आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात पुढील ३ महिने कृत्रिम पावसाचा प्रयोग; दोन विमाने सोलापूर विमानतळावर सज्ज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- दुष्काळी स्थिती दूर करण्यासाठी केंद्र शासनाच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडून सोलापूर जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी बीचक्रॉफ्ट किंगएअर बी २०० व सी ९० ए ही दोन विमाने सोलापूर विमानतळावर तैनात केली आहेत. दोन्ही विमानांना पुढील तीन महिने सायंकाळी ७ ते सकाळी ७ या वेळेत सशस्त्र सुरक्षा तसेच प्रयोगास सहकार्य करण्याची विनंती पुणे येथील हवामान संस्थेच्या प्रकल्प संचालिका थारा प्रभाकरन यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सोमवारी पुणे येथील हवामान खात्याचे अधिकारी व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र बैठक होणार असून, यानंतरच कृत्रिम पाऊस पाडण्याबाबतचे पुढील नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

 

सोलापूर जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत नुसतीच चर्चा सुरू आहे. प्रत्यक्षात तो प्रयोग झालाच नाही. मात्र यंदा दिल्ली येथील पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या वतीने कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. यासाठी पुणे येथील भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील ८० कि.मी. परिसरात नोव्हेंबरपर्यंत हा प्रयोग करण्यात येणार आहे. यासाठी दोन विमाने सोलापूर विमानतळावर सज्ज झाली आहेत. या विमानांना जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारीच पोलिस आयुक्तालयास सुरक्षा देण्याबाबत कळवले आहे. 
जिल्ह्यात पुढील ३ महिने कृत्रिम पावसाचा प्रयोग 


सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक... 
सोमवारपासून कृत्रिम पाऊस पाडण्याचे नियोजन आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडेही माहिती उपलब्ध नाही. सोमवारी हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत व त्याचे मार्गदर्शन करण्यासाठी हवामान विभागाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे पथक अाल्याचे कळते. 


जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी दोन विमाने दाखल झाली आहेत. दोन्ही विमानांसाठी रात्रीच्या वेळी आमच्याकडे सशस्त्र सुरक्षेची मागणी केली आहे. त्यानुसार पोलिस आयुक्तांना पत्र दिले आहे. कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक होणार आहे. त्यानंतरच त्यांचे नियोजन आम्हाला कळेल.
- संजय तेली, निवासी उपजिल्हाधिकारी. 

बातम्या आणखी आहेत...