आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ गायकाचा साधेपणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुष्यात अनेक माणसे हरघडी येत असतात. त्यांचा सहवास ही एक न संपणारी आठवण आहे. त्यातही कलाकार, गायक यांचा सहवास किती सुगंधित असतो, त्यांच्या आठवणी किती रम्य असतात याचे उदाहरण वाचण्यासारखे आहे. सोलापूर आकाशवाणी केंद्रावर सकाळच्या वेळी कधी कधी गायक जयवंत कुलकर्णी यांचे नाव आणि त्यांचे बहारदार आवाजातील गाणे ऐकायला मिळते. ग्रामीण बाजाच्या आगळ्यावेगळ्या सुरांच्या गाण्यांनी एकेकाळी नुसती धमाल उडवली होती. 25 ते 30 वर्षांपूर्वी त्यांची आणि माझी झालेली समक्ष मुलाखत व त्यांचा अल्प सहवास मला लाभला. त्या वेळी मी शासकीय नोकरीत असताना एकेदिवशी एक सडपातळ, नाकेली, काळीसावळी अन् कृश मूर्ती माझ्यासमोर येऊन उभी राहिली. अशोक सुरतगावकर हे त्या वेळी सोलापुरातील एक नावाजलेले मिमिक्री आर्टिस्ट होते. माझ्यासमोर येऊन उभे राहिलेल्या त्या व्यक्तीने आपली ओळख गायक जयवंत कुलकर्णी अशी करून देत अशोक सुरतगावकर यांचा पत्ता मला विचारला. मी जेव्हा सोलापूरला येतो तेव्हा अशोक सुरतगावकर यांना जरूर भेटतो, असे जयवंत कुलकर्णी यांनी मला सांगितले. मी त्यांच्यावर लेख लिहिण्याची तयारी दर्शवली तेव्हा जयवंत कुलकर्णी यांनी मुंबईला गेल्यानंतर गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर उत्तरा केळकर यांच्यासमवेत गायलेल्या कार्यक्रमांचे फोटो, वृत्तपत्रांतील लेखांची कात्रणे पाठवली.
हा लेख सुंदर फोटोंनी सजवून मी त्या वेळी एका साप्ताहिकात प्रसिद्ध केला. प्रसिद्ध झालेल्या लेखाचे अंक त्यांना पाठवून दिले. जयवंत कुलकर्णी यांना फार आनंद झाला. सोलापुरात जेव्हा आपले कार्यक्रम होतील तेव्हा पुढच्या रांगेत तुमचे आसन राखीव ठेवू, असे सांगितले. त्या वेळी अभिनेते आणि विनोदवीर दादा कोंडके आणि गायक जयवंत कुलकर्णी यांचा आवाज हे कॉम्बिनेशन अफलातून होते. तशीच गाणीही लोकप्रिय होती. तरीही पुरेशा प्रसिद्धीअभावी आपण अंधारात असल्याची खंत कुलकर्णी यांना होती.