आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे ऋण कसे फिटेल?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणसाच्या जीवनात अनेक प्रसंग घडत असतात. काही प्रसंग मनावर कोरले जातात, काही प्रसंगांमुळे मनालाच नाही, तर जीवनालाही उभारी येते. आपल्याभोवती अनेक माणसे असतात. कोण कधी देवाप्रमाणे मदतीला धावून येईल हे सांगता येत नाही. ही देव माणसं एखाद्या नंदादीपाप्रमाणे आयुष्याच्या गाभार्‍यात कायमची तेवत राहतात. अशा घटनांमागे दैवी संकेतच असले पाहिजेत. कारण माणसाचे आयुष्य घडण्यामध्ये या घटना अविस्मरणीय ठरतात. फेबु्रवारी 1966 मधील हा प्रसंग आहे... मी बीएडसाठी सांगलीतील कस्तुरबाई शिक्षण महाविद्यालयात शिक्षण घेत होतो. वार्षिक परीक्षेचे शुल्क 80 रुपये ताबडतोब कार्यालयात भरण्याची नोटीस कार्यालयात आली. तेवढी फी भरण्याएवढी माझी परिस्थिती नव्हती. याच काळजीत मी वर्गात एकटाच बसलेलो होतो. तेव्हा व्हरांड्यातून जात असलेल्या प्राचार्य ना. वा. भावे यांनी मला पाहिले. मला चिंतित अवस्थेत पाहून ते वर्गात आले. आस्थेने माझी विचारपूस केली. मी माझी अडचण सांगताच त्यांनी त्वरित स्वत:च्या पाकिटातील दहाच्या आठ नोटा म्हणजे 80 रुपये काढून माझ्या हातात दिले आणि तातडीने परीक्षा शुल्क भरायला आॅफिसात पाठविले. भावे सर जणू देव बनूनच माझ्या आयुष्यात आले, असे मला वाटले. पुढे परीक्षा झाली, आनंदाची गोष्ट म्हणजे मी कॉलेजात पहिला आलो. माझी 900 रुपयांची शिष्यवृत्ती हातात पडताच मी स्वत: सरांच्या घरी गेलो. फीचे 80 रुपये दिले, पेढेही दिले. व्यवहार पूर्ण झाला खरा, पण सरांचे ऋण मात्र अजूनही फेडू शकलो नाही, शकणारही नाही. पुढे पंढरपूरच्या माझ्याच शाळेत आपटे हायस्कूलमध्ये शिक्षक झालो, नंतर पर्यवेक्षक झालो आणि आठ वर्षे मुख्याध्यापकही बनलो. पैसा, मानसन्मान आणि सन्मानही भरपूर मिळाले. आज भावे सर नाहीत, पण त्यांचे स्मरण मला सतत होत असते. त्यांचे कर्ज फिटले, पण ऋण मात्र कायम राहणार आहे. अगदी मी जिवंत असेपर्यंत.