Home | Editorial | Columns | article on gurudas kamat

गुरुदास कामत : विद्यार्थिदशेपासून काँग्रेसशी नाळ, केंद्रीय मंत्रिपदापर्यंत मजल

दिव्‍य मराठी | Update - Aug 23, 2018, 12:06 AM IST

कोणताही राजकीय वारसा नसताना काँग्रेससारख्या पक्षात येऊन सर्व प्रकारची महत्त्वपूर्ण पदे भूषवण्यास मिळणे सोपे नाही.

 • article on gurudas kamat

  कोणताही राजकीय वारसा नसताना काँग्रेससारख्या पक्षात येऊन सर्व प्रकारची महत्त्वपूर्ण पदे भूषवण्यास मिळणे सोपे नाही. परंतु माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांनी हा पराक्रम करून दाखवला होता. विद्यार्थिदशेपासूनच काँग्रेस विचारधारा अंगीकृत करून गुरुदास कामत यांनी आपला प्रवास सुरू केला होता. सोनिया आणि राहुल गांधी यांच्या अत्यंत निकटचे म्हणून ओळखले जाणारे गुरुदास कामत, मात्र गेल्या काही काळापासून मुंबई काँग्रेसच्या राजकारणाला ते कंटाळले होते. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कामावर ते नाराज होते आणि म्हणूनच त्यांनी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सोनिया गांधी यांच्या आग्रहामुळे ते काही महिन्यांपूर्वीच पुन्हा सक्रिय झाले होते.

  ५ ऑक्टोबर १९५४ ला कर्नाटकच्या अंकोलामध्ये गुरुदास कामत यांचा जन्म झाला होता. मात्र त्यांची संपूर्ण कारकीर्दही मुंबईतच घडली. त्यांचे वडील आनंदराव कामत हे प्रीमियर कंपनीत नोकरी करायचे. कामत कुटुंबीयांतील कोणीही राजकारणात नसताना कामत विद्यार्थिदशेपासूनच राजकारणात आले आणि अनेक महत्त्वपूर्ण पदे भूषवली. मुंबईतील कुर्ला येथे शालेय शिक्षण, पोद्दार महाविद्यालयात वाणिज्य शाखेची पदवी आणि गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून लॉ केलेले कामत गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये प्रथम आले होते, तर मुंबई विद्यापीठातून दुसरे आले होते. ते चांगले वक्तेही होते.

  १९७२ मध्ये त्यांनी विद्यार्थी चळवळीतून राजकारणात प्रवेश केला. त्यांच्या कामाने प्रभावित होऊन काँग्रेसने १९७६ मध्ये त्यांची एनएसयूआयचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. १९८० मध्ये त्यांची महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी आणि १९८४ मध्ये महाराष्ट्र युवा काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. १९८४ मध्येच त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली आणि खासदार म्हणून निवडून गेले. १९८७ मध्ये त्यांना भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्षपद आणि २००५ मध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आले होते. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष वाढवण्याचे काम त्यांनी उत्कृष्टरीत्या केले होते. त्यामुळेच गांधी कुटुंबीयांचे ते अत्यंत जवळचे म्हणून ओळखले जात. २००९ ते २०११ या कालावधीत त्यांनी गृह राज्यमंत्रिपद सांभाळले तसेच त्यांच्याकडे माहिती आणि तंत्रज्ञान खात्याचीही अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली होती. २०१३ मध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या महासचिव पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे राजस्थानसह गुजरात, दादरा-नगर हवेली, दीव-दमणची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

  चार वेळा भूषवले खासदारपद, २०१४ मध्ये पराभव
  मुंबईच्या पश्चिम उपनगरात गुरुदास कामत यांचे वर्चस्व होते. चार वेळा ईशान्य मुंबई आणि उत्तर पश्चिम लाेकसभा मतदारसंघातून खासदार झालेल्या गुरुदास कामत यांचा २०१४ मध्ये शिवसेनेच्या गजानन कीर्तिकर यांनी पराभव केला. तेव्हापासून मात्र त्यांच्या राजकीय कारकीर्दीला उतरती कळा लागली. मुंबई काँग्रेसमध्ये गुरुदास कामत यांच्या शब्दाला पूर्वीसारखे वजन राहिले नाही. विद्यमान मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पद्धतशीरपणे गुरुदास कामत यांचे पंख कापण्याचा प्रयत्न केला. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असूनही राहुल गांधींनी संजय निरुपम यांना अभय दिल्याने कामत पक्षावर प्रचंड नाराज होते. त्यामुळेच त्यांनी गेल्या वर्षी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. मात्र सोनिया गांधी यांनी त्यांची समजूत काढल्याने त्यांनी पुन्हा काम सुरू केले होते. मुंबईत त्यांनी कार्यक्रम घेण्याचा धडाका सुरू केला होता. संजय निरुपम यांनीही काहीशा नाराजीनेच त्यांच्याशी जुळवून घेतले होते. परंतु २०१९ च्या लोकसभा- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुदास कामत यांचे निधन झाल्याने काँग्रेसला मोठा फटका बसणार आहे.


  खंबीर, कणखर, निष्ठावान नेतृत्व हरपले : विखे पाटील
  गुरुदास कामत यांच्या निधनामुळे खंबीर, कणखर आणि निष्ठावान नेतृत्व हरपले असून त्यांच्या आकस्मिक निधनामुळे मोठा धक्का बसल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. कार्यकर्त्यांसाठी ते एक आधारस्तंभ होते. त्यांची नाळ थेट सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांशी जुळलेली असल्याने ते एक लोकप्रिय नेते होते. मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून त्यांनी पक्षाला अधिक संघटनात्मक बळकटी दिली. सध्याच्या संघर्षाच्या काळात काँग्रेसला त्यांच्या अनुभवी मार्गदर्शनाची आणि उत्तम संघटनकौशल्याची अतिशय गरज होती. परंतु, त्यांनी अचानक ‘एक्झिट’ घेतल्याने पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे ते म्हणाले.

  उत्कृष्ट संघटक गमावला : मुख्यमंत्री फडणवीस
  गुरुदास कामत यांच्या निधनाने एक उत्कृष्ट संघटक आणि सर्वसामान्यांशी बांधिलकी असणारा नेता गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. कामत यांचा मुंबईतील सर्व स्तरांतील नागरिकांशी अतिशय निकटचा संबंध होता. तसेच या महानगरातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ते सातत्याने आग्रही असत. उत्कृष्ट संघटनकौशल्यासोबत अभ्यासू आणि सडेतोड भूमिका घेणाऱ्या कामत यांचे राजकारणासोबत विविध क्षेत्रांतील योगदान लक्षणीय आहे. आपल्या पक्षासह केंद्रीय मंत्रिमंडळातही त्यांनी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या होत्या. त्यांच्या निधनाने मुंबईच्या राजकीय क्षेत्राने सर्वसामान्यांशी जोडलेला एक महत्त्वाचा नेता गमावला आहे.


  समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड : अशोक चव्हाण
  ‘गुरुदास कामत यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने निष्ठावान व समर्पित नेता गमावला आहे. कामत आयुष्यभर काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहिले. युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. विविध पदांवर कार्यरत असताना काँग्रेस पक्षाला बळकटी देण्याचे काम त्यांनी केले. चार वेळा खासदार व केंद्रीय मंत्री म्हणून मुंबई शहराच्या विकासात त्यांनी मोलाचे योगदान दिले. ते कुशल संघटक व अभ्यासू नेते होते. त्यांच्या निधनामुळे कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे,’ अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी श्रद्धांजली वाहिली.

Trending