आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृष्टिहीनाची फसवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझे वडील आमच्या शेतीच्या केसकरिता निफाड कोर्टात जाण्यासाठी निघाले. ते पहाटे 5.30 वाजता रेल्वेने जाण्यासाठी स्टेशनवर पोहोचले. कारण त्या गाडीनंतर दुसरी कुठलीही जलद गाडी निफाडला थांबत नव्हती. बाबा स्टेशनवरील एका बाकावर बसले. शेजारच्या बाकावर पांढ-या काठीसोबत असलेली एक अंध व्यक्ती बसलेली होती. बाबांनी त्या व्यक्तीच्या चेह-याकडे पाहिले असता चष्म्याच्या बाजूंनी अश्रुधारा लागल्या होत्या. ती व्यक्ती मधूनच हुंदके द्यायची. बाबांनी उत्सुकतेने विचारले, ‘भाऊ, तू का रडत आहेस?’ हा प्रश्न कानावर पडताच ती व्यक्ती थोडी चपापली. माझ्या बाबांनी तिला पुन्हा सहानुभूतीने काही प्रश्न विचारल्यावर तिने सांगितले, ‘दादा, मी मनमाडला राहतो. मी केनच्या खुर्च्या दुरुस्त करतो. मला सेंट फिलोमिना शाळेच्या खुर्च्या दुरुस्त करण्याचे काम मिळालेले होते. मी आठ दिवसांत ते काम पूर्ण केल्याने काल सायंकाळीच शाळेने मला 500 रुपये दिले होते. आठ दिवसांपासून मी घरी गेलेलो नाही. पैसे मिळाल्यावर मी ते खिशात ठेवले आणि घरी जाण्यासाठी रेल्वेस्टेशनवर काल सायंकाळी येत असताना मला कोणीतरी धक्का दिला आणि माझा खिसा कापला. माझे सर्व पैसे चोरीला गेले. साहेब, आता मी कोणत्या तोंडाने घरी जाऊ?’ हे सर्व ऐकल्यावर माझ्या बाबांचे डोळे भरून आले. त्यांनी त्या व्यक्तीला खिशातील सर्व पैसे दिले आणि तारखेला न जाता घरी आले. त्यांनी घरी आल्यावर आम्हाला जेव्हा हा प्रसंग सांगितला तेव्हा माणुसकीहीन वृत्तीचे दर्शन घडवणा-या त्या प्रसंगाने आमचे डोळेदेखील पाणावले. सध्याच्या काळात माणूस पशूसारखा कधी वागेल काही खात्री देता येईनाशी झाली आहे. लोकांच्या संवेदनाच बोथट झाल्या आहेत. ज्येष्ठ, अपंग, दृष्टिहीनांनाही चोरटे सोडत नाहीत, हे पाहून मनाला वेदना होतात. त्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेण्याची वृत्ती संतापजनक आहे. पण अशा लोकांच्या मदतीला माझ्या बाबासारख्या सज्जन व्यक्ती धावून जातातच ना!