आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांचे धाडस महत्त्वाचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही वर्षांपूर्वी आम्ही पंढरपूर-पुणे बसने प्रवासाला निघालो होतो. बसला गर्दी होती. अरेरावी आणि हुशारी करणा-या प्रवाशांनी जागा बळकावल्या होत्या. आम्ही आठ-नऊ जण उभे होतो. माझ्याजवळ बाळ होते. काही लोक उतरून गेल्यानंतर मला इतरांनी बसण्यास जागा दिली. माझ्या मागे एक महाविद्यालयीन तरुणी उभी होती. तिच्या मागे एक मध्यमवयीन तरुण उभा होता. मी बसताच तो तरुण उभ्या असलेल्या कॉलेज तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न करू लागला. बराच वेळ हा प्रकार सुरू राहिल्याने ती तरुणी अवघडून गेली आणि अंग चोरून माझ्या बाजूला येऊन उभी राहिली. नंतर तिला शेवटच्या रांगेत बसायला जागा मिळाल्यानंतरही शेजारच्या व्यक्तीने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. आम्हाला पुण्याकडे जायचे होते. आता हा बाबा पुण्यापर्यंत असेच वागणार काय, या जाणिवेने ती तरुणी शहारली,मलाही तिच्यावरील अडचणीची जाणीव झाली. प्रसंग नाजूक आणि सहनशीलतेची परीक्षा पाहणारा होता.
शेवटी त्या तरुणीने आक्रमक पवित्रा घेतला. ब-याच वेळापासून लगट करणारास तिने फैलावरच घेतले. संतापाने बोलत ती उठून उभी राहिली आणि म्हणाली, तुमचे मघापासून जे चालले आहे, ते तुम्हाला अजिबात शोभणारे नाही. मी एवढा वेळ गप्प बसले, याचा तुम्ही फायदा घेता की काय? या तरुणीचा हा दुर्गावतार पाहून कंडक्टरसह सगळे प्रवासी, काय झालं म्हणून तिच्याभोवती जमा झाले. तिने संबंधित तरुणाची तक्रार करताच सगळेच संतापले. एक-दोघे त्या माणसाच्या अंगावर धावूनही गेले. एकंदर परिस्थिती पाहून तो माणूस एवढा घाबरला की पुढच्या बसस्टॉपला उतरून निघूनही गेला. यावरून काय लक्षात घ्यायचे? प्रत्येक स्त्रीने जर वेळीच पाऊल उचलले तर त्या कधीच अबला ठरणार नाहीत. सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना महिलांनी अशा प्रकारे काळजी घेतल्यास असे छेडछाडीचे प्रकार कमी होतील. घाबरून जाण्याचे कारण नाही. लोक नेहमी बरोबर असतात. त्यांना जर विश्वासात घेतले तर असे प्रसंग टाळता येतील.