आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्चर्यकारक बचावलो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझा मूळ पिंड हा धार्मिक वृत्तीचा, देवाधर्मावर विश्वास ठेवणारा असला तरी अंधश्रद्धा बाळगणारा मुळीच नाही. माणसाची संतावरची श्रद्धा निर्हेतुक असेल तर त्याला प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. हे खरेच आहे. मला अद्यापही 25 सप्टेंबर 2012 चा एक प्रसंग स्मरणात आहे. त्या प्रसंगातून आम्ही मरणाच्या दाढेतून कसे परत आलो आणि आज जिंवत आहोत याचे आश्चर्य वाटते. छोट्या चिरंजिवाने पुण्यात नोंदणी केलेल्या फ्लॅटचा हप्ता भरण्यास उशीर झाला होता आणि ब-याच दिवसांपासून घरात ठेवलेली गाडी बाहेर फिरण्यासाठी काढलेली नसल्याने मी विचार केला की, स्वत:च्या कारने पुण्याला जाऊन हप्त्याचे पैसे भरून टाकावेत. मधल्या मुलाने होकार दिल्याने त्या दिवशी पहाटेच्या सुमारास आम्ही दोघे आमच्या कारने निघालो.

अहमदनगर सोडल्यानंतर गाडी साधारणत: 90-100 च्या वेगात असताना चास गावाजवळ रस्त्यावर एक भला मोठा ट्रक उभा होता. तो माझ्या मुलास कसा दिसला नाही हे आता सांगता येणे अवघड आहे. तो स्वत: गाडी चालवत होता. मी त्याच्या शेजारी बसून श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांची पोथी नुकतीच वाचून समोरच ठेवली होती. अचानक तो ट्रक माझ्या दृष्टीस पडला आणि मी मोठ्याने ओरडलो, अरे गाडी ट्रकवर आदळणार आहे, त्याने क्षणाचाही विलंब न लावता एकाएकी उजवीकडे स्टेअरिंग फिरवले आणि पाहतो तो काय? उजव्या बाजूला उंच दुभाजक होते त्यावर आमची गाडी आदळणार परत मुलाने गाडीचे स्टेअरिंग डावीकडे फिरवले आणि गाडी सुरक्षितरीत्या त्या ट्रकला ओलांडून दुभाजकाला थोडाही स्पश्र न करता रस्त्याला लागली. थोडे अंतर गेल्यानंतर मी मुलाला गाडी थांबवण्यास सांगितली. मी शांतपणे मुलाला विचारले असता, त्यालाही हे सर्व कसे घडले सांगता आले नाही. तो म्हणाला, मी तुमचा आवाज ऐकला आणि हे सर्व अनपेक्षित घडले. स्वामी समर्थांनीच या प्रसंगातून तारले, असेच वाटते. नसता काही अघटितच घडले असते.