आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तो राजहंस एक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिलू तयात एक... या गदिमांच्या आशयघन भावगीताने मराठी माणसाच्या मनावर गारूड केलेले होते. जे आजही कायम आहे. बदकांच्या कळपात चुकून एक राजहंसाचे पिलू जाते. ते आपली ओळख विसरते. इतरांच्या तुलनेत असणारा वेगळेपणा त्याला कमीपणाचा वाटतो. त्याच भावनेने ते बदकांच्या कळपात वावरत असते; परंतु जेव्हा आपण राजहंस आहोत, असे त्यास समजते. तेव्हा ते आकाशात उमेदीने झेपावते, असा या भावगीताचा भावार्थ आहे. या राजहंसाची आठवण व्हावी, असाच अनुभव मला हैदराबाद नगरीत आला. निझामशाहीच्या खुणा ठायी ठायी जपणा-या या ऐतिहासिक नगरीत जागोजागी अनेक लहान-मोठे तलाव आहेत. बहुतेक सर्व ठिकाणी जलपर्णींचा विळखा या तलावांना पडलेला आहे. मात्र, या तलावाच्या कडेने आजही गर्द झाडी आहे. त्यामुळे पक्ष्यांच्या निवासाची सोय झाली आहे. मियापूरमधील एका तलावाकाठी असलेल्या झाडीत बगळे, बदके, पाणकोंबड्या, कावळे, चिमण्या, साळुंख्या, पारवे, होले, भोरड्या, घारी, भारद्वाज अशा विविध पक्ष्यांचे वास्तव्य येथे आहे. सिमेंटच्या जंगलाच्या पार्श्वभूमीवर हे दृश्य सर्वांनाच सुखावते. याच ठिकाणी मला एक प्रसंग अनुभवण्यास मिळाला.... एका चिंचेच्या उंच झाडावर घारीचे घरटे होते. त्यात एकच पिल्लू असावे. त्याची पूर्ण वाढ झाल्याने त्या घारीने त्याला उडण्यासाठी घरट्याबाहेर काढले. रोज सकाळी हे प्रशिक्षण चालायचे. एकदा धाडस करून ते पिल्लू एकटेच घरट्याबाहेर पडले आणि उत्साहाच्या भरात वाट चुकले. भीतीने ओरडू लागले. तसे कावळे त्याच्याभोवती जमा झाले. या प्रकाराने ते पिल्लू अधिकच घाबरले. तरीही ते मोठे पंख पसरून विरोध करू लागले. कावळे त्याच्यावर झडप घालून त्याला ठार मारणार, इतक्यात भक्ष्य शोधण्यास गेलेली त्याची आई म्हणजे घार तेथे आली. तिला पाहताच सगळे कावळे उडून गेले. पिल्लू आईच्या पंखाखाली विसावले होते.