आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयकर आढाव्याची नऊमाही परीक्षा महत्त्वाची

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अरुण कुकडे

आर्थिक वर्ष अखेरच्या तिमाहीत आले आहे. या वर्षातील आयकर भरण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२० असेल. ही प्रक्रिया वेळेत आणि व्यवस्थित पूर्ण होण्यासाठी वर्षभरात भरलेला आणि येत्या तीन महिन्यांत भरावयाचा उर्वरित आयकर यांचा आढावा घेणे महत्वाचे ठरते. पुढच्या काळातील आर्थिक, मानसिक ताण टाळायचे असतील अशा आढाव्याची नऊमाही परीक्षा जानेवारीत दिलेली बरी!


आर्थिक वर्षअखेरीस  भरावयाच्या आयकराबाबत आढावा घेताना आपल्याकडे गेल्या नऊ महिन्यांची आकडेवारी उपलब्ध असते. या काळात पगारासह अन्य कांही उत्पन्न प्राप्त झाले असेल, तर ते मिळवून एकूण उत्पन्न काढावे. यामध्ये येत्या तिमाहीत मिळणारे अंदाजे उत्पन्न मिळवावे. असे एकूण वार्षिक उत्पन्न झाले की आपण या वर्षी आजवर ‘80सी’खाली कर कपातीस पात्र अशी बचत किती केली ते काढावे. यामध्ये प्रॉव्हिडंट फंड, विमा हप्ते, गृहकर्जाचे हप्ते व त्यावरील कर्जव्याज, म्युच्युअल फंड, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्किममध्ये गुंतवणूक केली असेल, तर तिची रक्कम, पीपीएफमध्ये केलेली गुंतवणूक यांचा समावेश होतो. येत्या तीन महिन्यांत या माध्यमांतून होणारी गुंतवणूक मिळवावी. ही रक्कम (जास्तीत जास्त दीड लाख रुपये) एकूण वार्षिक उत्पन्नातून वजा केल्यावर आपले या आर्थिक वर्षातील निव्वळ करपात्र वार्षिक उत्पन्न मिळते. 

अशा या एकूण करपात्र वार्षिक उत्पन्नातून आपल्या करमुक्त स्तराची (स्लॅब) रक्कम उणे केली, की निव्वळ करपात्र उत्पन्न मिळते. यावर्षी व्यक्तिगत उत्पन्नावर अडीच लाखापर्यंत कर नाही. ज्येष्ठ नागरिकांना तीन लाखापर्यंत, तर ८० वर्षांवरील अतिजेष्ठ नागरिकांना एकूण करपात्र उत्पन्नावर कर नाही. करपात्र रकमेवर लागू असलेल्या स्लॅबप्रमाणे एकूण देय आयकर किती, ते काढून त्यामध्ये लागू अभिप्राय रक्कम मिळवून एकूण देय कर काढावा. या एकूण कराच्या रकमेतून आजवर भरलेला आयकर वजा केल्यास ३१ मार्चपर्यंत भरावयाची रक्कम किती येते, हे समजू शकेल.

या तिमाहीत भरावयाची ही देय कर रक्कम आपण तीन महिन्यांत व्यवस्थित विभागून भरू शकतो. यातून दोन लाभ होतात. एक म्हणजे, मार्चच्या शेवटी एकदम मोठी रक्कम भरावी लागत नाही. दुसरा म्हणजे, उर्वरित कर कपात पात्र रकमांची एकूण बचत मार्चच्या शेवटी करण्याऐवजी व्यवस्थित नियोजन करून, विशिष्ट, योग्य बचत योजनेत करता येते. असा आढावा आपल्या स्वत:ला घेता येतो. तरीही अडचण आल्यास तज्ज्ञाचा सल्ला घेणे उपयुक्त ठरते. आजच्या परिस्थितीत आपल्या एकूण वार्षिक उत्पन्नाचा अंदाज घेणे, करसवलतींचा विचार करून, एकूण करावयाच्या बचतीचे नीट नियोजन करणे आवश्यक झाले आहे. हे केले नाही तर मग मार्चअखेर घाई होते आणि तशात बचतीचे नीट नियोजन न झाल्यास मग, एक तर जास्त कर भरणा करावा लागतो. त्यासाठी मार्च महिन्यात देय कर भरण्यासाठी प्रसंगी उधार-उसने करावे लागते. शिवाय, करदेयता खाली आणण्यासाठी करसवलती पात्र योजनेत घाईने व मोठी रक्कम भरावी लागते, त्यासाठी प्रसंगी कर्ज काढावे लागते. शिवाय, घाईत केलेल्या गुंतवणुकी आवश्यक व लाभदायी योजनेत न झाल्यास भविष्यात आर्थिक व मानसिक त्रास ओढावू शकतो . 

आपण नोकरीत असल्यास पगाराची एकूण रक्कम मालकाला / संस्थेला माहीत असते. पण, आपले अन्य उत्पन्न आणि एकूण किती व कशी बचत करतो, हे ज्ञात नसते. ही माहिती आपणच द्यावयाची असते. ती योग्य वेळी व अचूक दिली, तर व्यवस्थित व वेळेत करकपात केली जाते. पण, आपण चूक केली तर उत्पन्न व बचत यांची अपुरी माहिती एकत्र संकलित होऊन करभरणा जास्त-कमी होऊ शकते. त्यातून मग दंडाचा भुर्दंड बसतो किंवा करसवलती पात्र बचत कमी दाखवली गेल्याने जास्त करकपात होते. त्यामुळे वेळीच , आवश्यक तेवढा  करभरणा करण्यासाठी योग्य करकपात होण्याची गरज असते. त्यासाठी अापण स्वत:च एकूण उत्पन्न, एकूण बचत, एकूण कर देयता व उपलब्ध सर्व करकपात सवलतींचा लाभ यांचा आढावा घेणे फायदेशीर ठरते.

लेखकाचा संपर्क : 9225147079
 

बातम्या आणखी आहेत...