Home | Magazine | Rasik | Arun Kumar tripathi write article about political drama

राजकीय नाट्यमंचावरचा भ्रामक थरार

अरुणकुमार त्रिपाठी | Update - Aug 05, 2018, 12:30 AM IST

पंतप्रधान मोदींचे राजकारण स्वप्नातले स्वप्न भासावे, अशा पद्धतीने आकारास येत आहे.

 • Arun Kumar tripathi write article about political drama

  पंतप्रधान मोदींचे राजकारण स्वप्नातले स्वप्न भासावे, अशा पद्धतीने आकारास येत आहे. आक्रस्ताळ्या अशी प्रतिमा बनलेल्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादवीचा इशारा देत थेट केंद्राविरोधात रस्त्यावर उतरताना दिसत आहेत, तर आक्रमक, अनाचारी अशी ज्यांची विरोधक ओळख करून देतात ते दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल एकाच वेळी पंतप्रधानांना आव्हानही देताहेत आणि नोकरशाहीलासुद्धा शिंगावर घेत आहेत. शोमनशिप हे यातल्या प्रत्येकाच्या राजकारणाचे व्यवच्छेदक लक्षण असले तरीही प्रत्येकाची राजकारण शैली भिन्न आहे. या घमासानातून भारतीय राजकारणाच्या हाती नेमके काय लागत आहे? येत्या काळातली राजकारणाची दिशा काय असणार आहे?


  राजकारण हा जितका शक्यतांचा खेळ आहे, तितकाच शोमनशिपचाही मामला आहे. विशेषत: प्रतिमा-प्रतrकांच्या योजनाबद्ध वापराच्या आजच्या काळात कृतीमध्ये भव्यदिव्यता साधणे हेच बहुतेक सर्व राजकीय पक्षांचे ध्येय असल्यासारखे झाले आहे. हीच भव्यदिव्यता ममता बॅनर्जींनी आसाममध्ये झालेल्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी यादीला जोरदार विरोध करून साधली आहे. तुम्ही जर दोन धर्मांत फूट पाडण्यासाठी ही यादी तयार करत असाल तर या देशात यादवी माजेल असा राणाभीमदेवी थाटात इशारा त्यांनी केंद्रातल्या मोदी सरकारला दिला आहे. पदर खोचून थेट रस्त्यावर उतरणाऱ्या ममतांचा हा अवतार त्यांच्या मतदारांना चांगलाच सुखावून गेला आहे. ममता बॅनर्जींनी आपले अस्तित्व ठसवण्याआधी काही दिवस दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची एक व्हिडिओ क्लिप नायक-२ नावाने सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यात केजरीवाल दिल्लीच्या एका वस्तीत जाऊन कामचुकार बिल्डर-काँट्रॅक्टरच्या माणसाला अत्यंत कडक भाषेत फैलावर घेताना दिसले. एक मुख्यमंत्री नागरिकांच्या तक्रारीवरून थेट वस्तीत येतो. तिथूनच सरळ सगळ्यांसमक्ष बाहुबली बिल्डरला दम देतो. त्याच्या माणसाची मग्रुरी उतरवतो. आजवर जे फक्त सिनेमात दिसत होते, ते प्रत्यक्षात घडते आहे पाहून अनेक जण सुखावून गेले. एरवी, पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभांतून बेनामी संपत्ती असलेल्यांना दमात घेतात, विरोधी पक्षांतल्या विशेषत: काँग्रेसमधल्या नेत्यांना जाहीर आव्हान देतात तेव्हाही हाच परिणाम साधला जातो. पण मोदींचे राजकारण सिंहासनावरचे असते. जनतेशी असलेला त्यांचा संपर्क नैमित्तिक असतो. आणि तो कधी व्हावा याचेही त्यांचे म्हणून एक गणित असते.

