Home | Magazine | Madhurima | Article of Sankarshan Karhade in divyamarathi

राहून गेलंय...

संकर्षण कऱ्हाडे | Update - Apr 16, 2019, 12:04 PM IST

आयुष्यातली राहून गेलंची खंत थोडी जरी कमी करू शकलो तरी माझं लिखाण सार्थकी लागलं

  • Article of Sankarshan Karhade in divyamarathi


    माझं वय अजून तिशीत आहे. राहून गेलेल्या गोष्टींचा हिशेब करण्यापेक्षा पुढे काही राहून जाणार नाही याची यादी करायचं हे वय आहे. हल्ली सगळ्याच क्षेत्रांत स्पर्धा इतकी आहे की पहिलीतल्या पोरालाही बालवाडीत क्लास लावायचं राहून गेलं असं वाटण्याची दाट शक्यता आहे. दुसरं म्हणजे, राहून गेलं हे सो कॉल्ड फीलिंग मिळालं नाहीपेक्षा गमावल्यानंतर जास्त येतं. राहून गेलंच्या उदरातून नेहमी खंत जन्माला येते. राहून गेलं असं माझ्या आयुष्यात काय आहे...हं आठवलं. या सदरासाठीच्या लिखाणाच्या निमित्तानं मी माझा खासगी अनुभव तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो. ह्या लिखाणातून तुमच्या आयुष्यातली राहून गेलंची खंत थोडी जरी कमी करू शकलो तरी माझं लिखाण सार्थकी लागलं असं मला वाटेल. माझ्या आयुष्यात मोलाची आहेत ती माझ्या घरातली म्हातारी माणसं. आजी-आजोबा. माझ्या दोन्ही आजी आजोबांनी आमचे प्रचंड लाड केले. मला खूप मनापासून वाटतं की म्हातारी माणसं घरात आहेत हा आपल्या सवयीचा भाग होऊन जातो. ते आपल्याला महत्त्वाचे आहेत हे त्यांना सांगणं, आपल्या कृतीतून व्यक्त करणं आपल्याकडनं राहून जातं. आपलं आयुष्यं स्पर्धेमुळं प्रचंड गतीने पुढे जात असतं. पण त्यांचं थांबलेलं असतं. त्यांच्या बाबतीत पुढे जातं ते फक्तं वय..! जगरहाटी आहे, पान पिकणार, गळून पडणार, हे मला माहिती आहे. पण तरीही... माझा खूप वैयक्तिक अनुभव तुम्हाला सांगतो. माझ्या आईची आई अर्थात माझी आजी ८० च्या आसपास आहे. ती परभणीला असते. आजी एकटीच असल्याने तिला सतत आधाराची गरज असते. तिची तब्येत दर काही दिवसांनी, ‘नातेवाइकांना बोलवा’ अशी होत असते. माझी आई आणि मावशी आजीची आलटून पालटून काळजी घेतात. लहानपणी ज्या आजीच्या हातचा शिरा, चिवडा, पुरणपोळ्या मी पोटभर खाल्ल्या, माझ्या आजारपणात जिने रात्री जागून काढल्यात तिच्या अशा काळात मी तिच्याजवळ असणं महत्त्वाचं नाही का? पण शूटिंग, प्रयोग सोडून जाणार कसं? आजीची काळजी घेणाऱ्या आईचंही वय पन्नाशीच्या पुढे आहे. तिलाही आधाराची गरज आहे. पण, प्रॅक्टिकली मी मुंबईत असल्याने हे खरंच शक्यं होत नाहीए. आणि हेच “राहून जातंय..”


    आपण नेहमी म्हणतो “मुलगा मोठा झाला, हाताशी आला”, पण खूपदा वाटतं की, मी फक्त मोठा होतोय. हाताशी नाही येऊ शकत. कारण, मी मुंबई सोडू शकत नाही आणि आई-बाबा परभणी. मग त्यांना माझा आधार तो काय? मुद्दा हा की, आपल्याच माणसांसाठी मोठं होत असतांना त्यांच्याच सहवासाला मुकायचं. हे आजच्या आयुष्याचं गणित आहे. त्यांना आधार देणं, त्यांच्या सोबत असणं हे “राहून जातंय.” पण जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा, तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात, तुमच्यामुळे सगळं आहे’ ही एवढी गोष्टी तर आपण त्यांना सांगूच शकतो, नाही का? कदाचित राहून गेल्याची खंत जरा कमी होईल...जमलं तर नक्की करा...

    राहून गेलं ही भावना ‘मिळालं नाही’ पेक्षा ‘गमावल्यानंतर’ जास्त येते. 'राहून गेलं' च्या उदरातून नेहमी खंत जन्माला येते. म्हणून कधी-कधी वेळीच जागं होणं गरजेचं असतं. नाही का?

Trending