आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलांऐवजी काट्यांशी मैत्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवाने माझ्या एका मित्राला सर्वकाही भरभरून दिले होते. चांगली नोकरी, घरची गर्भश्रीमंती, कशाचीही कमतरता नव्हती. पण जीवनाच्या वाटेवर नेहमीच फुले नसतात, काट्यांशीही दोस्ती करावी लागते. त्याच्या चांगल्या संसाराला कोणाची तरी दृष्ट लागली. माझ्या मित्राच्या वागण्यात फरक जाणवू लागला. कामावर जायचे नाही. वाटेल तसे वागायचे. घरातले सर्वच लहानथोर त्याच्या बेबंद वागण्यामुळे त्रस्त झालेले होते. स्वत:विषयी सदैव बेफेकिरी. बरे वाटले नाही तर स्वत:च रुग्णालयात दाखल व्हायचे. सलाईन लावून घ्यायचे आणि पुन्हा कामाला लागायचे. अंतर्मनात तो किती दु:ख साठवून घेत होता त्याचे त्यालाच माहीत.. पण त्याच्याकडून कधी अप्रिय पाऊल उचलले जाईल असे कोणाला वाटत नव्हते. वहिनी, मुले घरी नव्हत्या. त्या दिवशी घरात तो एकटाच होता. विवंचनेत त्याने विषारीद्रव्य प्राशन करून जीवन संपवले. सर्व प्रकाराचा उलगडा झाला तेव्हा बराच उशीर झाला होता. चांगल्या माणसाच्या मागील शुक्लकाष्ठ मृत्यूनंतरही संपत नाही, असा अनुभव आम्हाला आला. शवपरीक्षणानंतर मृतदेह हाती यायला रात्र झाली. अकोल्याचे शवागार त्या वेळी अगदी झाडाझुडपात होते. रात्रीचा किर्र अंधार असल्यामुळे मृतदेह शवागारातून काढण्यासाठी वाहनांच्या दिव्याचा आधार घ्यावा लागला. तीन-चार मित्रांनी पुढाकार घेऊन मृतदेह घरी आणला. एव्हाना कुटुंबीयदेखील घरी पोहोचले होते. एकाएकी काय घडून गेले कोणालाही कळत नव्हते. प्रसंगच असा बाका होेता की मनाने खंबीर असणारे मित्रही पार हादरून गेले. घटना घडून बराच वेळ झाल्यामुळे मृतदेह फार काळ ठेवणे शक्य नव्हते. रात्रीच अंत्यसंस्कार करणे आवश्यक होते. आप्तमित्रांनी ती व्यवस्था केली. रात्री मोक्षधामात पोहोचायला एक वाजला. जवळचे मित्र, स्नेहीजनांना गमावण्याचे अनेक प्रसंग जीवनात येतात. त्या वेळी खंबीर राहावे लागते. कारण त्यातूनच आपण घडत असतो. मानवी जीवनाचे मर्म त्यातून कळू लागते.