आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वगसम्राट काळू-बाळू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा कलावंत. काळू आणि बाळू दोन जुळे भाऊ. काळू म्हणजे लहू संभाजी खाडे, तर बाळू म्हणजे अंकुश संभाजी खाडे. वडिलोपार्जित तमाशाची परंपरा असणाऱ्या संभाजी आणि शेवंताबाईं कवलापूरकर या दांपत्यापोटी कवलापूर (जि. सांगली) येथे १६ मे १९३३ रोजी दोघांचा जन्म झाला. काळू-बाळू सहा वर्षांचे  असताना वडिलांचे अर्धांगवायूच्या झटक्याने निधन झाले. शिवा-संभाचा तमाशा त्या काळी वर्तमानकाळातील घडामोडींवर भाष्य करणारा एकमेव तमाशा होता. सामाजिक समस्यांना वाचा फोडणारा हा तमाशा संभाजी खाडे अचानक निधन पावल्याने मोडकळीस आला. पुढे शिवाने तमाशाचा बोर्ड उभा केला. काळू-बाळू १५-१६ वर्षांचे असताना वडिलांची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी तमाशा सुरू करायचा, असा निश्चय  केला. पूर्वी तमाशाचा आत्मा म्हणजे सोंगाड्या  सरदार आणि नाच्या. तमाशात काम करणारी माणसं तर मिळाली, पण नाच्या आणि नाचे काही मिळेना, तेव्हा बाळूने तमाशात नाचकाम करण्याचा निर्णय घेतला. कागलवाडी येथील शकुंतला या जोगतिणीची मुलगी नायकीण म्हणून मिळाली. शकुंतलेबरोबर काळू-बाळूचा तमाशा उभा राहिला. काळू-बाळूने तमाशाची बांधणी एकदम कडक केली होती. काळू- बाळू दोघेही जुळे असल्यामुळे कोण काळू की कोण बाळू हे ओळखणे कठीण होते. दोघांचा चेहरा, रंगरूप, आकारमान तंतोतत जुळणारे. एकाला लपवावं आणि दुसऱ्याला उभं करावं असे हमशकल भाऊ चहुमुलखी नावलौकिक मिळवत होते. जवळजवळ १५ वगनाट्यं काळू-बाळू तमाशा मंडळाने सादर केली . त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. कला महोत्सव हैदराबाद, आदिवासी लोककला परिषद भोपाळ, अखिल भारतीय नाट्यसंमेलन, कलागौरव पुरस्कार पुणे (२००५), लोकशाहीर भाऊ फक्कड स्मृती पुरस्कार सातारा, कलेचे शिलेदार पुरस्कार सांगली आणि भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२०००),  पुणे महानगरपालिकेचा पठ्ठे बापूराव पुरस्कार (२००५) इत्यादी पुरस्कारांनी या जोडगोळीला सन्मानित केले.