आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Article | Even Before The Battle Of The Election, The Arms Of The Congress Leader Wither

MahaElection : निवडणुकीच्या लढाईआधीच काँग्रेसची शस्त्रे म्यान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलग दुसऱ्या लाेकसभा निवडणुकीत पानिपत झाल्यापासून गलितगात्र झालेल्या काँग्रेसला अजूनही ऊर्जितावस्था मिळालेली नाही. मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या तीन राज्यांतील विजयामुळे काहीसे बळ आल्याचा आव काँग्रेसने आणला आणि २०१९ च्या लाेकसभा निवडणुकीत जीव ओतून प्रचार केला. मात्र माेदी-शहांच्या झंझावातापुढे त्यांचे काही चालले नाही. २०१४ प्रमाणे याही वेळी संपूर्ण पक्षाचा सुपडा साफ झाला, दस्तुरखुद्द पक्षाध्यक्षांवरच पराभूत हाेण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे हा राष्ट्रीय पक्ष पुन्हा एकदा काेमात गेला. प्रतिकूल परिस्थितीत लढण्यापेक्षा अपयशाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने तर कार्यकर्ते आणखीच हवालदिल झाले. सामूहिक नेतृत्वाच्या जाेरावर आता पुढील वाटचाल करण्याचे धाेरण या पक्षाने स्वीकारले असले तरी पुन्हा अंतर्गत गटबाजीचेच संकट त्यांची पाठ साेडताना दिसत नाही. त्यातच जम्मू-काश्मीरबाबत माेदी सरकारने घेतलेल्या ऐतिहासक निर्णयाला केविलवाणा विराेध करून या पक्षाने आपले हसू करून घेतले. यातूनही पक्षातील दुफळी पुन्हा चव्हाट्यावर आली. एकूणच राष्ट्रीय असाे की प्रादेशिक राजकारणात आता काेणती भूमिका घ्यायला हवी, याचेही तारतम्यज्ञान काँग्रेस नेतृत्वाकडे उरले नसल्याचे दिसते. महाराष्ट्रातही कमीअधिक हीच परिस्थिती आहे. आॅक्टाेबर महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका हाेत आहेत. त्यासाठी सहा महिने आधीच युतीची घाेषणा करून विजयाचा आत्मविश्वास बाळगून असलेल्या सत्ताधारी भाजप, शिवसेनेने जाेरदार तयारी सुरू केली आहे. लाेकसभेत काँग्रेसप्रमाणेच पानिपत झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही नैराश्य झटकून शड्डू ठाेकला आहे. सत्ताधाऱ्यांच्या यात्रेला प्रत्युत्तर म्हणून स्वच्छ प्रतिमेचा व लाेकप्रिय चेहरा असलेला डाॅ. अमाेल काेल्हे या युवा खासदाराच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा काढून पुन्हा एकदा जनतेच्या दरबारात काैल मागण्यास सुरुवात केली आहे. लाेकसभेला मिळालेल्या एकमेव विजयाच्या जाेरावर वंचित बहुजन आघाडीही फाॅर्मात आली आहे. असे असताना ५० हून अधिक वर्षे महाराष्ट्रावर अधिराज्य करणाऱ्या काँग्रेसकडे मात्र आजघडीला नेतृत्वाचाच अभाव दिसून येताे. एकीकडे सत्ताधारी भाजप-शिवसेनेने काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांना सत्तेचे आमिष दाखवून आपल्या पक्षात ओढण्याची चढाओढ लावली आहे. या पार्श्वभूमीवर उरल्यासुरल्या निष्ठावंत काँग्रेसींकडे त्यांच्याच पक्षातील नेते संशयाने पाहू लागले आहेत. या संशयाच्या वातावरणातून बाहेर पडून एकमेकाचा विश्वास संपादन करण्याचे आव्हान सध्याच्या काँग्रेस मंंडळींसमाेर आहे, असे म्हणावे लागेल. प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर पक्षश्रेष्ठींनी गांधी घराण्यांशी एकनिष्ठ असल्याच्या एकमेव ‘पात्रते’वर बाळासाहेब थाेरात यांच्याकडे राज्याचे नेतृत्व दिले. विभागनिहाय कार्याध्यक्षही नेमले. मात्र आगामी विधानसभा निवडणुकांना सामाेरे जाण्यासाठी ही नवीन टीम सज्ज आहे, असे दिसत नाही. सत्ताधाऱ्यांविराेधात रान उठवून, बेजबाबदार कारभाराबाबत त्यांना जाब विचारण्याचे धाडसही राज्यात सर्वात माेठा विराेधी पक्ष असलेल्या काँग्रेस नेत्यांना दाखवता आलेले नाही. त्यांच्या या बाेटचेप्या भूमिकेमुळे राज्यात विराेधी पक्षच उरला नसल्याचे वातावरण आहे. राष्ट्रवादीच्या अनेक  नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आराेप असल्यामुळे पाच वर्षे या पक्षानेही विराेधी पक्षाची भूमिका वठवताना हात आखडता घेतला हाेता. मात्र आता निवडणुकांच्या ताेंडावर पवारांचा हा पक्ष सरकारविराेधात आक्रमक झालेला दिसताेय. पण सत्ताधाऱ्यांविराेधात एकीने लढण्याच्या आणाभाका घेणारा राष्ट्रवादीही काँग्रेसला दुय्यमपणाची वागणूक देताना दिसताे. एकूणच अशा नैराश्याच्या वातावरणात विधानसभा निवडणुकीच्या ‘युद्धा’आधीच काँग्रेस नेत्यांनी शस्त्रे म्यान केली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. -महेश रामदासी, वृत्तसंपादक