आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनानं केला होयीचा इचका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अरविंद भोंडे, अकोला  ‘अरे राम राम हो, समाधानभाऊ..!’ ‘राम राम’  ‘कुठीसा निंगाले येवळ्या घाईघाईत?’ ‘काई नाई सकायची होई नाई काय, पोट्टे मांगं लागले. पिचकाऱ्या अन् रंगासाठी! तं म्हटलं बजारात जावाव अन् घेवून यावाव पोट्ट्यांसाठी रंग अन् पिचकाऱ्या.’ ‘कावून, तुमच्या वावरात तं पयसाचं झाड हाये. मस्त पयसाच्या फुलाचा चांगला रंग करावं. आपून कसा करत होतो लहानपनी?’ ‘अरे, लहानपणाची गोष्ट अलग होती. आता कोणं टोले घ्यावं? फुलं आना, वाऊ घाला, उकळून काळा. मंग रंग तयार होईल. त्याच्यापेक्षा बजारात गेलं की चायनाचा रंग अन् पिचकाऱ्या.. सस्त्यात मस्त.’ ‘अबे मॅट झाला काय! त्या चायनाचं नाव नको काळू. सत्यानाश करणं लावला त्या चायनानं साऱ्या जगाचा. सस्त्याच्या नांदी लागून मरतं काय? माईत नाई का तुले?’ ‘नाई बॉ..! कावून काय झालं..?’ ‘अबे त्या चायनातून कोरोना व्हायरस साऱ्या जगात गेला अन् तुले सस्त्या रंगाची पळली..’ ‘बरं हायना मंग, आपून नाई तरी बाकीचं कितीतरी सामान चायनाचं सस्त्यात घेतो की नाई? आता किराणाबी सस्त्यात भेटीन.’ ‘अरे पागला, किराणा नाई कोरोना नावाची महाभयंकर बिमारी हाये अन् तुले किराण्याची पळली.’ ‘असं हाये काय? मी किराणाच समजलो. बरं एक सांग, काय व्हय हे कोरोना बिमारी?’ ‘महाभयंकर बिमारी हाये म्हणतात. पयले हे चायनाच्या माणसायले झाली अन् पायता पायता अंशी देशांत पसरली अन् आता आपल्या भारतातही आली म्हणतात. आता लोक जगातल्या दोन लाख लोकाईले या बिमारीची लागण झाली म्हणतात. ७ ते ८ हजार लोकं मेले म्हणतात या बिमारीनं..’ ‘म्हणजे असं म्हण की त्या एड्ससारखी भयानक बिमारी हाये..’ ‘अरे, एका टाईमाले एड्स पुरला असं म्हणण्याची वेळ आली. एड्स कमीत कमी काई केल्यानं तरी होते. पण, कोरोना काई करा की नोका करू, तसाच पसरून रायला साऱ्या जगात.’ ‘म्हणजे कसा काय पसरते कोरोना?’ ‘समजा एकादा माणूस कोरोनाग्रस्त हाये अन् त्याले ताप- खोकला- सर्दी होते, थकवा येते अन् स्वास घ्यायले तरास होते, तो माणूस रेल्वेत, एसटीत, बजारात फिरते अन् खोकलते, थुकते तर त्याच्या खोकल्यातून, थुकीतून कोरोनाचे जंतू वातावरणात पसरतात. त्याच्या संपर्कात आलेल्या माणसाले त्याची लागण होण्याची भीती असते. पायता पायता एकापासून दुसऱ्याले, दुसऱ्यापासून तिसऱ्याले हे बिमारी होण्याची भीती हाये.’ ‘बरं मले एक सांग, अमेरिका, जपान, रशिया, मोठे मोठे देश हायेत.. यायनं यावर दवा नाई काळली काय?’ ‘आता लोक तं या बिमारीवर कोणतीच दवा निंगाली नाई म्हणतात. सोताची कायजी सोताय घेनं हेच यावर दवा हाये.’ ‘म्हंजे कशी काय?’ ‘गर्दीच्या ठिकाणी जायाचं टाळणे, तोंडाले रुमालं नाईतं मास्क बांधूनच घरातून बाहेर पडणे, काम नशीन तर प्रवास टाळणे, कोणाच्याई हातात हात न देता दुरूनच राम राम, नमस्कार करणे, बाहेरून आल्यावर हात-पाय स्वच्छ धुणे, म्हणजे बिमारीचे जंतू आपल्या शरीरात प्रवेश करणार नाईत. ह्या छोट्या छोट्या गोष्टीच लय महत्त्वाच्या हायेत. ह्याच आपल्याले या बिमारीपासून वाचवू शकतात.’ ‘बरं एक ईचारू काय तुले? राग तं नाई येईल?’ ‘इचार लवकर मले कामं हायत. तुयासारखा रिकामा नाई मी.’ ‘म्या टीव्ही पायली अन् आईकलं की दारू पेनाऱ्याले हे बिमारी होत नाई म्हणतात. अल्कोहोलनं या बिमारीचे जंतू पटकन मरतात. हे गोठ खरी हाये काय?’ ‘अरे वा रे वा..! समाधानभाऊ मानलं तुमाले! कामाचं तेवढं बरोबर ध्यान्यात हाये तुमच्या. मी फालतू ग्यान सांगून रायलो..’ ‘नाई खरं की खोटं ते सांगाना..!’ ‘एक गिलास देशी घेतली की ताप-खोकला, आंगदुखी, सर्दी ह्या बिमाऱ्या हातभर दूर रायतात. असे बिमारीचे जंतूच काय, पण मानसंही दूर रायतात.’ ‘चाला जा आता वापस. नाईतं चायनाचा रंग अन् पिचकाऱ्या घेसान अन् त्या रंगातून पिचकाऱ्यातून कोरोनाचे जंतू आपल्या देशात अन् देशातून आपल्या घरात कई येतील याचा नेम नाई.’ ‘नाई हो, मी काय येवळा अळानी वाटलो का तुमाले..?’ ‘नाई तुमाले सांयीसंग धुईमाती खेयाची लयच बेजा हाऊस. तुमी ९० मिली देशी मारली की कोनाच्या बापाले आवरसान काय? सायी काय, बायको काय, शेजारनी काय, पोट्टे काय अन् बुढे काय? जो दिशीन त्याले घोयसता अन् रंगोता. तुमाले काई सुद रायत नाई. त्या चायनाच्या रंगानं साऱ्याले रंगोसान अन् आनसान घरात कोरोना, बाकी मंग एकच काम पटापटा मरोना.. म्हणून यंदाची होई बिगर रंगाची, बिगर पाण्याची बिगर घोयश्याची आपून साजरी करू अन् आपलं गाव, आपलं शहर, आपला देश निरोगी ठेऊ.’ ‘अरे, कुठीसा उपयले हो समाधानभाऊ..! दिसून नाई रायले. गेले वाटते निंगून..’

बातम्या आणखी आहेत...