आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

‘आसिफजाही’तून इतिहासाची ‘अराजकीय’ मांडणी

एका वर्षापूर्वीलेखक: सुनील चौधरी
  • कॉपी लिंक

वंदना धनेश्वर, मिनाज लाटकर
आैरंगाबाद : हैदराबाद संस्थान अर्थात निझाम राजवटीचा इतिहास असलेल्या ‘आसिफजाही’ पुस्तकाच्या पहिल्या खंडाचे नुकतेच प्रकाशन झालें. शब्द प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे संपादन सर्फराज अहमद, कलीम अजीम आणि सय्यद शाह वाएज केले आहे. गाझीउद्दीन रिसर्च सेंटरच्या माध्यमातून करण्यात आलेले संशोधन, विषयाची मांडणी आणि पुस्तक प्रकाशनामागची भूमिका यावर सर्फराज अहमद आणि कलीम अजीम यांच्याशी ‘दिव्य मराठी’ने साधलेला संवाद...

प्रश्न : ‘आसिफजाही’मागचा उद्देश काय?
उत्तर : मुस्लिमांचा इतिहास असेल किंवा त्यांचे समाजशास्त्र, दुर्दैवाने याचा आजवर शास्त्रीय पद्धतीने अभ्यास झालेलाच नाही. शिवाय ज्या मुस्लिम अथवा अन्य इतिहास अभ्यासकांनी तो करून ठेवलाय तो बहुतांश इतिहास उर्दूतून आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसापर्यंत हा इतिहास पोहोचावा, अशी प्रामाणिक इच्छा होती. ती आमची जबाबदारीही समजतो. आज मुस्लिम समुदायाला इतिहासातील मुस्लिम शासकांचे दाखले देत छळले जातेय. काही मुस्लिम राजांनी अन्याय केला, नाही असे नाही, परंतु आजच्या मुसलमानांचा त्याच्याशी काहीच संबंध नाही. इतिहासाची दुसरी बाजू लोकांसमोर आणलीच गेली नाही. ती आणि अराजकीय इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि यासाठीच ‘आसिफजाही’च्या माध्यमातून आम्ही तो इतिहास मांडण्याचा प्रयत्न केलाय. आमचा मूळ हेतू मुस्लिमांचा इतिहास हा मराठी या ज्ञानशाखेतून उपलब्ध करून देणे हा आहे. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर उदयास आलेली आसिफजाही दक्षिणेतील महत्त्वाची राजवट होती. या सत्तेचा दख्खनच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक लोकजीवनावर मोठा प्रभाव आहे. पहिला आसिफजाह निझाम उल मुल्कपासून अखेरचे आसिफजाह मीर उस्मान अलीपर्यंतचा काळ दक्षिण भारताच्या इतिहासाचे अभिन्न अंग आहे. या काळात निझामांची शैक्षणिक व्यवस्था कशी निर्माण केली गेली, शैक्षणिक, सांस्कृतिक व्यवहार कसा व्हायचा, या यंत्रणेत प्रशासनाव्यतिरिक्त इतर अनेक जाती-धर्मांचे प्रतिनिधित्व करणारे लोकही सहभागी होते. ज्यांना कोणत्याही राजकीय, धार्मिक अस्मिता नव्हत्या. अशाच लोकांनी एकत्र येऊन सांस्कृतिक चळवळी उभ्या केल्यात. या ज्ञानसाधनेत योगदान देणाऱ्यांविषयी काहीच लिहिले गेले नाही. त्यामुळेच जनसामान्यांशी निगडित हा इतिहास ही लोकांसमोर यायला हवा, असे वाटले. 

प्रश्न : ‘आसिफजाही’ची गरज आहे असे का वाटले?
उत्तर: इतिहास वस्तुनिष्ठपणे लिहिला जाणे गरजेचे आहे. या इतिहासातून भविष्यातील अडचणींवर मात केली जाऊ शकते. आजपर्यंत इतिहास लिहिला गेला तो फक्त युद्धाचा. इतिहास हा समाजात द्वेष पसरवण्यासाठी नसतो. सामाजिक ऐक्यनिर्मितीसाठी असतो. अल्पसंख्याक मुस्लिमांच्या बाबतीत या इतिहासाची एकांगी मांडणी केली गेली. ब्रिटिशपूर्व काळात मुस्लिम राजवटीत मोठ्या प्रमाणात हिंदू जमीनदार होते तसेच शिवाजी राजांच्या राजवटीत अनेक मुस्लिम सरदारही होते. मात्र असे असूनही या काळात कोणताही जातीय संघर्ष नव्हता. जातीय दंगली घडत नव्हत्या. आज मात्र चित्र उलट आहे. आज इतिहासाची वास्तव मांडणी करणाऱ्यांवर दहशत निर्माण केली जाते. अशाने वस्तुनिष्ठ इतिहास कधीच समजून घेता येणार नाही. इतिहास कसा मांडायचा हे विशिष्ट गटाकडून ठरवले जाते. समाजावर इतिहास थोपवला जातो. मुस्लिम समाजाबद्दल खोटी मिथके तयार केली गेली. ही खोटी मिथके म्हणजेच खरा इतिहास, असेही बिंबवले गेले.  यामागचे सत्य समोर आणण्यासाठी ‘आसिफजाही’ची गरज भासली.

प्रश्न : पुस्तकाच्या संदर्भासाठीचं डॉक्युमेंटेशन कसे केले?
उत्तर : स्वत:च्याच कोषात जगणाऱ्या आजच्या  मुस्लिमांचा इतिहास गौरवशाली आहे. मात्र, या इतिहासापैकी बराचसा इतिहास हा मूळ संदर्भ न वापरता लिहिला गेलेला आहे, असे लक्षात आले. पुढे हाच चुकीचा संदर्भ वापरून लिहिलेला इतिहासही संदर्भ म्हणून माथी मारला जातो. अनेक इतिहासकारांनी उर्दू भाषेचे ज्ञान नसतानाही निझामांचा इतिहास लिहिला.  त्यामुळेच आम्ही मूळ संदर्भ शोधून त्यांचे डॉक्युमेंटेशन करून त्याचे भाषांतर करण्याचा प्रयत्न करत आहोत. 

प्रश्न : चुकीचे संदर्भ माथी मारले जातात म्हणजे नेमके काय?
उत्तर : पद््मावतीचं उदाहरण घेऊयात. सेतुमाधव पगडी व कर्नल टॉडने 
पद्मावती हे पात्रच नाकारले आहे. तरीही त्यावर चित्रपट निघाला. एकूणच पद्मावती प्रकरणात खोटे, चुकीचे संदर्भ देऊन आजच्या पिढीसमोर इतिहास आणला गेला. शिवाय, पुरोगामी आणि प्रतिगामी या दोन्ही लोकांनी एक व्यवस्था निर्माण केलीय. 
त्यातून इतिहास मांडणाऱ्यांवर दडपणे निर्माण केली जातात. म्हणून अशा प्रयत्नांची आवश्यकता असते!

0