आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज राम जाईल कुठे?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्या एक अशी नगरी जिथे युद्ध होत नाही. ही नगरी अवध क्षेत्रामध्ये आहे, ज्याचा अर्थ, जिथे वध होणार नाही. एके काळी अयोध्या हे शांतता आणि सुराज्याचे  प्रतीक मानले जाई. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा शंखनाद जसा वाढत जात आहे, हमीदा, मुन्नूमिया, सलीम मियांची नानी आदींच्या मनामध्ये भीतीही त्याच वेगाने वाढते आहे...


हमीदा खातूनला अजूनही ती आठवण आहे. पहाटे लवकर उठून मोठ्या बहिणीबरोबर ती फुलांच्या शेतातली फुलं तोडून त्यांच्या माळा बनवी. त्या फुलमाळा घेऊन तिचा मोठा भाऊ मंदिराच्या बाहेरच्या दुकानात विकायला बसे. अयोध्येच्या एकच नाही, शेकडो मंदिरांमध्ये विशेषत: फुलांची बागवानी करणारे आणि माळा गंुफून विकणारे मुस्लिम समाजातील लोक आहेत. त्यातलेच एक कुटुंब हमीदाचे होते.


मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा शंखनाद जसा वाढत जात आहे, हमीदाच्या मनामध्ये भीतीही त्याच वेगाने वाढते आहे. ८० वर्षांची तिची अम्मी आणि रामलल्लासाठी माळा गुंफणारी तिची भाभी, अयोध्यातेल्या लोकसंख्येच्या सहा टक्के असलेल्या मुस्लिम समुदायातील एक आहेत. १९९२, २०१२ आणि अन्य दंगलींचे दाहक अनुभव घेऊनही तिची अम्मी घर सोडायला तयार नाही. माझे पूर्वज इथलेच आहेत, त्यांच्या कबरीवर दिवे कोण लावणार म्हणून, अम्मी अयोध्येमधल्या आपल्या मुळांना घट्ट धरून आहे.


अयोध्या एक अशी नगरी जिथे युद्ध होत नाही. ही नगरी अवध क्षेत्रामध्ये आहे, ज्याचा अर्थ, जिथे वध होणार नाही. एके काळी अयोध्या हे शांतता आणि सुराज्याचे प्रतीक मानले जाई. तिथे सर्वजण सुखी, आनंदी आहेत, असे समजले जाई. पण आज अयोध्येचे नाव घेतले की भिन्न-भिन्न लोकांच्या मनात वेगवेगळे भयावह विचार येतात. कुणाच्या मनात धार्मिक उन्माद, मुसलमान समाजाच्या मनात भीती, अन्यायाची भावना आणि क्रोध. धर्माचे राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षाला इथे आपली वोट बँक दिसते, तर उदारमतवादी लोकांच्या मनात चिंता. कोट्यवधी लोकं,कोट्यवधी विचार. भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहासात असा कुठलाही प्रदेश नाही आहे, जो इतकी वर्षं राजकारण आणि समाजाचा मर्मबिंदू आहे.


अयोध्येचा इतिहास जो सामान्य जनतेला माहिती आहे, त्यामध्ये प्रमुखतः चार बिंदू आहेत. रामायणामध्ये लिहिलेला राम जन्म आणि रामाची कहाणी, नंतर मोगल साम्राज्याच्या काळामध्ये मंदिर तोडून मशीद, नंतर १९९२ मध्ये बाबरी मशीद तोडली जाणे आणि राम मंदिरासाठी चाललेले उग्र आंदोलन आणि पाठोपाठ वाढत गेलेला धार्मिक उन्माद.
कुठलेही शहर, गाव, घडते, फुलते, तिथे राहणाऱ्या लोकांमुळे. गेल्या ३५-४० वर्षांपासून विवादास्पद बनलेली अयोध्या, एकेकाळी गंगा-जमुनी संस्कृतीचेही ठळक प्रतीक होती. जैन धर्म, बौद्ध धर्म, शीख धर्म, हिंदू धर्म आणि इस्लाम धर्म या प्रमुख धर्मांची धार्मिक स्थळे अयोध्येमध्ये आहेत. एका अर्थी अयोध्या भारतातील ‘जेरुसलेम’ (ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मीयांचे मध्य पूर्वेतील श्रद्धास्थान असलेले शहर.) आहे, जिथे इतके धर्म विकसित होत गेले आहेत.


प्रस्तावित राम मंदिराच्या बाजूला अयोध्येचे, एक अत्यंत महत्त्वाचे मंदिर आहे - हनुमान गढी. प्रथम हनुमानाचे दर्शन आणि नंतर रामजन्मभूमी दर्शन, हा पारंपरिक रिवाज आहे. १८५५मध्ये अवध साम्राज्याचे ज्ञानी आणि संस्कृत अभ्यासक नवाब वाजिद अली शाहने हनुमान गढीवर  कब्जा करू पाहणाऱ्या त्या वेळच्या सनातनी मुसलमानांबरोबर लढाई करून हनुमान गढी मंदिराचे रक्षण केले. आजही हा इतिहास सामान्य जनतेपासून जाणूनबुजून लपवला जातो. खडाऊ (लाकडी पारंपरिक पादत्राणे) बनवणाऱ्या ६५ वर्षांच्या सलीममियांला त्यांची लखनऊची नानी गुणगुणायची ते गाणं अजूनही आठवते. ‘हजरत जाते हैं लंदन, कृपा करो हे रघुनंदन’... नवाब वाजिद अली शाहना ब्रिटिश सेना अटक करून घेऊन जाताना अफवा उडाली की, नवाबना ब्रिटिश सेना थेट लंडनला घेऊन जात आहे. त्या वेळी सर्व धर्मातल्या स्त्रियांनी त्यांच्या रक्षणासाठी प्रार्थना केली होती, त्यातल्या या दोन ओळी सलीमभाईना आठवतात. नवाब वाजिद अली शाहचे रक्षक पैगंबर आणि राम होते, हा भारताचा सर्वधर्मीय इतिहास आहे. २०१८ मध्ये हनुमान गढीचे महंत ज्ञानदास यांनी रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये मुस्लिम समुदायाच्या लोकांना इफ्तारसाठी बोलावून गंगा-जमुनी संस्कृती  जपण्याचाच प्रयत्न केला. हनुमान गढीच्या जमिनीवरती उभी असलेली शाह आलम मशीद धार्मिक सौहार्दाचे प्रतीक ठरत आली. 
सुंदर भवन मंदिराचे व्यवस्थापन एक मुस्लिम सज्जन मुन्नूमियां होते. १९९२च्या दंग्यामध्ये मंदिरातल्या साधंूनी धार्मिक उन्मादापासून त्यांना वाचवले. या मुन्नूमियांंच्या घरामध्ये आजही गोशाळा आहे. हनुमान गढीकडून मिळालेली गाय आणि अन्य गायी त्यांच्या या गोशाळेत सुखरूप आहेत.


