आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना स्वच्छंदी बनवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समाजातून एकत्र कुटुंबपद्धती हळूहळू नष्ट होत चालली आहे. त्या जागी विभक्त कुटुंबपद्धती उदयास आली आहे. विभक्त कुटुंबातली मुलं अधिक आत्मकेंद्री होत आहेत. आई-वडील दोघेही नोकरी करणारी असली तर आपल्या एकुलत्या एक मुलाला नको त्या सुख-सुविधा, सवलती पुरवण्याचा पालकांचा कल असतो, पण मुलांना पालकांचा सहवास, त्यांचा वेळ हवा असतो, हे विसरतात. पालक मुलांचे अतोनात, फाजील लाड करतात, असं मला वाटतं. त्यामुळे हे सर्व माझं आहे, मी कोणालाच देणार नाही, अशी भावना मुलांमध्ये रुजते. ‘मी’पणाचा अहंकार त्यांना वस्तू इतरांबरोबर शेअर करू देत नाही. काही मुले त्यामुळे उद्धट बनतात. त्यांच्यामध्ये सामाजिक भान दिसत नाही.
आपणच दुस-यांच्या भानगडीत पडू नये, अशी शिकवण देत असतो. आजचं जग हे अत्यंत असुरक्षित झाल्याने मुलांनी बाहेरच्या भानगडीत लक्ष देऊ नये. मग प्रश्न असा निर्माण होतो, की मुले नीडर आणि सक्षम कशी बनतील? बाहेरच्या घडामोडींनी ती कायम बिथरलेली राहावीत का? काही अचानक उद्भवणा-या समस्यांवर आपणच मुलांना मत मांडू द्यावे. खरी वस्तुस्थिती समजून त्यावर त्यांची प्रतिक्रिया घेतली जावी. मुलांना कर्तृत्ववान व संस्कारी बनवण्यासाठी त्यांना बाहेरच्या जगात स्वच्छंद विहरू द्यावे. त्यांना मोकळे जगू द्या, वावरू द्या. मुलांना मी, माझे या शब्दांच्या जागी ‘आपले’ म्हणण्यास शिकवा. मातीच्या गोळ्याला योग्य संस्कारसिंचन करा नाही तर ‘अति तेथे माती’ होण्यास वेळ लागणार नाही. असं केलं तरच मुलं आत्मकेंद्री बनणार नाहीत. हातातून सर्व निसटल्यावर मग नशिबालाच दोष देण्यापलीकडे काहीच उरणार नाही. औरंगाबादेत एका 17 वर्षांच्या मुलाने मावसभावाचाच गळा आवळून खून केला. ही घटना संस्कारक्षम मन नसल्यानेच घडल्याचे मनोवैद्यक सांगतात. यावरून तरी आपण धडा घेतला पाहिजे.