Home | Mukt Vyaspith | article-on-reading-interest

माझं वाचन ... माझा दृष्टीकोन

- | Update - May 19, 2011, 03:38 PM IST

वाचन ही एक प्रक्रिया असते. आधी एक वाचन त्यात काहीतरी भिडतं आपल्याला अस्तित्वाशी मिळतं जुळतं. मग पुस्तक वाचून झालं तरी आवर्तनं उठत राहतात मनात.

 • article-on-reading-interest

  "मनीच्या कुशीत झोपलय कोण? इटुकली पिटुकली पिल्ले दोन" मांजरीच्या चित्रावर बोट ठेवल की मी सुरू व्हायचे, कॅसेट प्लेअरवर प्ले केल्यासारख. वय वर्षे २. अशा आठवणी माझी आई सांगते. पुस्तकांशी नात तेव्हापासूनच जुळल. वर्षभर शाळेची लायब्ररी असायचीच शिवाय उन्हाळ्याच्या सुट्टीत विशेष खरेदी पुस्तकांची. पुणे मराठी ग्रंथालयात जाऊन तिथे बालविभागात जे मिळेल ते पुस्तक वाचायचे. फ़ास्टर फ़ेणे, गोट्या ही दोस्त मंडळी त्या वयातली.

  एक गोष्ट वाचायची, त्या विश्वात हरवून जायच. एवढाच उद्देश त्या वेळच्या वाचनात होता. पण कळत नकळत कुठेतरी बीज रुजत असत त्याची पालवी खूप नंतर कुठेतरी उगवते. आजही कविता लिहिताना एखाद्या वेळी वाटत हे कुठून आल. तर त्याची नाळ अशी कुठेतरी कुठल्यातरी पुस्तकात दडलेली सापडेल. वाचन म्हणजे पुरासारखं असतं. पूर आला की काठोकाठ पाणी मग काही काळ सरतो आणि पूर ओसरतो. वाटतं ओसरलं सगळं, पण मग सापडतो साचलेला गाळ कुठेतरी, पुराची आठवण करून देणारा. ओसरूनदेखील थोडा मागे उरणारा. प्रत्येक जाणीव, प्रत्येक अनुभव, प्रत्येकाने आपला आपण घेण शक्य नाही. ते विविध अनुभव जगण्याची संधी ही पुस्तक आपल्याला देतात. चित्रपट बघण्यापेक्षा पुस्तक वाचून आपलं चित्र तयार करण हे मला जास्त आनंददायी वाटत. त्यामुळेच अनेकदा अस होत की प्रचंड आवडलेल्या पुस्तकावरचा सिनेमा मात्र तितकासा आवडत नाही. ट्वायलाईट ह्या खूप गाजलेल्या कादंबरीबाबतही माझं असच झाल. आपल्या डोक्यात आपण उभ केलेल त्या पात्राच व्यक्तिमत्व चित्रपटात नाही सापडल की सगळी गंमतच जाते.

  वाचन ही एक प्रक्रिया असते. आधी एक वाचन त्यात काहीतरी भिडतं आपल्याला अस्तित्वाशी मिळतं जुळतं. मग पुस्तक वाचून झालं तरी आवर्तनं उठत राहतात मनात. प्रत्येक लाट एक वेगळा भोवरा घेऊन येते मग त्याच्या प्रवाहात वाहणं, भरकटणं, दिशाहीन होणं आणि पुन्हा किनारा सापडणं हे सगळं आलं. पुढच्या वेळी तेच पुस्तक वाचताना पुन्हा तसंच वाटेल असं काही नसतं. कारण पहिल्यावेळची मी आणि आत्ताची मी हा प्रवास सुद्धा अनेक संदर्भ बदलणारा असतो. नंतर असं वाटतं अरे हे असं ह्या दृष्टीकोनातून त्यावेळी वाटल नव्हतं. अनेक अनुभवांच्या काना मात्रा लागून संदर्भांचे अर्थ बदलू लागतात.

  व.पुं. ची ठिकरी, तू भ्रमत आहासी वाया ही पुस्तकं म्हणजे तर प्रत्येक वाचन म्हणजे अनेक नवी आवर्तनं नव्या जाणीवा. संपूर्ण आयुष्य ढवळून टाकण्याची ताकद त्या काही पानांत असते.

  आता काय वाचावं हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. अनेकदा असं होतं कोणीतरी सांगतं "अगं हे पुस्तक वाचून बघ. खूप छान आहे." अगदी उत्सुकतेने आपण ते वाचायला जावं तर काहीच हाती लागत नाही. असं का होतं तर प्रत्येकाची जगण्याविषयी, आयुष्याविषयी काही मतं, धोरणं कधी कधी टोकाच्या भूमिका असतात. पुस्तकातल्या भावनेशी, मताशी आपलं जमेलच अस नाही. कधी आपल्याला आलेले अनुभव, सुख, दु:ख आपण त्यात शोधतो . किंवा त्या अनुभवांवरून काही अन्वयार्थ लावतो. मग ते गणित कधी जमत कधी फ़सतं.

