आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बड्यांचे तिकीट, छोट्यांची अडचण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोदी- राजनाथांनी गणित बिघडवले
चर्चित चेहरे आहेत, फायदा होईल, असा विचार करून भाजपने तिकीट दिले होते, पण झाले उलटेच. अनेक शहरांत बाहेरच्या उमेदवारांना विरोधाचा सामना करावा लागत आहे.
चंदिगडमध्ये किरण खेर, गाझियाबादमध्ये माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह दिल्लीमध्ये उदित राज, देवरियामध्ये कलराज...या आणि अशा अनेक ठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात येत आहेत, विरोधाच्या घोषणा दिल्या जात आहेत. स्थानिकांनाच उमेदवारी द्या, निवडून आणण्याची जबाबदारी आमची, बाहेरचा उमेदवार लादला तर निवडून आणण्याची जबाबदारी तुमची, असे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.
मोदी आणि राजनाथ वादाचे मूळ
मोदींना खुश करण्यासाठी वाराणसीला पाठवल्यामुळे मुरलीमनोहर नाराज झाले. मुरलीमनोहरांची समजूत काढून त्यांना कानपूरला पाठवल्यामुळे कलराज रुसले. कसेबसे कलराज यांची समजूत काढून त्यांना देवरियाला पाठवले तर तेथून दावा सांगणारे दिग्गज नेते सूर्यप्रताप शाही संतापले. तिकडे राजनाथ गाझियाबाद सोडून लखनऊला पोहोचले तर लालजी टंडन नाराज झाले. राजनाथ सिंहानी गाझियाबादसाठी माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांना पाठवण्याचा प्रयत्न केला तर कार्यकर्ते भडकले. मोदी यांचे खास जेटली यांना खुश करण्यासाठी अमृतसरला पाठवण्यात आले तर सिद्धू समर्थक नाराज झाले. तिकडे मोदी समर्थक किरण खेर यांना चंदिगड भाजपने रिजेक्ट करून टाकले आहे.


विरोधाचे हेसुद्धा कारण
उदित राज । दिल्लीतून मैदानात. उदित राज दलित नेते आहेत. ते सवर्णांच्या विरोधात बोलत होते म्हणून आम्हाला ते मान्य नाहीत, असे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
व्ही. के. सिंह। गाझियाबादच्या स्थानिक नेत्यांना मान्य नाहीत. त्यांनी संगीत सोम यांना तिकीट द्या, आम्हाला आमच्या जातीचा नेता हवा आहे, लादलेला नेता नको, असे त्यांचे म्हणणे आहे.


किरणला काळे झेंडे, अनुपमवर अंडी फेकली
चंदिगडमध्ये हायप्रोफाइल लढत आहे. काँग्रेसचे पवनकुमार बन्सल आणि ‘आप’च्या गुल पनाग यांच्या विरोधात किरण खेर मैदानात उतरल्या आहेत. मंगळवारी दुपारी किरण खेर मुंबईहून चंदिगडला पोहोचल्या. जवळपास 40 मिनिटे विमानतळाच्या बाहेर येऊ शकल्या नाहीत. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आणि ‘परत जा’ अशा घोषणा दिल्या. सोबत त्यांचे पती अनुपम खेरही होते. दोघे कसेबसे बाहेर पडले आणि कारने रवाना होत असताना काही लोकांनी अनुपम यांच्यावर अंडी फेकली.


मी बाहेरची नव्हे, इथलीच मुलगी
मी बाहेरची नाही. येथेच लहानाची मोठी झाले. इथलीच मुलगी आहे. जे लोक विरोध करत आहेत, तेही सोबत येतील. हे लोक माझ्यावर जास्त दिवस नाराज राहणार नाहीत. आम्ही एका उद्देशाने निवडणूक लढवत आहोत. त्यामुळे छोटी-मोठी नाराजी दूर सारून एकजूट व्हायलाच हवे.
- किरण खेर, पत्रकार परिषदेत


‘आप’ उमेदवाराकडून तिकीट परत
आम आदमी पार्टीच्या आमदार राखी बिडलान उत्तर- पश्चिम दिल्लीतून निवडणूक लढवतील. येथून आधी पार्टीने महेंद्रकुमार यांना तिकीट दिले होते. त्यांनी तिकीट परत केले. ‘आप’ने 26 उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे.


महाराष्ट्रात नेत्यांची पळापळ
शिवसेनेचे प्रवक्ते राहुल नार्वेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यांना मावळचे तिकीटही देण्यात आले, तर भाजपने मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या हिना गावित यांना नंदुरबारमधून तिकीट देण्याची तयारी केली आहे. राष्ट्रवादीने गावितांना मंत्रिपदाबाबत इशारा दिला आहे.


सतपाल महाराज नाराज
काँग्रेसमधील तिकीट वाटपावरून सतपाल महाराजही नाराज आहेत. मंगळवारी त्यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत यांची भेट घेतली. महाराज एवढे नाराज आहेत की त्यांनी रावत यांची तब्बल 40 मिनिटे वाट पाहिली, असे सांगितले जाते.


राहुल यांच्या फुग्याला छिद्र : शिवसेना
राहुल ज्या फुग्यांमध्ये हवा भरत आहेत, त्याला आधीपासूनच छिद्र आहे. या कसरतीत त्यांच्या गालाची हवाच फुटून जाईल. कोणत्याही नेत्याला काँग्रेसचे तिकीट नको आहे. मनीष तिवारींसारखे तरुण नेतेही प्रकृतीची कारणे सांगत आहेत, असे शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रात म्हटले आहे.