  ही एक प्रकारची राजकीय नेत्यांनी साधलेली शोमनशिपच म्हणता येईल. यात मोदी-केजरीवाल-ममता हे नेते आपापल्या प्रतिमेला साजेसा पवित्रा घेतात. कधी कल्पनेपलीकडची पावले उचलतात. या सगळ्यामुळे भारतीय राजकारणात संघर्षाच्या ठिणग्या उडत राहतात. या संघर्षाचं मूळ अर्थातच नेत्यांच्या पार्श्वभूमीत, राजकीय कार्यशैलीत दडलेले असते. जंतरमंतरच्या मैदानातला भ्रष्टाचार विरोधाचा तुलनेने सुरक्षित संघर्ष केलेले अरविंद केजरीवाल हे मोदी-ममतांच्या तुलनेत नवखे राजकारणी अाहेत. सामाजिक प्रश्न सोडवण्यातून आकारास आलेली त्यांची शैली पारंपरिक राजकारणाला सुरुंग लावणारी आहे. नवलोकशाहीवादी नेता अशी त्यांना त्यांची प्रतिमा आकारास आणायची आहे, हे गेल्या अनेक वर्षांच्या त्यांच्या वावरातून स्पष्ट झाले आहे. जनतेच्या मनातली खदखद ओळखून भर रात्री दिल्लीच्या रस्त्यांवर उपोषणाला बसणे, नायब राज्यपालांच्या कार्यालयात कुणालाही न जुमानता, कुणाचीही फिकीर न करता ठिय्या देणे ही सामान्यांच्या स्वप्नातली कृती प्रत्यक्षात करण्यावर त्यांचा भर राहिला आहे. नोटबंदीच्या काळात ‘नोट नही, पीएम बदलो', २०१५ मध्ये कार्यालयावर सीबीआयने धाड टाकली तेव्हा "मोदी कायर है, मनोरोगी है' अशी जहाल वक्तव्ये करून इन्कलाबी नेता ही त्यांनी आपली ओळख जाणीवपूर्वक जनतेच्या मनावर ठसवली आहे. व्यवस्थांचे केंद्रीकरण हेच भ्रष्टाचार आणि अपारदर्शकतेचे खरे मूळ असल्याची त्यांची भावना आहे. त्यामुळे त्यांचा सारा भर "आऊट ऑफ सिस्टिम' जाऊन काम करण्यावर राहिला आहे. दिल्लीतले मोहल्ला क्लिनिक, घरोघरी होणारे धान्यवाटप हे त्यांचे विकेंद्री उपक्रम त्यातून आलेले आहेत.


  व्यवस्था परिवर्तनाची त्यांची इर्षा मोदी-ममता वा इतरही नेत्यांच्या तुलनेत खूप ठळक आहे. त्यांना कुशल प्रशासक अशीसुद्धा स्वत:ची प्रतिमा निर्माण करायची आहे. त्यासाठी प्रसंगी पडते घेण्यासही ते तयार असल्याचे काही प्रसंगांत दिसले आहे. अर्थात राजकारण आणि अर्थव्यवस्थेबाबतचे त्यांचे विचार फारसे सुस्पष्ट नाहीत. "स्वराज' ही त्यांची विचारसरणी मांडणारी पुस्तिका आहे, असे अनेक जण म्हणत असले तरीही, त्या पुस्तिकेवर ब्रह्मदेव शर्मा, मेधा पाटकर आणि अर्थातच महात्मा गांधींच्याच विचारांचा प्रभाव अधिक आहे. राजकारणी केजरीवालांचे स्वतंत्र अस्तित्व काही त्यातून पुढे आलेले नाही. दूरदृष्टी असलेला क्रांतिकारी नेता अशी काही त्यांची प्रतिमा मीडियात उजळलेली नाही. मीडिया अलीकडच्या काळात केजरीवालांना तसेही फारसे झुकते माप देत नाही. किंबहुना, प्रतिमा पूजन अस भयो जब गुडिया खेल, असली स्वामी मिल गयो तब दियो पिटरिया में ठेल...अशीच मीडियाने त्यांना वागणूक दिली आहे. अशी वागणूक मिळण्यात त्यांच्या एककल्ली स्वभावाचा वाटा मोठा आहे. याचमुळे "आप'मधला बुद्धिजीवी वर्ग दूर निघून गेलाय आणि वैचारिक उंची आणि खोली नसलेल्या लोकांनी त्यांच्याभोवती कोंडाळे केले आहे.


  केजरीवालांसारख्याच, पण परंपरेच्या अंगाने जाणाऱ्या संघर्षमय राजकारणातून ममता बॅनर्जींनी आपले स्थान पक्के केले. कधी त्यांनी माओवाद्यांना सोबत घेतले कधी दूर लोटले. त्या मूळच्या काँग्रेसी संस्कृतीत वाढलेल्या पण सिंगूर आणि नंदीग्राम आंदोलनात उडी घेऊन त्यांनी ‘निओ लेफ्ट' मार्गी राजकारण निवडले. या वाटेवर चालताना अनेक डावे जसे त्यांच्या सोबत आले, तसेच लुंपेन म्हणता येईल असाही एक वर्ग त्यांना चिकटला. त्यांच्या राजकारणाला रॅडिकल वळणही मिळाले आणि अनेकदा त्या गृहपाठाविना विरोधकांशी दोन हात करताना दिसल्या. पण तशातही पायात स्लिपर, अंगात सुती साडी आणि मुखी माँ, माटी, मानूसचा नारा, अशा अवतारातल्या ममतादीदींनी अधिकाधिक बलवान होऊ लागलेल्या भाजपला राज्यात रोखण्याचा प्रयत्न केलाच, पण हिंदी भाषेवर प्रभुत्व नसतानासुद्धा राष्ट्रीय राजकारणात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. त्यांचा इरादा व्यवस्था परिवर्तनाचा अजिबात नाहीये, तर व्यवस्थेला सोबत ठेवून स्वत:चं स्थान निर्माण करण्याचा आहे. ममता बॅनर्जींप्रमाणेच नरेंद्र मोदी हेदेखील पारंपरिक राजकारणाचे फलित आहेत. त्यांचादेखील व्यवस्था परिवर्तन हा मुळीच अजेंडा नाही. उलट प्रस्थापित व्यवस्थेला ताब्यात ठेवून विरोधी पक्षांवर कुरघोडी करत राहण्याची त्यांची शैली राहिली आहे. कॉर्पोरेट आणि हिंदुत्व यांचा मेळ घालत त्यांनी आजवरचे राजकारण केले आहे.


