नवी दिल्ली- आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद
केजरीवाल यांना आज (मंगळवार) एका रिक्षाचालकाने थप्पड लगावली. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपने म्हटले आहे, की आपच्या फसव्या आश्वासनांमुळे त्यांना अशा नामुष्किला वारंवार सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये केजरीवाल यांना दुसऱ्यांदा थप्पड खावी लागली आहे तर हल्ल्याची ही तिसरी घटना आहे.
वायव्य दिल्लीत प्रचार करीत असताना केजरीवाल यांना एक ऑटोरिक्षा चालकाने प्रथम गळ्यात हार घातला. त्यानंतर जोरदार थप्पड लगावली. केजरीवाल यांनी ऑटोरिक्षा चालकांना फसविले असल्याने हे कृत्य केल्याचे या व्यक्तीने सांगितले आहे. त्याचे नाव लाली असून तो दिल्लीतील अमन विहार परिसराचा रहिवासी असल्याचे समजते.
यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल म्हणाले, की केजरीवाल यांना लगावण्यात आलेल्या थप्पडचा मी निषेध करतो. परंतु, आपचे नेते मंडळी वारंवार जनतेची दिशाभूल करीत आहेत.
गेल्या चार दिवसांपूर्वी दक्षिणपूरी परिसरात
अरविंद केजरीवाल खुल्या जीपमधून प्रचार करीत होते. यावेळी एका व्यक्तीने त्यांच्यावर झडप मारली. त्यांना थप्पड मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा हात पोहोचला नाही. केजरीवाल यांच्या गळ्यावर ही थप्पड लागली. त्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी या व्यक्तीची यथेच्छ धुलाई केली. यावेळी केजरीवाल त्याला मारू नका असे सांगत होते. परंतु, उग्र जमावापुढे त्यांचे काही चालले नाही. त्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी या व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधिन केले.
थप्पड मारणारा व्यक्ती भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा आरोप आपच्या कार्यकर्त्यांनी केला होता. केजरीवाल यांच्यावर झालेला हा पहिलाच हल्ला नाही.
28 मार्च रोजी हरियाणातील प्रचार सभेतही एका व्यक्तीने केजरीवाल यांच्यावर हल्ला केला होता. मी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा कार्यकर्ता असल्याचे या व्यक्तीने सांगितले होते.
दरम्यान, केजरीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याला गांभीर्याने घ्यायला हवे, असे आपने म्हटले होते.