ज्या बाबरच्या काळाचा इतका ऊहापोह चालला आहे, त्या बाबरने दिलेल्या १०० बिघा जमिनीवरती उभे आहे, ‘अचारी मंदिर’. या मंदिरामध्ये राम, लक्ष्मण, सीता याबरोबर बुद्ध आणि जैन धर्माचे तीर्थंकर, गुरुग्रंथ, कुराण आणि येशूसुद्धा आहे. एकाच भक्तिभावाने सर्वांची पूजा होते आहे आणि मंदिराचा खर्च बाबरने दिलेल्या १०० बिघा जमिनीमधून निघतो आहे.


राम मंदिर की मशीद, बौद्ध स्तूप की जैन मंदिर या इतिहासामध्ये आपण किती मागे जायचे हा मोठा प्रश्न आहे. अयोध्येमध्ये सध्या रामजन्माची आणि मंदिराची छोटी-छोटी पुस्तकं विकली जातात. तथाकथित सचित्र आणि प्रामाणिक इतिहास सांगणाऱ्या या पुस्तकांमध्ये जे लिहिले जाते, ते ऐतिहासिक सत्य नाही, परंतु आज यालाच इतिहास बनवण्याचा कट्टर हिंदुत्ववाद्यांचा प्रयत्न आहे. अयोध्येमध्ये १९९२, २०१२ आणि त्यानंतर संपूर्ण देशामध्ये फैलावत गेलेल्या या धार्मिक उन्मादामध्ये भाग घेणाऱ्या लोकांना हा इतिहास पटवून देण्यात हे हिंदुत्ववादी बऱ्याच अंशी यशस्वी झाले आहेत. आज रामजन्मभूमीचे प्रकरण एक विवादास्पद संपत्तीचा विषय होऊन सर्वोच्च न्यायालयासमोर आहे. 

इलाहाबाद-प्रयागराजमध्ये जोर-शोराने चालेल्या महा नव्हे अर्ध कुंभाच्या पृष्ठभूमीवर हिंदुत्ववादी पक्ष, त्याच्याबरोबर जोडलेली विश्व हिंदू परिषद आणि अन्य धार्मिक आखाडे सर्वोच्च न्यायालय, संसद आणि सर्व कायदेकानू बाजूला ठेवून जबरदस्तीने मंदिर बांधण्याची धमकी रोजच देत आहेत. मंदिर बांधायची इच्छाच होती, तर बाबरी मशीद उध्वस्त न करता सर्वसहमतीने ते बांधले गेले असते. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेमध्ये मुस्लिम, आदिवासी, दलित, वामपंथी, उदारमतवादी, महिला, गरीब, अनेक भिन्न विचाराधारा असलेले सामान्य मेहनती लोक ज्यांना संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न  मंजूर नाही अशा साऱ्यांना जराही जागा नाही.


विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे संपूर्ण हिंदू समाजाचे प्रतिनिधित्व करत असल्याचा दावा करत आले आहेत आणि सर्व हिंदूंना राम मंदिर विवादास्पद स्थळावरच बांधायचे आहे, हा आग्रह आहे. परंतु हिंदू समाजातील रामावर आस्था असणाऱ्या वा अन्य हिंदूंना या समस्येचे शांतिपूर्ण आणि सद््भावपूर्ण समाधान हवे आहे. अयोध्येचा मुद्दा आज फक्त हिंदू-मुस्लिम समुदायाचा वादाचा मुद्दा नाही. एका बाजूला आहे शांति, अहिंसा, न्याय, सहिष्णुता आणि समता आणि दुसऱ्या बाजूला आहे, जातीयता, हिंसा, दमनशाही, घृणा, असहिष्णुता. 


आज बाबरी मशीद उद्ध्वस्त करणाऱ्यांना शिक्षा न होता, हिंसा आणि बळाच्या आधारावर राम मंदिर बांधले गेले तर महात्मा गांधी, मुन्नूमियां, वाजिद अली शाह, कबीर आणि हमीदाच्या अम्मीचा राम-रहीम हरेल. म्हणूनच आज गरज आहे शांतती आणि न्यायाच्या कसोटीवर  सर्व समुदायांना मान्य होईल, असे समाधान शोधण्याचा.


अरुंधती धुरू
arundhatidhuru@gmail.com
(लेखिका लखनऊस्थित महिला सबलीकरण, अन्नसुरक्षा, रोजगार हक्कविषयक ज्येष्ठ कार्यकर्ती आहे.)

बातम्या आणखी आहेत...