आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारलेल्या माणसाची गोष्ट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 अरुण सीताराम तीनगोटे

बाप अनेकदा शब्दकोडी भरायचा. एखाद्या शब्दाजवळ अडकून पडायचा. मी बापाला शब्दांच्या अडवणुकीतून सोडवू शकलो नाही. मी बापाला जगण्याच्या लढाईत मदत करू शकलो नाही.


बाप दमूनभागून कामावरून घरी यायचा. एकावर एक दोनतीन उशा रचून पलंगावर विचार करत पडून राहायचा. कधीतरी बिडी पेटवून त्या धुरात जुने दिवस शोधायचा किंवा नव्या दिवसांचा हिशोब लावायचा. बाप बोटांच्या पेरावर काहीतरी मोजत राहायचा. बाप झोपेतही कधीकधी बोलत राहायचा. बाप कधीकधी खळखळून हसायचा. तेव्हा त्याचा एक किंचित टवका उडालेला दात स्पष्ट दिसायचा. सगळ्या वेदना लपवून बाप मनमुराद हसायचा. विझत जाणाऱ्या स्वप्नांच्या उरल्यासुरल्या निखाऱ्यातून बाप उब शोधायचा. थंडीत कुडकुडणाऱ्या दिवसांसाठी बाप आमची शेकोटी व्हायचा.  

बाप नव्यानव्या संकटाना तोंड देत राहायचा. नव्या वादळांशी जुनी छाती घेऊन लढत राहायचा. मसाल्याच्या डब्यातून कधीतरी एखादी गोडांबी चघळताना मी बापाला पाहिले आहे. मुकेशचे एखादे दर्दी गाणे गुणगुणताना मी बापाला पाहिले आहे. भयंकर सर्दी झाली की मी बापाला मारवाड्याच्या दुकानातून कॉफीची वडी आणून देत असे. कधीतरी बिड्या आणि पेटी आणून देत असे. मला बापाला काहीतरी द्यायचे होते. पण आपण बापाला काय देऊ शकतो? आपण कसे काय उतराई होऊ शकतो? मी बापाला काहीच दिले नाही. पण त्याने दिलेले सगळे घेऊ शकलो की नाही, हे देखील नक्की माहीत नाही.  बापाला मी कधी रडताना पाहिल्याचे आठवत नाही. कदाचित आयुष्यभर बाप मनातल्या मनात रडत राहिला असावा. बापाच्या काळजात दु:खाच्या नद्या होत्या. म्हणूनच त्याच्या आतबाहेर ओल होती. बाप कधी कोरडा वाटला नाही. 

बापाकडे सांगण्यासारखी एकच गोष्ट होती. आणि त्या एका गोष्टीत अनेक गोष्टी होत्या. ती गोष्ट फक्त बापाची नव्हती किंवा फक्त लेकाची नव्हती. ती गोष्ट फक्त आजची किंवा कालची नव्हती. बाप सांगत असलेली गोष्ट त्याच्या रक्तातून आमच्या धमन्यात उतरणाऱ्या विचारांची, वंचनांची आणि वेदनांची होती. बापाची गोष्ट ही जगण्याची, संघर्षाची, आणि उमेदीची होती. बापाची गोष्ट ही लढण्याची, झुंजण्याची, तग धरण्याची आणि टिकून राहण्याची होती.  

बाप अनेकदा शब्दकोडी भरायचा. एखाद्या शब्दाजवळ अडकून पडायचा. मी बापाला शब्दांच्या अडवणुकीतून सोडवू शकलो नाही. मी बापाला जगण्याच्या लढाईत मदत करू शकलो नाही. बाप एकाकी योद्धा होता. एकटे पडत जाणे हे बापाचे प्रारब्ध होते? की हा एकटेपणाने लढण्याचा मार्ग त्यानेच निवडलेला होता? जगण्याचे रस्ते तुडवताना पाय धुळीने माखले. पण बापाने मनावर कधीच उदासिनतेची धूळ चढू दिली नाही. सुटीच्या दिवशी गावी गेलो की, संध्याकाळी दमूनभागून घरी आलेल्या बापाची प्रेमळ चौकशी आठवते. आपण कोणत्याही वयात बापाच्या परतून येण्याची वाट पाहत असतो. पण प्रत्येकदा बाप परतून येतोच अस नाही. माणसांना परतून येण्याचे वरदान नाही. पण आठवणींना परतून येण्याचा शाप आहे. 
 
मी पहिल्यांदा त्यांच्यासोबत औरंगाबादला आलो होतो, तेव्हा त्यांनी मला बस स्टँडसमोरच्या इस्लामी हॉटेलमध्ये बिर्याणी आणि खिमा खाऊ घातला होता. मला आठवते, मी माझे पहिले कोल्ड्रिंक त्यांच्यासोबत पिलो होतो. त्यांना डायऱ्या, पेन, वॉलेट, गॉगल आणि वॉच खरेदीची आवड होती. या सगळ्या गोष्टी ते वापरतच असत असेही काही नाही. पण ते नेहमी रूमाल आणि पेन  हरवून येत असत. एक डार्क ब्लू जीन्स आणि ब्लॅक टी शर्ट त्यांनी खरेदी केले होते. पण आयुष्यभर त्यांनी ते कधी वापरले नाही. मी अनेकदा वडिलांसोबत होतो आणि वडील प्रत्येकदा माझ्यासोबत होते. आमची सोबत तुटली तरीही आमची सोबत सुटली नाही. बापाचा स्पर्श आता आठवत नाही. पण अजूनही बापाचा हात सोडवत नाही. एकदा वडील अचानक बस स्टँडला भेटले होते. मी मित्राला सोडवायला गेलो होतो. तेव्हा वडिलांनी मला पन्नास रुपये खर्चायला दिले होते. ती रक्कमही त्यावेळी बरीच मोठी होती. आता मनात विचार येतो, त्यावेळी वडिलांच्या खिशात नेमके किती रुपये असतील? मला माहीत आहे, कदाचित त्यांनी भाड‌यासाठी वीस-तीस रुपये स्वत:कडे ठेवून उरलेले सगळे पैसे मला दिले असतील. तरीही ते कधीही रिक्त झाले नाहीत.

माझा बाप भरलेला आणि भारलेला माणूस होता.

संपर्क : 9764844621