आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तारक्तातील कोसळोत भिंती, मानवाचे अंती एक गोत्र... 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय लोकजीवनात तर धर्म इतका ओतप्रोत भरलेला आहे की राज्यघटनेइतकेच किंवा कायद्याइतकेच धर्मादेश प्रमाण मानून ते प्राणपणाने सांभाळणारे समूह आजही अस्तित्वात आहेत. धर्मवादी राजकारण हा कमालीचा संवेदनशील विषय, आज माणूस केंद्रस्थानी ठेवून आणि सर्व प्रकारचे पूर्वग्रह सर्व पातळ्यांवरच्या हितसंबंधांइतकेच दूर ठेवून हाताळण्याची आत्यंतिक गरज आहे.... संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांच्या भाषणाचा संपादित अंश 

 

प्रिय रसिकहो, 
वाङ्मय परंपरेतील वाडवडिलांचं ऋण फेडण्याची जबाबदारी तुम्ही माझ्यावर दिली. श्री. ना. पेंडसे, नरहर कुरुंदकर, दि. के. बेडेकर, चिं. वि. जोशी, बा. भ. बोरकर, त्र्यं. वि. सरदेशमुख, इरावतीबाई कर्वे, सरोजिनी वैद्य, अरुण कोलटकर, दि. पु. चित्रे, नामदेव ढसाळांसह कितीतरी, जे अनेक कारणांनी या व्यासपीठापासून दूर राहिले, या साहित्यिक-विचारवंतांना तशी इच्छा होती की नाही, हा प्रश्न वेगळा; पण त्यांच्याकडे ते पद सन्मानपूर्वक जावं अशी परिस्थिती आपण निर्माण करू शकलो नाही हे तितकंच खरं. त्यांच्याविषयीची आपल्या मनातली आदरभावना आणि त्यांचा या प्रकारे गौरव करता न आल्याची खंत प्रकट करण्याचा अनुक्त आग्रह तुम्ही मला केला आहे आणि इंदिराबाईंची क्षमा मागण्याची संधी दिली आहे. म्हणून एक प्रकारे, धार्मिक परिभाषेतली संकल्पना पूर्ण निधर्मी अर्थानं वापरून मी असं म्हणते आहे की, वाङ्मय क्षेत्रातल्या ऋणमोचन तीर्थावर मी आज उभी आहे, आणि तुमच्या वतीनं माझी शाब्दिक कृती हा पूर्वऋणांतून मुक्त होण्याचा विधी आहे. 

 

आपण माणूस म्हणूनच काय, पण लेखक म्हणूनही स्वयंभू उगवून आलेले किंवा अवतरलेले नसतो. त्यामुळे परंपरेनं काय काय भलं आणि बुरंही जन्माला घातलं आहे, याचं एक ऐतिहासिक भान वर्तमान जगणाऱ्या आणि भविष्याचा वेध घेऊ पाहणाऱ्या कोणाही लिहित्या-वाचत्या जगातल्या माणसाला असलं पाहिजे. 

 

आपापल्या प्रातिभ धर्मानुसार आधुनिकतेचे, वर्तमान जगण्याचे पेच मांडणाऱ्या मोठ्या ताकदीच्या साहित्यकारांनीसुद्धा पुढे जाताना मागच्याचं काय केलं हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. अमृता शेरगिल, सत्यजित राय, सी. शिवराममूर्ती, कुमार गंधर्व किंवा ऋत्विक घटक यांनी आपापल्या कर्मक्षेत्रात काय केलं, आपापल्या पद्धतीनं तेंडुलकरांनी किंवा महेश एलकुंचवारांनी आपल्या नाट्यपरंपरेचं काय केलं, रोहिणीताईंनी नृत्यपरंपरेचं काय केलं, अगदी नव्या पिढीच्या प्रयोगांची धडपड पाहायची तर आजच्या प्राजक्त देशमुखनं 'देवबाभळी'मध्ये काय केलं, असा एक संस्कृतिसंबद्ध विचार केला, तर परंपरांचं पुनर्वाचन आणि पुनर्नवीकरण करण्याची एक प्रक्रिया चालू आहे, असं आपल्या लक्षात येतं. 

