आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Chhatishgarh By Anand Pande, Divya Marathi

छत्तीसगडमध्ये काँग्रेसची लढाई स्वत:शीच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्तीसगडमधील सर्व अकराही जागांवर भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत आहे. दोन्ही पक्षांमध्ये बस्तरचे उमेदवार सोनी सोरी हेच एकमेव चर्चित उमेदवार आहेत. सोरी आम आदमी पार्टीच्या उमेदवार असल्या तरी नक्षलवादप्रकरणी त्यांना झालेल्या अटकेमुळे त्या ओळखल्या जातात. महासमुंदमधून माजी मुख्यमंत्री अजित जोगी आणि राजनांदगावमधून मुख्यमंत्र्यांचे पुत्र अभिषेक सिंह मैदानात असल्यामुळे त्यांची चर्चा आहे.


छत्तीसगडमधून या वर्षी काँग्रेसला ब-याच अपेक्षा होत्या. काँग्रेसने स्वत:विरुद्धच लढण्यापेक्षा भाजपशी थेट लढले असते तर कदाचित त्यांना आणखी 4-5 जागा मिळाल्या असत्या हे विधानसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री रमणसिंह यांनी किमान चार जागांवर तगडी स्पर्धा असू शकते असे भाकीत वर्तवले होते. पण नेहमीप्रमाणे काँग्रेस पुन्हा एकदा ऐन निवडणुकीच्या तोंडावर विखुरली गेली आणि त्याचा परिणामही त्यांना भोगावा लागला. सध्या रायपूरमधून उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी दिसून येत आहे. आधी छाया वर्मा यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्या जागी सत्यनारायण शर्मा यांना उमेदवारी दिल्यामुळे आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष भूपेश बघेल यांनी छाया वर्मा याच उमेदवार असल्याची घोषणा केल्यामुळे काँग्रेसच्या गोटातील वास्तव उघड झाले. त्यानंतर उरलेली कसर काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून भरून काढली. त्यामुळे काँग्रेस पूर्णपणे तोंडघशी पडली.


इतर राज्यांप्रमाणेच छत्तीसगडमध्येही जातीय राजकारण मोठ्या प्रमाणात चालते. मागासवर्गींयांमधील साहू आणि कुर्मी समाज, तर एससीमधील सतनामी आणि एसटी समाजातील मतदारच येथे निर्णायक भूमिका बजावतात. उमेदवार आणि स्थानिक समीकरण पडताळून बघितल्यानंतरच साहू समाज आपला निर्णय घेत असतो. कदाचित यामुळेच बिलासपूरमधून भाजपने काँग्रेस उमेदवार करुणा शुक्ला (अटलबिहारी वाजपेयी यांची भाची) यांच्याविरोधात नवोदित लखन साहू यांना तिकीट दिले आहे. सतनामी समाज मागील विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे भाजपसोबत दिसला होता. भाजप आपल्या रणनीतीमुळे त्यांना काँग्रेसपासून दूर ठेवण्यात यशस्वी ठरला होता, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यामुळेच छत्तीसगडच्या दहा आरक्षित जागांपैकी नऊवर भाजपने ताबा मिळवला होता. महासमुंद वगळता अन्यत्र सतनामी समाजाने भाजपला साथ दिली तर त्यात आश्चर्यकारक असे काहीच नसेल. येथील आकडेवारींचा विचार केल्यास आदिवासी समाजाने काँग्रेसला साथ दिल्याचे दिसून येते. 2008 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दहा आदिवासी जागांवर विजय मिळवला होता, तर 2013 मध्ये ही संख्या 16 वर पोहोचली होती. रायपूरमधून मागासवर्गीय (ओबीसी) छाया वर्मा यांचे तिकीट सत्यनारायण शर्मा (ब्राह्मण) यांना दिल्यामुळे काँग्रेसने विनाकारण कुर्मी समाजाची नाराजी ओढवून घेतली आहे. याचा भाजपला रायपूरमध्ये नक्कीच फायदा होईल. मात्र, इतर ठिकाणी ते कितपत फायदा उठवू शकतील हे पाहण्यासारखे असेल.


स्वाभिमान मंचाचे दीपक साहू यांना सोबत घेतल्याने दुर्गच्या भाजप उमेदवार सरोज पांडेय यांनी आपली स्थिती व्यवस्थित करून घेतली आहे. दुसरीकडे, सरगुजामध्ये विरोधी पक्षनेते टी. एस. सिंहदेव यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. सरगुजा विभागातून विधानसभेत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना सात-सात जागा मिळाल्या होत्या. छत्तीसगडमध्ये विजय मिळवण्यासाठी काँग्रेसकडे एकही मुद्दा नाही, तर भाजपला मात्र मोदी लाट आणि रमण सरकारच्या कामावरील विश्वासाचा फायदा होऊ शकतो.