आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायेची ऊब

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपण स्वेटर, कानटोपी, मफलर, शाल, हातमोजे असा सारा जामानिमा वापरण्यासाठी बाहेर काढतो. अर्थात ज्या ज्या भागात जितकी कडाक्याची थंडी असेल त्यानुसार गरम कपड्यांचा वापर कमी वा जास्त केला जातो. पुण्याहून अहमदनगरला रात्री बसने जात असताना एके ठिकाणी आमची गाडी जेवणासाठी हॉटेलसमोर थांबली. सर्व प्रवासी थंडीमुळे पटापट हॉटेलमध्ये शिरले. मी माझा डबा बरोबर आणला असल्याने बसमध्ये बसूनच तो खाल्ला. त्यानंतर बसमधून पाय मोकळे करण्यासाठी उतरलो. त्या हॉटेलला लागून असलेल्या एका कोपºयामध्ये मला एक मुलगा हातपाय पोटाशी घेऊन बसलेला दिसला. त्याच्या अंगावर थंडीपासून बचाव करण्यासाठी फारसे कपडे नव्हते. बिचारा कुडकुडत होता. थंडीपासून बचावण्यासाठी त्याने शेकोटी पेटवली होती. मात्र फारसा लाकूडफाटा नसल्याने ती शेकोटीही विझत चालली होती. तो मुलगा गरीब घरचा होता हे त्याच्या कपड्यांवरूनही जाणवत होते. मी त्याची स्थिती बघून कळवळलो. त्याला माझ्याकडची शाल अगदी सहजतेने दिली. त्यामध्ये आपण कोणाला दान वगैरे करतो आहे असा भाव माझ्या मनात अजिबात नव्हता. ती शाल घेताना त्या मुलाने माझे मनापासून आभार मानले आणि माझ्याकडून माझा पत्ता लिहून घेतला. ही घटना मी विसरूनही गेलो. त्यानंतर माझ्या घरी काही दिवसांनी एक पार्सल आले. त्यात ही शाल व एक पत्र होते. त्या मुलाने ते पार्सल पाठवले होते. पत्रात माझे आभार मानणारा मजकूर होता. त्यातील एक वाक्य माझ्या मनात ठसले ते म्हणजे ‘ तुमची शाल परत करतोय, पण त्या शालीतील तुमच्या मायेची ऊब माझ्यासोबत कायम राहील.’
features@mh.bhaskarnet.com