 

हे शतक विसंगतींनी भरलेलं शतक म्हणता येईल. एका बाजूने यंत्रांच्या मदतीने माणूस अखंड कृत्रिम जग उभारण्यात गुंतला आहे; पण दुसऱ्या बाजूने त्याला जिवंत, अकृत्रिम, अनावृत अशा जीवनाची आस आहे. अशा वेळी आत्यंतिक स्वार्थपरायण आणि स्पर्धात्म झालेला व्यक्तिवाद हे साहित्याचा परीघ आक्रसत जाण्याचं एक मुख्य कारण आपल्याला दिसतं. साहित्य व्यवहारात या स्पर्धात्मक आणि स्वार्थकेंद्री व्यक्तिवादाचा प्रभाव टिकून आहे. शिक्षणक्षेत्राचा विचारही या संदर्भापासून अलग राहू शकत नाही. ज्ञानाच्या उपासनापरंपरांची शुद्धता टिकवणं आणि त्यांचं वैविध्य टिकवणं हे महत्कार्य आहे याची जाणीव शिक्षणक्षेत्रातून हद्दपारच झाली आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या पृष्ठस्तरीय वापरामुळे व्यासंग आणि संशोधन हे शब्दही निरुपयोगी वाटत आहेत. मराठी भाषेची, तिच्या प्रतिष्ठेची, तिच्यावरील इंग्रजीच्या आक्रमणाची चिंता आपण सगळे वारंवार व्यक्त करतो. मी त्याविषयीच्या तपशिलात शिरत नाही. मात्र मातृभाषेविषयीची आस्था प्रत्येक माणसाला वाटली पाहिजे आणि रोजच्या व्यवहारात शक्य तितका आपल्या भाषेतून संवाद-संपर्क करणं आणि ज्ञानभाषा म्हणूनही मराठीचा वापर यत्नपूर्वक करणं ही आपली गरज बनली पाहिजे. 

 

दीड-दोनशे वर्षांपूर्वी 'इकॉनॉमिक मॅन'ची संकल्पना मांडली गेली होती. तशी 'कलामानवा'ची संकल्पना आपण कधीच स्वीकारू शकणार नाही. रामदेवराव यादवाला आपल्या ग्रंथाच्या निर्मितीचं श्रेय न विकणाऱ्या महानुभाव कवी नरेंद्राची आठवण त्यांना वेगळी करून देण्याची गरज नाही. 'रुक्मिणीस्वयंवर'कर्ता महानुभाव नरेंद्र कवी राजापुढे आपल्या काव्याचं वाचन करीत असताना एके ठिकाणी त्याच्या काव्यातल्या अर्थपूर्ण अशा सुंदर कल्पनेपाशी त्याला थांबवून राजानं म्हटलं की 'या ग्रंथाचा अभंगु मज देयावा' म्हणजे या ग्रंथाचं कर्तृत्व मला दे. मी तुला त्यासाठी सुवर्णमुद्रांची बक्षिसी देतो. यावर नरेंद्रानं दिलेलं उत्तर फार बोलकं होतं. तो म्हणाला, ''ना राजेहो, येणे कारणे आमुचेया कविकुळ बोलु लागैल.'' मी असं केलं, माझी साहित्यकृती अशी विकली, तर माझ्या कविकुळालाच कलंक लागेल. वाङ्मयीन व्यभिचाराला नकार देणारं नरेंद्राचं हे उत्तर तर त्याच्या अंतर्निष्ठेचं, स्वाभिमानाचं आणि व्यापक साहित्यभानाचं दर्शन घडवणारं आहे. आपल्या साहित्यकृतीच्या पाठीशी आपण उभं राहिलंच पाहिजे. या निमित्तानं हेही आपल्या लक्षात येईल की वाङ्मयाला समाजात नेहमीच एक सत्तानिरपेक्ष सामर्थ्य असतं आणि राजकीय हेतूनं ते सामर्थ्य वापरण्याचे किंवा ते सामर्थ्य खच्ची करण्याचे प्रयत्नही अनेकदा राजकीय सत्तेकडून होत असतात. 

 

मूल्यसंघातासाठी संतांनी चुकवलेली किंमतही दृष्टीआड होता कामा नये. खरं तर प्रत्येक विद्रोही माणसाने अशी किंमत आजवर चुकवलेलीच आहे आणि ती चुकवावीच लागते. ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत तर आहेच, पण त्यापेक्षा कितीतरी अधिक गोष्टी त्यात सामावल्या आहेत, याची जाणीव विवेकी परिवर्तनवाद्यांनीही जागती ठेवण्याची गरज आहे. गतिशीलता आणि परिवर्तन हा जीवनाचा स्थायीभावच आहे. धर्मसत्ता पहिल्या प्रबोधनानंतर कोसळल्या. राजसत्ता, लोकसत्ता यांचे विविध प्रयोग जगभर झाले. आता आर्थिक सत्ता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आणि संहारशक्तीच्या बळावर जगभर येऊ पाहते आहे. 

