हरियाणामध्ये मतदानाला चार दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे प्रत्येक जण
आपले हुकमी एक्के वापरण्याच्या प्रयत्नात आहेत. गेल्या दोन निवडणुकांत इतर पक्षांना पाय रोवण्याची संधी न देणा-या काँग्रेसला या वेळी मात्र सर्व गमवावेच लागणार अशी परिस्थिती आहे. सध्या त्यांचा राज्यात 10 पैकी 9 जागांवर ताबा आहे, तर चौदाव्या लोकसभेत सर्व 10 जागा त्यांनी काबीज केल्या होत्या; पण आता काँग्रेसच्या हातून या जागा या चार पक्षांच्या युद्धात कोणाकडे जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात काँग्रेसला सर्वात मोठे आव्हान देणा-या इंडियन नॅशनल लोकदलाचे ग्रामीण भागात वर्चस्व आहे, तर भाजपने शहरांमध्ये काँग्रेसला पर्याय म्हणून ओळख मिळवली आहे. त्यामुळेच ज्या ज्या वेळी या दोन पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली, त्या वेळी त्यांनी काँग्रेसला पाणी पाजले; पण या वेळी इंडियन नॅशनल लोकदलाचे ओमप्रकाश चौटाला आणि त्यांचे राजकीय वारसदार अजय चौटाला भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये तुरुंगवास भोगत आहेत. भाजप हरियाणा जनहित काँग्रेस या लहान पक्षाबरोबर निवडणूक लढवत आहे. त्यांना फारच मोजका पाठिंबा आहे. त्यामुळे भाजप व इंडियन नॅशनल लोकदल यांच्यात अखेरच्या क्षणापर्यंत बोलाचाली सुरू होत्या; पण त्याला यश आले नाही. त्यामुळे दोघे समोरासमोर उभे ठाकले आहेत; पण ते काँग्रेसविरोधी मतांचे विभाजन करत आहेत. एनडीएचा घटक पक्ष असणारा अकाली दल केंद्रात एनडीएचा सहकारी आहे, पण राज्यात इंडियन नॅशनल लोकदलाचा प्रचार करत आहे. त्यामुळे विरोधी मतांचे विभाजन अधिक वाढले आहे.
भाजप संघटनात्मक त्रुटी आणि मोठ्या नेत्याच्या अनुपस्थितीतही अत्यंत उत्साहात निवडणूक लढवत आहे. उत्साहाचे कारण मोदी लाट; पण चुकीच्या तिकीट वाटपाने गणिते बिघडली आहेत. त्यामुळे आधी केवळ एका जागेची अपेक्षा असणा-या काँग्रेसला आता चार ठिकाणी विजयाची आस लागली आहे. काँग्रेस सोडून पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या तीन उमेदवारांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मतदारांबरोबरच कार्यकर्त्यांची नाराजीही स्पष्टपणे जाणवत आहे. मोदींच्या सभेतही लोक मोदी चांगले आहेत, पण उमेदवार योग्य नाहीत, अशा चर्चा करताना आढळले. त्यामुळे बहुतांश उमेदवार मोदींच्याच आधारावर असल्याचे स्पष्ट आहे.
काँग्रेसच्या विरोधात सत्ताविरोधी लाट आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यासमोरचे सर्वात मोठे आव्हान मुख्यमंत्र्यांचे पुत्र व सध्याचे खासदार दीपेंद्रसिंह हुडा यांना विजयी करण्याचे आहे. रोहतकमधून सध्या तरी त्यांची स्थिती समाधानकारक आहे, पण इतर जागांवर एकही उमेदवार सुरक्षित नसल्याचे जाणवत आहे. निवडणुकीत मुद्द्यावर फार बोलले गेले नसले, तरी भूसंपादनात मनमानी आणि विकासात भेदभाव अशा आरोपांमुळे अनेक वेळा असंतोष उफाळून आलेला आहे. या मुद्द्यांमुळे ज्येष्ठ नेते राव इंद्रजित यांनी काँग्रेस सोडली होती. मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुडा यांचे सर्वात निकटवर्तीय आमदार विनोद शर्मा (जेसिका लाल हत्याकांडातील आरोपी मनू शर्माचे वडील) हेही निवडणुकीपूर्वीच त्यांच्यापासून दुरावले आहेत. दुसरीकडे केंद्रीय मंत्री शैलजा आणि राज्यसभा सदस्य चौधरी वीरेंद्र सिंह यांनीही वारंवार हुडा यांना विरोध केला आहे. प्रदेश अध्यक्षपदावरून गच्छंती झालेले फुलचंद मुलानाही प्रचाराच्या रणधुमाळीत दिसले नाहीत.
आपच्या दिल्लीतील विजयामुळे हरियाणातही उत्साह दिसून आला होता. राज्यातील काँग्रेस आणि इंडियन नॅशनल काँग्रेस या पक्षांच्या जातिवादी, कौटुंबिक आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या राजकारणातून सुटकेचा मार्ग त्यांना सापडला होता. अरविंद
केजरीवाल यांनी योग्य पद्धतीने डाव मांडला असता, तर या वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकीत तेही सत्तेच्या जवळपास पोहोचले असते. पण आता त्यांना एकही जागा मिळवणेही कठीण ठरेल. तिस-या क्रमांकासाठीही झगडावे लागेल. स्वत: योगेंद्र यादव हेच गुडगावच्या रणांगणात फसले आहेत.
(लेखक हरियाणाचे स्टेट एडिटर आहेत. )