूमीचे संकेत आणि ग्रीक ट्रॅजेडीचे संकेत ह्याचा मेळ मतकरींनी अशा खुबीने घातला आहे की, त्यांचे अलगपण नाटक पाहताना जाणवत नाही. 


आरण्यकमधील व्यक्तिरेखांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व वृद्ध एकटेपणाचा सामनाही करत आहेत. धृतराष्ट्र त्याच्या अंधत्वामुळे एकटेपणा आधीपासूनच सोसत आला आहे. आता तो साम्राज्य गमावल्याने आणखी एकता झाला आहे. लाचारही आहे. गांधारीने जाणूनबुजून अंधत्व स्वीकारले. नंतर मुलांच्या आधाराने ती आयुष्य जगली. आता तीही नाहीत. पती- पत्नींमध्ये सौहार्द – जिव्हाळा नाही. मुलांच्या मृत्यूने आता त्यांना जवळ आणले आहे. तरीही ती एकटेपणा अनुभवते आहे. कुंती जेत्यांची माता असली, आता तिचे मन त्यांच्यात नाही. विदुराला त्याला आता कुठेच स्थान राहिले नाही, आपली गरज आता उरली नाही ह्याची खंत आहे.  ह्या नाटकातून हे वृद्ध आपापल्या एकटेपणाला तोंड देत असताना त्यांच्या आत्मशोधातून हलके हलके त्यांना त्यावरचा इलाज सापडत जातो. एकमेकांना ओळखता ओळखता त्यांना सह अनुभूतीचाही प्रत्यय येतो. नातेसंबंधांना नवीन आयाम मिळतात. धृतराष्ट्र –गांधारी –कुंती ह्यांना एकमेकांची साथ शेवटपर्यंत मिळते. विदुर मात्र त्यांच्याबरोबरच असूनही एकाकी अशांत राहतो. अखेरीस भ्रमिष्ट होतो. "आरण्यक'च्या कथेला अशी  एकाकीपणाचीही जोड आहे.          

                      
महाभारतातून मनुष्यस्वभावाच्या साऱ्या पैलूंचे, माणसांच्या साऱ्या नात्यागोत्यांचे, त्यांतील गुंत्याचे व्यापक दर्शन  घडले आहे. "आरण्यक'चा कथाभाग वृद्धत्वातील नात्यागोत्यांचे, मनोवृत्तींचा अंतिम पर्यवसान दर्शवितो. आयुष्यभर जे जे घडले, जे जे केले, किंवा केले नाही त्याची परिणती त्यात दिसते. त्यामुळे "आरण्यक'चे कथानक आजचेदेखील आहे. आजही वृद्धत्वातील एकाकीपणाची समस्या तितकीच गंभीर आणि काळजी करण्यासारखी आहे. आधीच्या काळात कसलेही महाभारत घडून गेलेले असले तरी अखेरीस प्रत्येकजण एकटाच राहतो, हे सर्वांनाच जाणवते. "ह्यामुळे आरण्यक'आजच्या काळाशीही नाते सांगते.  

बातम्या आणखी आहेत...