 

भारतीय लोकजीवनात तर धर्म इतका ओतप्रोत भरलेला आहे की राज्यघटनेइतकेच किंवा कायद्याइतकेच धर्मादेश प्रमाण मानून ते प्राणपणाने सांभाळणारे समूह आजही अस्तित्वात आहेत. धर्मवादी राजकारण हा कमालीचा संवेदनशील विषय, आज माणूस केंद्रस्थानी ठेवून आणि सर्व प्रकारचे पूर्वग्रह सर्व पातळ्यांवरच्या हितसंबंधांइतकेच दूर ठेवून हाताळण्याची आत्यंतिक गरज आहे. जागतिकीकरणात ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत असा आणि त्यातल्या खऱ्या लाभांपासून वंचित असा - असे वर्ग निर्माण होऊन मुळात जातिधर्माच्या अस्मिता टोकदार करून भंगलेलं समाजमन आणखी छिन्न झालेलं आहे. प्रबोधनाच्या या दुसऱ्या पर्वातली आव्हानं पहिल्या पर्वापेक्षा फार वेगळी, गुंतागुंतीची आहेत. मराठी भाषेचा प्रश्न हा केवळ मराठी भाषेपुरता उरलेला नाही. मराठी संस्कृतीशी आणि पर्यायाने मराठी समाजाच्या जागतिकीकरणाविषयीच्या भूमिकेशीच तो जोडलेला आहे. मराठी समाज जागतिकीकरणाकडे आणि त्यात स्वत:च्या भाषा आणि संस्कृतीकडे कसा पाहतो याचा विचार या संदर्भात महत्त्वाचा आहे. 


साहित्यातली मूल्यव्यवस्थाही बदलली आणि साहित्य हा नव्या मूल्यमापनानुसार व्यक्तिगत सृजनशीलतेचा आविष्कार ठरला. लेखकाचा आत्मस्वर व्यक्त होणं हेच सर्जनशील स्वरूपाचं व्यवच्छेदक लक्षण मानलं. केशवसुतांच्या व्यक्तिनिष्ठ कवितेचा, कवी ग्रेस यांच्या आत्यंतिक दुर्बोध कवितेपर्यंत झालेला प्रवास, या संदर्भात उत्तम तपासता येतो आणि बहिणाबाईंची कविता हा या संदर्भाला मिळालेला छेद अपवाद म्हणूनच का राहतो, याचाही उलगडा होतो. मर्ढेकरांनी आपल्या वाङ्मयविचारांतला करुणेचा धागा थेट महाभारतापासून ओढून आणला आहे ही फार मौलिक गोष्ट आहे. शिवाय व्यासांनी व्यक्त केलेली करुणाही दुबळी नाही; उलट अतिशय प्रगल्भ आणि कणखर करुणा आहे, जी जीवनाच्या सर्वभावे स्वीकारातून आपोआप उमलून येते. ही करुणा आपल्याला विद्रोहाशी थांबू देणारी नाही. परिवर्तन हीच जीवनाची मुख्य खूण आहे आणि तिचीच प्रतिबिंबं वाङ्मयात-कलेत दिसत आली आहेत - दिसणार आहेत. 

 

रक्तारक्तातील कोसळोत भिंती, मानवाचे अंती एक गोत्र.. असं म्हणणारे विंदा सरदार जाफरींच्या शेजारी उभे राहून येणाऱ्या 'नव्या जगाला प्रणाम' करताना दिसतील. सरदार जाफरींचेच शब्द मी अखेरीला आपल्या हाती देते - 
आम्ही नेहमीच क्षणांसारखे येत राहिलो आहोत 
आणि पुढेही येत राहू 
काळाच्या अस्वस्थ, विस्तीर्ण उदरात बुडून जाणाऱ्या क्षणांसारखे! 
तसे पाहिले तर सारे क्षण सारखेच असतात 
तरीपण ते समान नसतात, एकच नसतात 
प्रत्येक क्षण ही एक नवी अभिलाषा असते, शोध घेण्याची एक नवी धडपड 
एक नवे वाद्य, एक नवे गीत, एक नवी ज्योत, एक नवा प्रकाश! 
 

 

बातम्या आणखी आहेत...