Home | Mukt Vyaspith | article of omkar shauche on woman dressing restriction issue

महिलेच्या पेहरावाला धर्माची जोड देणे चुकीचे

ओमकार शौचे | Update - Dec 28, 2016, 03:00 AM IST

आपण स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारतो, स्त्रियांना आरक्षण देतो; पण अंमलबजावणी करताना कारभार मात्र पुरुषांच्या हातात देतो.

 • article of omkar shauche on woman dressing restriction issue
  आपण स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारतो, स्त्रियांना आरक्षण देतो; पण अंमलबजावणी करताना कारभार मात्र पुरुषांच्या हातात देतो. शर्ट काढून सिक्स पॅक अॅब्स दाखवणाऱ्या अभिनेत्यांचे केवळ कौतुक करत नाही, तर अनुकरणही करतो; पण स्त्रियांच्या पोशाखावर मात्र हरकत घेतो. हे सर्व आपल्या पुरुषी मानसिकतेचे दर्शन घडवते.

  मोहंमद शमीच्या पोस्टवरून सोशल मीडियावर कल्लोळ माजला आहे. काहींनी तर “तू मुस्लिम आहेस, बायकोच्या कपड्यांकडे लक्ष दे’, इथपर्यंत आणि काहींनी तर त्याहीपेक्षा खालच्या पातळीला जाऊन आपली अक्कल पाजळली. खरे पाहता हा शमीचा पूर्णपणे खासगी प्रश्न आहे. इतकेच नव्हे, तर त्याच्या पत्नीला भारतीय संविधानाने दिलेले स्वातंत्र्य आहे. त्यामुळे तिच्या पेहरावावर टीका करण्याचा कोणालाही हक्क नाही. खाप पंचायतीचेदेखील अनेक क्रूर निर्णय आपण पाहिले आहेत. स्त्रियांना अतिशय हीन आणि विकृत स्वरूपाची वागणूक देण्यात हे पंच आपली श्रेष्ठता मानतात. वास्तविक पाहता टीका करणारे कट्टरतावादी, स्त्रीच्या पावित्र्याचा निवडा देणारे पंच इत्यादी मंडळींपैकी कोणीही धर्माचे अभ्यासक नसतात. पण केवळ सोशल मीडियावरील मत स्वातंत्र्याचा गैरवापर करून अशा प्रकारची अविचारी कृत्ये करतात. अर्धवट माहितीवर मतप्रदर्शन करून स्त्रीच्या पेहरावाला धर्माचे नाव चिकटवून तिचे चारित्र्यहनन करणाऱ्या लोकांना कठोरात कठोर शासन व्हावे.

  या देशात हिंदू धर्मातील स्त्रिया पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष झाल्या, मुस्लिम स्त्री मुख्यमंत्री झाली. ख्रिश्चन मदरने जगाला सेवेचा आदर्श घालून दिला. मोठ्या सांस्कृतिक क्रांतीनंतर, अनेक समाजसुधारकांच्या बलिदानानंतर आपली संस्कृती या आधुनिक टप्प्यावर पोहोचली आहे. आता पुन्हा स्त्रीच्या पेहरावाला धर्माचे नाव चिकटवून आपल्या संस्कृतीला मागे खेचणे चुकीचे आहे.
  ओमकार शौचे,
  मासमीडिया, वायसीएमओयू
  इंजिनिअरिंग, मेट, नाशिक

Trending