आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘इस्तंबूल इस्तंबूल’

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध जागतिक भाषांतील उत्तम साहित्य आपल्या भाषेत अनुवादित करून घेतल्यामुळे या साहित्याचा आस्वाद घेता येतो. तसेच त्या त्या देशांच्या संस्कृतीचा परिचयही होतो. म्हणूनच पॉप्युलरने असे साहित्य मराठीत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. या उपक्रमात तुर्की भाषेतल्या महत्त्वपूर्ण कादंबऱ्यांचे अनुवाद प्रकाशित करण्याचे निश्चित झाले. त्यापैकी ही एक कादंबरी.


सुप्रसिद्ध तुर्की लेखक बुऱ्हान सोनमेझ यांची ‘इस्तंबूल इस्तंबूल’ ही तुर्की भाषेतील कादंबरी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. इस्तंबूल येथील एका तुरुंगातील चार कैद्यांची ही कथा.


जीवन, प्रेम, प्रेमभंग, देव, काळ, वेदना, शहर, विश्वासघात, कृत्रिमता इत्यादी अनेक विषयांना तरलपणे स्पर्श करणारी कादंबरी असे ‘इस्तंबूल इस्तंबूल’ या कादंबरीचे वर्णन करता येईल. नरक म्हणजे वेगळी अशी काही जागा नसते तर आपण वेदनेने तळमळत असताना कुणालाच त्याची थोडीशीही पर्वा नसणे अशी जागा म्हणजेच नरक असतो. 


काळाचा पक्षी भूतकाळात वेगाने उडत असतो, पण वर्तमानात आला की तो एका जागीच तरंगत राहतो. आणि कुठल्याही परिस्थितीत माणूस आशेवर जगू शकतो, त्याच्या शरीराला कैद केलेले असले तरी त्याच्या मनावर कुणाचीच मालकी नसते, हे या कादंबरीत उत्तम तऱ्हेने व्यक्त झाले आहे. मृत्यूच्या छायेत असूनही तळघरातल्या कोठडीतील कैदी एकमेकांना नवलपूर्ण गोष्टी सांगतात, त्या गोष्टींत वाचकही रंगून जातो आणि या रूपकात्म कादंबरीच्या प्रेमातच पडतो. वेगवेगळ्या भाषांत या कादंबरीचे अनुवाद प्रसिद्ध झाले असून मराठीत या कादंबरीचा अनुवाद सविता दामले यांनी तितकाच उत्कंठावर्धक शैलीत केला आहे.


पुस्तकाचे नाव : इस्तंबूल इस्तंबूल 
लेखक : बुऱ्हान सोनमेझ 
अनुवाद : सविता दामले 
प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन, मुंबई 
मूल्य : ३५० रुपये

बातम्या आणखी आहेत...