आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदानाचा टक्का तितकाच राहिल्याने राज्याचा काैल युतीकडेच जाण्याची चिन्हे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


महाराष्ट्रातील नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत गतवेळेइतकेच म्हणजेच सरासरी ६० टक्क्यांहून अधिक मतदान या वेळेसही झालेले दिसून येते आहे. टक्का तितकाच राहिला याचा ढोबळ अर्थ असा होतो की नवीन मतदारांनी मोठ्या जोमाने मतदान केले. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त संख्येने सभा भाजप-सेना यांच्याच झाल्या. एकूण संख्येची बेरीज केल्यास ती युतीच्या बाजूची दिसते. याचा अर्थ असाच निघतो की सकृतदर्शनी लोकांचा कल परत सत्ताधाऱ्यांकडेच आहे.


या आकडेवारीकडे एक वेगळ्या दृष्टीने पाहायला पाहिजे. विरोधी पक्षांनी सरकारविरोधी असंतोष आहे असे वारंवार सांगितले होते. पण मग याचे प्रतिबिंब मतदानात पडायला हवे होते. मतदान जेवढ्याला तेवढे झाले तर त्याचा अर्थ लोकांना फारसा बदल अपेक्षित नाही. अशा वेळी थोड्याफार जागा कमी जास्त होऊन तेच सरकार सत्तेवर राहू शकते. दुसरा प्रकार म्हणजे मतदानात प्रचंड वाढ होणे. त्यामुळे मात्र सत्ताधारी गोत्यात येतात. अशा वेळी सत्तापालट होऊ शकतो. 


महाराष्ट्रात मतदानाच्या सरासरी आकडेवारीत फारसा बदल झालेला नाही. त्यावरून सत्ताधारी युती ३५ जागांपर्यंत सहज पोचू शकते. त्यांना गेल्या वेळच्या तुलनेत पाच-सात जागांचे नुकसान होऊ शकते. विरोधकांना मागच्या वेळी ६ जागा होत्या. या वेळी ते १२- १३ जागांपर्यंत पाेहाेचू शकतात.


या निवडणुकीतून दोन ठळक मुद्दे समोर येतात. एक तर काँग्रेस व राष्ट्रवादी हे प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत होते. त्यांना राज्यभर प्रचाराची राळ उडवून देत वातावरणनिर्मिती करण्यात अपयश आले. याचाच परिणाम म्हणजे आपल्या प्रभावाखालील प्रदेशात त्यांना जास्त मतदान करून घेता आले नाही. पश्‍चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि विदर्भात काँग्रेस पक्षांनी असे वाढीव मतदान करून घेणे अपेक्षित होते. कारण हे प्रदेश एकेकाळी गड राहिले होते. 


मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे दिग्गज नेते आपापले मतदारसंघ सांभाळण्यातच गुंतून गेले. उर्वरित महाराष्ट्रात फिरणे त्यांना जमले नाही. हे चित्र चांगले नाही. विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे बीडमध्येच अडकून पडलेले आणि विधानसभेतील राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या दरवाजावर खुर्ची टाकून बसलेले हाेते. एकटे शरद पवार उतरत्या वयात सभा घेत फिरले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नांदेडमधून मतदान होईपर्यंत बाहेर पडलेच नाहीत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याही प्रभावी सभा कुठे झाल्याची नोंद नाही. याचाच अर्थ काँग्रेस-राष्ट्रवादीला आपापल्या भागातील मतदारांत उत्साह निर्माण करता आला नाही.


दुसरा मुद्दा राज ठाकरेंचा. त्यांनी महाराष्ट्रात ९ सभा घेतल्या. मग या ९ मतदारसंघांत त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी काही केले का? राज ठाकरेंचा राजकीय प्रभाव अाजवर मुंबई- पुणे- नाशिक असा राहिला आहे. इथे त्यांच्या सभा झाल्या. मग मतदानाचा टक्का या ठिकाणी का नाही वाढला? कल्याण आणि पुण्यात तर मतदान लक्षणीय घटल्याचे आकडेवारी सांगते. मुंबईत ते चांगले साडेतीन टक्के वाढल्याचे दिसते आहे. पण इथेही मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून मतदान करून घेताना दिसले नाहीत.
तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे वंचित बहुजन आघाडी. दलित-मुस्लिम वस्त्यांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून आला.  प्रकाश आंबेडकर-ओवेसी यांच्या सभाही प्रचंड उत्साहात आणि चांगल्या गर्दीत पार पडल्या.  मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात दलित-मुस्लिम वस्त्यांमधून मतदान झालेले दिसले. कुणी कितीही कशीही टीका करो, प्रकाश आंबेडकर-ओवेसी यांनी वातावरणनिर्मिती करण्यापासून ते प्रत्यक्ष मोठमोठ्या सभा घेण्यापर्यंत आणि मतदाराला मतदान केंद्रावर आणण्यापर्यंत यश मिळवले. लोकसभेचे मतदारसंघ प्रचंड मोठे सरासरी १८ लाखांचे मतदान असल्याने या मतदारांचा प्रभाव ‘वंचित’चा उमेदवार निवडून येण्याइतपत पडणार नाही. पण येत्या विधानसभेत ही आघाडी कायम राहिली तर चांगले यश मिळवू शकते. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, रिपब्लिकन पक्ष, मुस्लिम लीग ही सगळी मते या वेळेस वंचित आघाडीकडे एकवटलेली दिसतील. 

 

निष्प्रभ विराेधक विधानसभेतही प्रभावी ठरण्याची शक्यता कमीच
येत्या विधानसभा निवडणुकांत सत्ताधारी भाजप-शिवसेना एकत्र लढो अथवा वेगवेगळे, सत्ता तेच राखतील. विरोधक अजूनही गोंधळलेले आहेत. ज्या ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी कमजोर पडतील ती जागा वंचित बहुजन आघाडी भरून काढेल. पालघर पोटनिवडणुकीत भाजप -शिवसेना एकमेकांच्या विरोधात असतानाही भाजपने ती जागा जिंकली होती. तर भंडारा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार नसतानाही भाजप राष्ट्रवादीसमोर हरला होता. तेव्हा लोक एकाला पाडण्यासाठी दुसऱ्याला मतदान करतात हे फारसे खरे नाहीये. विधानसभा निवडणुकांत विरोधक फार प्रभाव टाकू शकतील असे सध्या तरी दिसत नाही.

बातम्या आणखी आहेत...