आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे लक्ष्य केवळ मोदीच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसने चांगलाच धसका घेतलेला दिसून येतो. गेले दोन दिवस भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेसच्या मुख्यालयात याचा प्रत्यय येतो आहे. अलीकडच्या काँग्रेसच्या पत्रकार परिषदांमध्ये ‘मोदी एके मोदी’ असाच पाढा वाचला जातोय. काल (गुुरुवारी) आणि आज काँग्रेसचे राष्‍ट्रीय प्रवक्ते शक्तिसिंग गोहिल यांनी पत्रकार परिषदेमध्ये केवळ मोदींना लक्ष्य केले. काल त्यांनी गुजरातच्या समुद्रतटीय सुरक्षेचा विषय मांडून त्याकडे मोदी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला. हिंमत असेल तर दहशतवाद्यांनी गुजरातमध्ये पाय ठेवावा, अशी गर्जना करणा-या मोदींच्या गुजरातमध्ये लगेच बॉम्बस्फोटाची मालिका होत असते. त्यांना केवळ स्वत:ची सुरक्षा महत्त्वाची वाटते. सामान्य जनतेशी त्यांचे काहीही देणे-घेणे नसल्याची टीका करण्यात आली. आज त्यांनी गुजरातचे अमूलचे बटर ही मोदींची देण नसून काँग्रेसच्या काळातच हे प्रकल्प सुरू झाल्याचे सांगितले. संपूर्ण देशात मोदींची हवा आहे; मात्र ती केवळ पंख्याची असते तशी तांत्रिक असून त्याचे परिणाम निकालानंतरच दिसून येतील. मोदींनी शेतक-यांना एक पैशाचीही मदत दिलेली नाही. विजेच्या बाबत श्रेय लाटण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मात्र, गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार असतानापासून तिथे वीज आहे. मोदींची आकडेवारी ही फसवी आणि देशातील लोकांची दिशाभूल करणारी असल्याचा आरोपही आज काँग्रेसने केला. भाजपकडे लोक नसल्याने काँग्रेसच्या लोकांना भाजप उमेदवारी देत असल्याकडेही लक्ष वेधले. मात्र, काँग्रेसच्या नेत्यांना बाहेर का पडावे लागत आहे? त्यांची दखल पक्षाने का घेतली नाही? याचे समाधानकारक उत्तर या प्रवक्त्याकडे नव्हते. आपण मोदींना घाबरताय का? या प्रश्नावर त्यांनी भाष्य करायचे टाळले.
सोनिया, राहुलविरुद्ध सपाचा उमेदवार नाही
लखनऊ. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींविरुद्ध रायबरेलीत आणि राहुल गांधींविरुद्ध अमेठीतून उमेदवार देणार नसल्याची औपचारिक घोषणा समाजवादी पार्टीने शुक्रवारी केली. मागील सार्वत्रिक निवडणुकीतही सपाने दोन्ही ठिकाणी काँग्रेसला वॉकओव्हर दिला होता. विशेष म्हणजे काँग्रेसनेही मैनपुरीतून आझम खान आणि कन्नौजमध्ये डिंपल यादव यांच्या विरोध अद्यापही उमेदवाराची घोषणा केलेली नाही.