आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाजूक क्षणातील संकट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही वर्षांपूर्वी सोलापुरात झालेल्या दंगलीच्या वेळी आलेला दाहक अनुभव आहे. आम्ही सर्व शिक्षक त्या दिवशी अध्यापनाचे काम नित्याप्रमाणे करत होतो. नेहमीपेक्षा तो दिवस वेगळा होता. शाळा दुपारी भरते. सायंकाळी पाचच्या सुमारास एक पालक मुलाला न्यायला आले. त्यांनी साधेच कारण सांगितले पण खुद्द पालकच न्यायला आल्याने नाइलाज झाला आणि आम्ही त्याला पालकांबरोबर जाऊ दिले. थोडा वेळ गेला आणि अनेक विद्यार्थ्यांचे पालक आले आणि आपापल्या मुलांना घेऊन जाऊ लागले. आम्हाला काही कारणच कळेना. चौकशीअंती शहरात दंगल चालू झाल्याचे समजले. त्या काळात सार्वजनिक नवरात्र महोत्सव चालू होता. परिस्थिती पाहून मुख्याध्यापकांनी शाळा सोडून दिली. बघता बघता सारे वर्ग रिकामे झाले. पालक खूपच घाबरले होते. त्यात कहर म्हणजे दंगलीमुळे शहरातील बससेवा, रिक्षा सेवा बंद करण्यात आल्या होत्या. आमची शाळा हद्दवाढ भागात असल्याने शहरातील तणावाची झळ आमच्यापर्यंत पोहोचली नव्हती. माझे घर शाळेपासून पाच किलोमीटर अंतरावर होते. मी नेहमी माझ्या दुचाकीवर शाळेला येत असे. पण त्याच काळात माझी प्रसूतीची तारीख असल्याने मी गाडी वापरण्ो बंद केले होते. माझा मोठा मुलगाही शहरातल्या शाळेत गेला होता. चौकशी केल्यानंतर तो घरी सुखरूप पोहोचल्याचे समजले. पती एका कामासाठी परगावी गेले होते आणि मी अशा नाजूक अवस्थेत शाळा रिकामी असताना दंगलीच्या वातावरणात शाळेत अडक लेली होते. शेवटी शाळेतील एका सहकारी शिक्षकाने धाडस करून मला त्याच्या गाडीवर घरी सोडवायचे ठरविले. रस्त्याने जाताना शुकशुकाट होता. काही ठिकाणी पोलिस घोळक्याने उभे होते. नेहमीचाच रस्ता पण तेथून जाताना क्षणोक्षणी अंगावर काटा येत होता. काही गल्लीबोळातून समाजकंटक हातात तलवारी,काठ्या घेऊन उभे होते. कोणी माथेफिरूने जर आमची गाडी थांबविली असती तर गरोदरपणी माझे काय झाले असते,याच विचाराने आम्ही धास्तावलो होतो. पण माझे आणि माझ्या पोटातील बाळाचे नशीब चांगले होते. त्या तणावग्रस्त वातावरणातही कोणीही अडवले नाही. मला घरी सुखरूप पोहोचविणा-या सहकारी शिक्षकाचे आभार मानावे तेवढे थोडेच.