आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काजळभरल्या डोळ्यातलं शुभ्र हसू...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तू भाबडेपणाच्या वेलीवर आलेल समंजस फूल. तू सुगंधासाठी जंगलात भटकणाऱ्या माणसाला लागलेली रानभूल. तू एखाद्या हट्टी लहान मुलीसारखी आहेस. तू हसली की वाटत तुझ्यातलं बाळ अजूनही जिवंत आहे. या भयंकर कोलाहलातही तु‌झ्यातलं निरागसपण तू कस काय जपून ठेवलं आहेस. तू एकाच वेळी कमालीची लहान आणि प्रचंड मोठी आहेस. लेकरातलं निष्पापपणा आणि प्रौढ माणसातला समजूतदारपणा तुझ्यात गुण्यागोविंदाने नांदतो आहे. 


खरं तर तुझ्या डोळ्यात कितीही शोधलं तरी काही सापडत नाही. तुझे डोळे कळत नाहीत, पण म्हणून तुझ्या डोळ्यांना सोडून देता येत नाही. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न मी थांबवत नाही. तुझ्या डोळ्यात पुन्हा पुन्हा उतरत राहतो. पुन्हा पुन्हा माझा जीव गुदमरत राहतो. तुझ्यातून मी जन्माला येतो आणि तुझ्यातच मरून जातो.  
तुझी मूळ तुझ्या मातीत घट्ट आहेत. कोणत्याच परिस्थितीत तू तुझं सत्त्व आणि स्वत्व हरवू दिलं नाही. तू एखाद्या किल्ल्याच्या भिंतीप्रमाणे अभेद्य आहेस किंवा एखाद्या फुलपाखराच्या पंखासारखी तलम आहेस. एकाच वेळी तू कमालीची बोलकी आणि भयंकर मुकी आहेस. पण माझ्या या एकाकी आयुष्यात तुझ हसू सर्वांत आनंदी गोष्ट आहे.


भल्या पहाटे झोपेतून उठल्यावर तुझा साखरझोपेत असलेला शांत चेहरा दिसावा.  तुझ्या न्हाऊन घेतलेल्या केसांचा सुगंध घरभर असावा. दिवसभर तू मनात रुणझुणत राहावी. मला तुझ्या डोळ्यातून दिवस मावळताना पाहायचा आहे. तुझ्या मनात माझ्यासाठी थोडीसी जागा आहे, हे वैभव मला मिरवायचे आहे. मला तुझ्यासोबत जगायचे आणि तुझ्यासोबतच मरायचे आहे.


पुढचा जन्म असेल तर माझी आई हो आणि मला टाकून जाऊ नकोस.

बातम्या आणखी आहेत...