  मला मात्र सगळे प्रकार वाचायला आवडतात. मला आठवतय पहिली-दुसरीत असताना मी सगळ्या दुकानांच्या पाट्या वाचायचे, पुडी बांधून आलेला कागद सुद्धा वाचला आहे, कालनिर्णयच्या मागचं पान, पेपर मधल्या पानात टाकलेल्या जाहिराती, दवाखान्यात वाट बघताना आसपास पडलेली मासिकं. कधी कधी असं व्हायच अरेरे लवकर नंबर लागला... अजून थोडा वेळ हवा होता, एवढा लेख वाचून झाला असता.

  आधी मी म्हंटलं तसं आपल्या अस्तित्वाशी मिळतंजुळतं वाचायला माणसाला आवडतं. पण कधी कधी असंही होतं आपल्या अस्तित्वाच्या परस्परविरोधी जाणून घ्यायला आवडतं. कधीतरी बंडखोरी करावी अशी सुप्त इच्छा मनात असते पण जमलेलं नसतं. मग मेघना पेठे, गौरी देशपांडे, शोभा डे खुणावतात. मग पुन्हा नवी सफ़र, नवी नायिका, नवं जग, नवी मतं. शांता शेळके वाचताना आपोआप मन होतं हळवं, नाजूक. पु.लं. बरोबर हसून घेतो. व.पुं. च्या कॉमन मॅनबरोबर रडूनही घेतो.

  मराठी वातावरणात, मराठी शाळेत वाढल्यामुळे इंग्रजी वाचन जुजबीच होतं. पण परदेशात काही वर्ष होते तेव्हा मराठी नव्हतं, वाचनाची उर्मी तर होतीच. प्रचंड मोठी लायब्ररी होती. मग डॅन ब्राऊन, मायकेल किश्टन, सिडनी शेल्डन ह्यांच्या पुस्तकांशी दोस्ती झाली. अल्केमिस्ट वाचलं आणि काहीतरी नवं सापडलं. एक गूढ प्रवास, आपणच आपल्याला शोधण्याचा. जुनेच प्रश्न पुन्हा नव्याने मांडायचे, उत्तर सापडलं असं वाटताना पुन्हा हरवायचे.

  वाचन म्हणजे रोजच्या नेहमीच्या जगण्यातला विरंगुळा एवढी संकुचित व्याख्या कधीच नव्हती. उलट विचारांमधे एक आख्खं वेगळं जग म्हणजे पुस्तक असं होतं. तहानभूक हरवून , सगळं काही विसरून ठोकळेच्या ठोकळे फ़स्त केले आहेत. कधी कधी इतकी उत्सुकता असते पण रोजच्या कामांसाठी पुस्तक खाली ठेवावच लागतं आणि मग दिवसभर डोक्यात किडा... पुढे काय झालं असेल. घरात शिरल्याबरोबर पुढचं पान.....

  इतकं वाचलं तरी असं वाटतं अजून कितीतरी आहे वाचण्यासाठी. रोज एक पुस्तक अशा दराने वाचायचं म्हंटल तरी सगळी पुस्तकं वाचण्यासाठी कित्येक जन्म कमी पडतील. मग विचार कसला करताय..उचला एक ठोकळा आणि पाडा फ़डशा. सांगेल ती गोष्ट नव्याने..एक होता राजा, त्याला होत्या दोन राण्या. एक होती आवडती , दुसरी होती नावडती.......औट घटकेचा राजा आणि त्याचं औट घटकेचं राज्य. पण काही काळ का होईना मी राजा होऊन जगून घेते, त्याचं युद्ध लढते, त्याचं द्वंद्व जगते. मग जीवन जगताना जगणं जास्त समृद्ध होत जातं. कुणी चुकीचं वागलं दुखावलं तरी वाटतं... नाही असेल त्याचीही काही बाजू, त्याचंही काहीतरी म्हणणं, कळेल कधीतरी आयुष्याच्या पुढच्या पानात, तेव्हा उलगडतील सारे संदर्भ तो त्यावेळी असा का वागला त्याचे. थांबेन मी त्याच्या मनोगताचं पान येईपर्यंत. नाहीतरी अजून बरीच पानं कोरी आहेत कुणीतरी काहीतरी लिहिण्याची वाट बघणारी.......

  - दीपा कुलकर्णी-मिट्टीमनी

Trending