आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजीची उणीव भरून निघाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काळ कोणासाठीही थांबत नसतो. बाल्यावस्था पार करून शालेय शिक्षण, पाठोपाठ त्यालाच जोडून पुढील शैक्षणिक उद्दिष्ट गाठताना महाविद्यालयीन पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण अशा प्रकारे हा जन्मापासूनचा सुमारे दोन तपांचा कालखंड कसा सरला, हे समजलेदेखील नाही. शिक्षण पूर्ण होताच आता लग्न जमल्यामुळे आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचा असा वैवाहिक जीवनाचा टप्पा लग्नघटिकेसह जवळ येत आहे. मुहूर्त केवळ एक महिन्यावर येऊन ठेपल्याने लगीनघाई शिगेला पोहोचली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मैत्रिणीच्या घरी निमंत्रण पत्रिका देण्यासाठी मी स्वत: आई-वडिलांसोबत गेले असता मला एक अत्यंत भावनिक अनुभव आला. ठसठशीत कुंकू आणि नऊवारी साडी परिधान केलेल्या नम्रताच्या आजींनी आमची आस्थेने चौकशी केली. सोयरे कुठचे? नवरा मुलगा काय करतो? असे अनेक प्रश्न करून त्यांनी आमच्याशी आत्मीयतेने गप्पा मारल्या. उतारवयातील त्यांचा उत्साह तरुणाईला लाजवणारा होता. त्यांना पाहून मला आम्हास चार वर्षांपूर्वी सोडून गेलेल्या माझ्या आजीची प्रकर्षाने आठवण झाली. तिच्या सहवासातील आष्टी या आमच्या गावी व अन्यत्र घालवलेल्या क्षणांना उजाळा मिळाला आणि मधुर स्मृती जागल्या. त्यांना पाहून मला माझीच आजी जणू भेटली आहे, असे वाटले. अक्का असत्या, तर नातीचे किती कोडकौतुक झाले असते, असे बोल हल्ली वारंवार का कानावर पडत असतात त्याची प्रचिती आली. निरोप घेताना आजींनी मला हाताला धरून खाली बसायला सांगितले आणि कुंकू लावून ‘वत्सला भालेकडून सप्रेम भेट’ असे लिहून त्यांनी स्वत: छापून घेतलेली एक उखाण्यांची पुस्तिका मला भेट दिली. ही अनोखी भेट भावस्पर्शी होती. त्याचाच प्रभाव की काय, माझ्या मनात चार ओळी आपसूक जुळल्या, उणीव भरून निघाली आज माझ्या प्रेमळ आजीची, वत्सलेच्या वात्सल्याने भेट करविली जणू इंदिरेची.