आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नातवंडे लहान असताना...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नातवंडे लहान असताना अंगाखांद्यावर खेळवण्याचे दिवस असतात. आजी-आजोबांचे नातवंडावर मुलांपेक्षाही जास्त प्रेम असते. जर कोणी नातवांना रागावले की आजोबांचा जीव कासावीस होतो. नातवांनाही हवीहवीशी वाटणारी आजी आवडते. अंगाखांद्यावर खेळवणारी, काऊचिऊच्या गोष्टी सांगणारी, पक्षी-प्राण्यांचे आवाज काढून त्यांची ओळख करून देणारी, अंगाईगीत गाऊन झोपवणारी आजीच असते. मीसुद्धा नातवांना अशाच पद्धतीने वाढवले. हर्ष आणि यश या दोन नातवांत फारसे अंतर नव्हते आणि ते सारखेच दिसायचे. दोघांचेही हात धरून फिरायला घेऊन जाणे आवडायचे. त्या वेळी मला याचा आनंद वाटत होता. लोकही मला म्हणत असत, तुमचे गंगेत घोडे न्हाले. नातवांनाही माझा खूप लळा लागलेला होता. एकदा मी बाहेरगावी गेले होते. खूप दिवसांनंतर घरी परतले. ऑटोतून उतरताना त्या दोघांनी मला पाहिले, आनंदाने टाळ्या पिटून ‘दादी आ गये’ असे स्वागत करत होती. बॅग दारात ठेवून मीसुद्धा त्यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी गळ्याला घट्ट मिठी मारली. त्यांच्यासाठी आणलेला खाऊ त्यांच्या हातात देताच आनंदाने नाचत ते दोघे खाऊंचा आस्वाद घेत होते. त्यांच्या चेहवरील आनंद पाहून मला त्यांच्यासारखेच लहान होऊन नाचावे वाटत होते. ‘लहानपण देगा देवा’ असेच मलाही वाटत होते. आता माझे दोन्ही नातू मोठे झाले आहेत. पण माझ्यावरचे प्रेम जराही कमी न होता वाढतेच आहे. दहावीत चांगल्या मार्काने ते पासही झाले. आजही मला नमस्कार करूनच घराबाहेर पडतात. म्हणूनच दुधापेक्षा दुधाच्या सायीला जास्त जपावे असे म्हणतात. तर व्यापारीवर्गाचे मुद्दलापेक्षा व्याजावर जास्त प्रेम असते. तशी अवस्था आजी आणि नातवात असते. आजकाल संयुक्त कुटुंबाची उदाहरणे कमी झाली आहेत. माझ्या नातवाचे आणि मुलांचे माझ्यावर सर्वात जास्त प्रेम आहे. नातवांमुळे घरात उत्साह आणि आनंदाचे वातावरण टिकून राहते. हा माझ्या जीवनातील अनमोल ठेवा आहे.