आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालनाट्याचे भविष्य आता प्रसारमाध्यमांच्या हाती (शरद देऊळगावकर)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद शहरात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचालनालयामार्फत बालनाट्य स्पर्धेस प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या कलावंतांना, आयोजकांना नाट्य स्पर्धा होईपर्यंत आणि त्यानंतरही जो त्रास सहन करावा लागतो त्याचा आढावा घेणे किंवा पाढे वाचणे हा माझा हेतू नाही. कारण मी एका शाळेत शिक्षक असताना नाट्य स्पर्धेत भाग घेताना या अडचणी सोसल्या आहेत.

आता पूर्वीप्रमाणे म्हणजे १५ ते २० वर्षांपूर्वी जे शाळेचे सांस्कृतिक वातावरण होते ते आता राहिले नाही. शाळेचे स्नेहसंमलने म्हणजे आता इव्हेंट बनला आहे. वेशभूषा, दोन चार वाक्याची संवादफेक सिनेमाच्या गाण्यावर तीन- चार नृत्ये सादर करणे असे त्याचे मर्यादित आणि खर्चिक स्वरूप प्राप्त झाले आहे.

बालनाट्य सादर करावयाचे म्हटले तर त्यासाठी प्राथमिक तयारी म्हणजे बालनाट्याची संहिता शोधणे, ती मुद्रित रूपात भेटणे, ती शाळा चालकाच्या मुख्याध्यापकाच्या पसंतीस उतरणे, ती सादर करण्यास शिक्षक भेटणे, त्या शिक्षकास त्यासंबंधी अभिरुची असणे, नाट्य सादरीकरणाबद्दल त्याला ज्ञान असणे, नेपथ्य, प्रकाश योजना, रंगभूषा, वेशभूषा, संगीत याची जाण असणे, इतर सहकाऱ्यांचे सहकार्य मिळणे हा एक भाग झाला.

दुसरा भाग, विद्यार्थ्यांच्या सहभागाचा. त्यांच्या पालकाच्या संमतीचा, विद्यार्थ्यास शाळा- घर - शिकवणी - खेळ - टीव्ही पाहणे यातून नाटकाच्या सरावासाठी काढावा लागणारा वेळ याचा विचार करावा लागतो. शिवाय अभ्यासक्रमात अधिक गुण मिळावेत यासाठी तो करत असलेला प्रयत्न महत्त्वाचा घटक आहे आणि नाट्य सादरीकरणात सहभाग घेऊन त्याला मिळणार काय? तर शाबासकी- त्यासाठी एवढा वेळ देणे त्याला जमेलच असे नाही.
त्या बालनाट्य प्रयोगाचे फार तर ३ -४ प्रयोग होतील. त्यामुळे त्याचा अभ्यासावर होणारा परिणाम गृहीत धरून पालक मंडळी आपल्या पाल्याला नाटकात काम करण्याची परवानगी द्यायला उत्सुक नसतात, ही वस्तुस्थिती आहे.
शिवाय पालकांचे - विद्यार्थ्यांचे रूसवे फुगवेही शाळेला विचारात घ्यावे लागतात.नाट्य सादरीकरणासाठी अपेक्षित खर्च सोसण्याची शाळा चालकाची तयारी असतेच असे नाही. या झाल्या शालेय रंगभूमीच्या ढोबळ अडचणी. बालरंगभूमी चळवळ जिवंत राहावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या मोठ्या मंडळींना वरील सांगितलेल्या अडचणी शिवाय बालनाट्य सादरी करणासाठी जी नाट्यगृहे उपेक्षित असतात, त्याचा किराया परवडतोच असे नाही. कारण नाटकाचे तिकीट दर विद्यार्थ्यांना परवडले पाहिजेत. तिकिटाचे दर, नाट्यगृहाचा खर्च, कलावंताचे मानधन, नेपथ्य, संगीत, रंग व वेशभूषा यावर होणारा खर्च आणि प्रत्यक्ष मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही. शिवाय त्या बालनाट्याचे प्रयोग किती होणार? हाही प्रश्न त्यांच्या समोर असतोच. त्यापेक्षा नाट्य सादरीकरण करण्याऐवजी नाट्य प्रशिक्षण शिबिरे घेतली तर ती परवडण्यासारखी असतात, म्हणून अलिकडे मोठमोठ्या शहरात अभिनय शिबीरांचे आयोजन होत आहे. त्यांना प्रलोभन असते की भविष्यात टीव्ही सिरियल निघेल तेव्हा या अभिनयाचा त्यांना उपयोग होईल अन् व्यावहारिक पालकाला हा दृष्टिकोन पडतो. दिवाळी किंवा उन्हाळ्याच्या सुटीत तो आपल्या पाल्याला अशा शिबिरात सशुल्क सहभागी होण्याची परवानगी देतो. मात्र, अशा व्यावसायिक विचाराचे शिबिर प्रयोग अद्याप ग्रामीण भागापर्यंत पोहाेचले नाहीत. त्यामुळे बालनाट्य स्पर्धा रंगभूमीवर झाल्या पाहिजेत, असा आग्रह धरणारी मंडळी आहेत.

नांदेड येथे झालेल्या एका बालनाट्य स्पर्धेचा मी परीक्षक होतो. त्या वेळी एक बाब माझ्या नजरेस आली. त्या बालनाट्य स्पर्धेत शहरी शाळांचा सहभाग किती होता? आज औरंगाबादमध्ये ज्या बालनाट्य स्पर्धा होत आहेत, त्यात औरंगाबाद शहरातील किती आणि कोणत्या शाळेचा सहभाग आहे? प्रश्न पडतो एवढा खटाटोप कोणासाठी आणि का? मनात एका टोकाचा विचार येतो. हौसेला किंमत नसते. दोन्ही अर्थाने! हौसेसाठी एवढी आर्थिक उलाढाल करण्याऐवजी शासनाने या स्पर्धाच बंद केल्या तर ... आणि यासाठी खर्च होणारा पैसा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जर शासनानेच टीव्ही सिरियल, व्हिडिओ, इंटरनेट इत्यादी माध्यमांचा वापर करून या हौशी कलावंताची कला, त्यांचे कलागुण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले तर... हे विचार लवकर पचनी पडणार नाहीत, याची मला कल्पना आहे.

हे विचार जनतेच्या मनात रुजले जावेत यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न झाले तरी ते पटतीलच असे नाही. म्हणून सिनेसृष्टीतील तसेच टीव्ही सिरीयलच्या दिग्गज निर्मात्यांनी पुढाकार घेऊन हा प्रयोग राबवावा, जसे की, सारेगमसारख्या कार्यक्रमातून नवकलाकर, गायक पुढे आले आहेत. आज ना उद्या भविष्यात नाट्य क्षेत्राला आपले रुप बदलावे लागणार आहे. नाटके आता टीव्हीवर दिसू लागली आहेत. कट्यार काळजात घुसली, नटसम्राट या नाटकांनी आता नवी रूपे धारण केली आहेत. मग अशा या परिवर्तनाच्या काळात बालनाट्यालासुद्धा नवे वळण घ्यावे लागणार आहे आणि हे नवे वळण घेताना इलेक्ट्राॅनिक मीडियाचा आधार घ्यावा लागणार आहे. म्हणून यापुढे बालनाट्याचे भवितव्य प्रसारमाध्यमांच्या हाती जाईल असे वाटते. त्याच्या स्वागतासाठी किती जण पुढे येतात त्याची आता प्रतीक्षा पाहावी लागणार आहे.
शरद देऊळगावकर
औरंगाबाद
बातम्या आणखी आहेत...