  मोदींच्या खांद्यावर अंबानी-अदानींचे हात आहेत की अदानी-अंबानींच्या खांद्यावर मोदींचा हात आहे, हे कुणाला निश्चितपणे अद्याप ठरवता आलेले नाही. अशा या संभ्रमावस्थेत मोदी मात्र कॉर्पोरेट आणि हिंदुत्व अशा दोन्हीचे दोर हाती असलेले गाडीवान आहेत, म्हणूनही इतरांच्या तुलनेत त्यांचे राजकारण आजवर यशस्वी ठरत आले आहे. परंतु, भारतीय राजकारणात एका मर्यादेपलीकडे धर्माचा प्रभाव चालत नाही हा इतिहास आहे. कॉर्पोरेट आणि हिंदुत्व हे सिडेटिव्ह अर्थात गुंगी आणणारे घटक आहेत. धार्मिक उन्माद विरुद्ध जातीचे राजकारण अशी सध्या मांडणी होत आहे. ८० टक्के हिंदू समाजातच फूट पाडण्याचे नियोजनबद्ध प्रयत्न होत आहेत. भारतीयांना हे सारे फार काळ मानवेल वा ते हे सहन करतील असे घडणार नाही. भारतीय समाज आणि भारतीय न्यायव्यवस्था या विरोधात बोलू लागली आहे.


  हिंसक झुंडींविरोधात कायदा करावा, हे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश हे त्याचेच ताजे उदाहरण आहे. त्यामुळे मोदींची प्रतिमा कितीही लार्जर दॅन लाइफ असली तरीही आज आपण ज्याला इंडियन इथॉस किंवा मूल्याधारित भारतीय मानस असे म्हणतो ते धर्माच्या राजकारणाला विरोध करू लागले आहे. आम्ही तुम्हाला विकासाच्या अजेंड्यासाठी निवडून दिले आहे, हिंदुत्वाच्या स्थापनेसाठी नाही, हा यातला संदेश आहे. वर्तमान राजकारणात मोदी-ममता आणि केजरीवाल ही जरी तीन स्वतंत्रपणे आक्रमक राजकारणाची प्रतीके बनली असली तरीही मोदी विरुद्ध इतर त्यात ममता आणि केजरीवाल एका बाजूला अशी सरळसरळ यांच्यामध्ये विभागणी झालेली आहे. ममता आणि केजरीवालांची राष्ट्रीय राजकारणाची महत्त्वाकांक्षा उघड आहे. आज जसे राहुल गांधींनी पंतप्रधानपदाचा आग्रह सोडून विरोधी पक्षांमध्ये संवाद-सहमतीचा अवकाश निर्माण केला आहे, तशी स्थिती केजरीवालांच्या बाबतीत नाही. मोदींच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवूनही मोदींचा पर्याय ठरण्याच्या स्पर्धेत ते मागे पडलेत. एक तर त्यांच्या सत्तेला अनंत मर्यादा आहेत, त्यांचे कार्यक्षेत्र खूप आक्रसलेले आहे. अशात ते एकटेच डफली वाजवत राहिले तर त्यांच्या राजकारणाला मर्यादा येणार हे स्पष्ट आहे. अशा प्रसंगी व्यवस्था परिवर्तन घडवून आणण्यासाठी २०११ सारखे नवे आंदोलन उभारणे हे त्यांच्यासाठी अपरिहार्य ठरणार आहे. अनेकदा राजकारण करतानाची अपरिहार्यताच शोमनशिपला जन्म देणारी ठरते आहे. त्यातूनच मोदी-ममता आणि केजरीवालांसारखे नेते जनमानसाचा ताबा घेत गेले आहेत. म्हणूनच या पुढच्या काळात नेत्यांच्या शोमनशिपला अधिक धार येण्याचीही शक्यता आहे. मात्र, ही अवस्था राजकारण पुढे जात असल्याचा केवळ भ्रम निर्माण करणारी आहे. समाजातला परजाती-परधर्माविषयीचा विद्वेष, समूहांची वाढती कट्टरता आणि आर्थिक दैन्यावस्था दूर न करता भ्रामक थरार तेवढा यातून निर्माण होतो आहे आणि केवळ विकासावर भारतात राजकारण करता येत नाही, ही भाजपच्या शीर्षस्थ नेत्याची प्रतिक्रिया राजकारणाची पुढील दिशा स्पष्ट करण्यास पुरेशी आहे.
  (लेखक गाझियाबादस्थित ज्येष्ठ लेखक आणि अध्यापक आहेत.)

  - अरुणकुमार त्रिपाठी
  tripathiarunk@gmail.com

 • Arun Kumar tripathi write article about political drama
 • Arun Kumar tripathi write article about political drama

Trending